Thursday, 14 July 2016

हैदराबाद - इट स्ट्रीट आणि मी.

     "वीकएंड " म्हणजे काय हे फक्त सेकण्ड आणि फोर्थ सॅटरडे-सन्डे सुट्टी असलेल्या लोकांना विचारा. पाच दिवसीय आठवडा असल्याने कामाचा लोड जाणवत नाहीच शिवाय आपण सॅटर्डे कसाही "वेस्ट" केला तरी त्याची करेक्टिव्ह ऍक्शन म्हणून आणखी एक "सोन्यासारखा संडे" मिळतो. शिवाय माझ्यासारख्या बॅचलर लोकांना बरीच कामंही असतात. सुज्ञ बॅचलर वाचकांना ते लक्षात येईलच. जसं की आठवडाभराचे कपडे धुणे, वाळवणे, कपड्यांना इस्त्री करणे, रूम आवरून ती राहण्यायोग्य बनवणे, त्यातल्या त्यात किचन आवरणे म्हणजे एक मोठा उद्योग! टेबल, खुर्च्या पुसून त्यावरची पुरातन धूळ साफ करणे, पुस्तकांचे रॅक आवरून ठेवणे, न्यूज पेपर्स नीट एकावर एक रचून ठेवणे, गठ्ठा कप्प्यात मावेना झाला, की तोच रद्दीवाल्याकडे नेऊन वजनात फसवणूक करून घेणे आणि कमीच पैसे मिळाल्याचे दुःख करणे, आरसे पुसून "हे इतकं क्लीअर दिसतं?" असे आश्चर्य व्यक्त करणे, टूथपेस्ट च्या ट्यूब वर दया येऊन ती नवीन आणणे, बेडशीट्स, पिलो कव्हर्स यांचे नैसर्गिक रंग जाऊन तिथे वेगळे रंग आले की ते बदलणे, आणि थोडंसं छान वाटावं म्हणून उदबत्ती लावणे आणि हे सगळं कमी म्हणून की काय - अंघोळ करणे - नाश्ता करणे - जेवण करणे - झोपणे - इ.इ. 

     तर असा हा वीकेंड या सगळ्या धांदलीत कसा निघून जातो ते कळत नाही. म्हणून लॉन्ग वीकेंड ला जरा कुठे बाहेर फिरण्याचे प्लॅन्स बनवता येतात. आणि मी ते करतो. अर्थात रूममेट्स-कम - कलिग्स सोबत.


# # # # #


     आता निघू मग निघू करत करत शेवटी बारा वाजलेच निघायला घरातून. बरेच दिवस झाले काही शॉपिंग केलं नाही, असा सम्यक आणि मयूरचं म्हणणं पडलं. त्यामुळे मग "इट स्ट्रीट" चा प्लॅन आपसूक डीले झाला. सुमारे दीड ते चार अक्खा हैदराबाद सेंट्रल मॉल पालथा घातल्यावर मयूरला त्याचे मनपसंत दोन शर्ट्स आणि एक पॅन्ट मिळाली. मला घ्यायची होती एक चिनो, पण रंग, साईझ, कम्फर्ट, आणि किंमत या चार गोष्टी कुठल्याच आयटम मध्ये जुळून येईनात. अगदी दोन फ्लोअर पालथे घातले तरीही. मग शेवटी कंटाळून मी तो नाद सोडला आणि एकट्यानेच फूड लाउंज कडे धाव घेतली.

     "इटालियन बी एम टी" असं नाव असलेलं सॅन्डविच मी ऑर्डर केलं. त्यात स्लाइस्ड लॅम्ब सलामी, पेपेरोनी आणि हॅम हे सगळं स्टफ्ड होतं. टेस्ट बऱ्यापैकी छान होती. ऑलिव्स, आणि यालापेनो यांचा एक वेगळाच फ्लेवर जाणवत होता. हे एवढं मोठं सॅन्डविच संपलं तरी या दोघांचा काहीच पत्ता नाही म्हटल्यावर मी बाजूच्याच होम डेकोर शॉप मध्ये घुसलो. तऱ्हेतऱ्हेचे दिवे, धूपदाण्या, बरण्या आणि पॉट्स पाहून फार छान वाटलं. तेवढ्यात मयूर चा फोन. अरे आम्ही आलोय. चल काहीतरी खाऊ. शेवटी हो नाही करता करता एक व्हॅनिला सॅन्डविच झालंच. शेवटी शॉपिंग आटोपून "इट स्ट्रीट" गाठायला साडेपाच सहा वाजले. पण एकदा इट स्ट्रीट वर पोहोचलो आणि हुश्श झालं. समोरचं दृश्य अगदीच विहंगम होतं. 

# # # # #



     "इट स्ट्रीट"... खाणं, पिणं आणि समोर पसरलेला हुसेन सागर. संध्याकाळच्या वेळी इथे आलो, तर शांत थंडगार वारा, गच्च दाटून आलेलं आभाळ आणि समोर पसरलेलं निळंशार पाणी...  भोवतालची गर्दीही मग हळूहळू मनातून नाहीशी व्हायला लागते.  तळ्याच्या काठावरून अखंड वाहणारा "नेकलेस रोड" आणि जगाला शांतीचा संदेश देणारी गौतम बुद्धांची महाकाय मूर्ती. आणि आता रीसेंटली उभारलेला भारताचा ध्वज. हा भारताचा सर्वात मोठा ध्वज हैदराबाद मध्ये उभारला गेला आहे. तर शांतपणे वाऱ्यावर लहरणारा भारताचा झेंडा. हळूहळू मनातून सगळे कोलाहल निघून जातात. भोवतालची गर्दीही मग सावकाश काढता पाय घेऊ लागते आणि मग जसा काळोख दाटेल, तसं पाणीही अधिक शांत होऊ लागतं आणि त्यासोबत आपलं मनही. ह्या एवढ्या मोठ्या तळ्यात कारंजी उडू लागतात. आणि वारं आणखीनच थंड.... 
     हातातल्या चहाच्या कपातून निघणाऱ्या वाफा. चहाचा गंध नाकात भिनतो. हातातला वाफाळता चहाचा कप जसा जसा रिकामा होऊ लागतो तसतसा संध्याकाळी ला रंग चढत जातो. आभाळ वेगवेगळ्या रंगानी उजळून जातं आणि समोरचं पाणी मग हळूहळू काळोख पिऊ लागतं. खरंच काहीवेळापूर्वी इथं फार गजबज होतं नाही? आता सगळं काळ्याकुट्ट अंधारात बुडून जातं. पाण्याच्या ठिकाणी आता फक्त एक अज्ञात काळोख. दूरवरचे दिवे पाण्यात चमकताना दिसतात. लाटांवर हलणारी चमचम. दूरवर क्रूझ दिसते. त्यावर चाललेला कोलाहल दिसतो, अस्फुट ऐकूही येतो. नेकलेस रोड अखंड... ही इतकी माणसं राहतात या शहरात? 

# # # # #

     सो, एकूण ही आजची आउटिंग बऱ्यापैकी चांगली झाली. आणि आणखी एक वीकेंड सत्कारणी लागल्याच्या फीलिंग सोबत मी घरी आलो. 

 # # # # #


No comments:

Post a Comment

संध्याकाळ

 # # # # # सं ध्याकाळ डोळ्यांवाटे मनात उतरत जाते तसतसं  हळूहळू काहीतरी हातातून निसटत जाण्याचं भान येऊ लागतं. वारा पडतो. उजेड हळूहळू क्षीण हो...