Thursday, 30 October 2025

वेळसावची संध्याकाळ

# # # # #

ग्रीन टी चा बाजूला ठेवलेला कप कामाच्या नादात थंड झाला आहे हे लक्षात येतं, तेव्हा घड्याळाकडे लक्ष जातं. संध्याकाळचे सात. म्हणजे बाहेर आता संधिप्रकाश असेल आणि थंड पावसाळी हवेने सांकवाळ गाव भरून राहिलं  असेल. ऑफिस बंद करून मी निघतो. सावकाश पार्किंग मध्ये जाऊन गाडी काढतो.  गाडीची चावी फिरवताच म्युझिक सिस्टीम मधली नेहेमीची एखादी गझल मधूनच सुरु होते. जणू अर्धवट राहिलेल्या सुरावटी इतक्या वेळ तिच्यात दाबून ठेवल्या असाव्यात. गाणं कानावर पडता पडता हळूहळू विचार सैल होत जातात. एक शांत तंद्री लागते. सवयीचा झालेला नॅशनल हायवे, झुआरीनगर आणि सांकवाळ मधल्या छोट्या वस्त्या, इमारती मागे पडत जातात आणि दूर क्षितिजावर समुद्राची निळीशार रेष दिसायला लागते. आधी इथे इमारती नव्हत्या, हवा स्वच्छ होती तेव्हा कदाचित तिकडची नारळाची झाडं सुद्धा दिसत असावीत. एका बाजूला अथांग पसरलेला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला धुक्यात वेढलेले वेर्ण्याचे डोंगर दिसायला लागतात. पावसाळ्यात इतर कुठे नसला तरी इथे पाऊस हमखास असतोच असतो. आधी जेव्हा इथे कोणीही नव्हतं तेव्हा हा सांकवाळ, झुआरीनगरचा हा भाग खूप सुंदर दिसत असावा. आता नॅशनल हायवे झाल्याने गाड्यांची वर्दळ, घरे, इमारती, उड्डाणपुलामुळे इथलं निसर्गसौंदर्य थोडंसं झाकोळून गेलेलं आहे.

वेळसाव च्या दिशेने नागमोडी वळणे घेत डोंगर उतरताना मग चित्र बदलतं. नारळाच्या झाडांच्या कमानीकमानी ओलांडत जाऊन वेळसाव  पाळे गावात शिरताच पांढरंशुभ्र रंगवलेलं एक जुनं चर्च दिसतं. पाळे तलावाच्या कडेला काही चहा, कटलेट पाओचे गाडे असतात. मुंबईत जसा वडापाव, इंदोरमध्ये पोहा, पुण्यात मिसळ तसं इथलं गोव्याचं फास्ट फूड म्हणजे कटलेट पाओ. स्पेशल गोव्यातले पाव म्हणजेच पोई आणि त्यात भरलेला तळलेला चिकन, बीफ, पोर्क किंवा व्हेज कटलेट. तर त्या गाड्यावर थांबून चहाचे घोट घेत घेत नारळांच्या गर्दीने वेढलेला पाळे तलाव आणि बाजूला दिसणारं चर्च पाहताना सगळा शीण निघून जातो. मागे एकदा माझा बंगाली मित्र अभिनव चॅटर्जी आणि त्याच्या आई वडिलांना घेऊन इकडे आलो होतो तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया - ऍकदम शुंदोर! ऍरिस्टोक्रॅटीक! अपूर्बो ! अपूर्बो ! अशाच होत्या. तर ती अपूर्वाई मी चहाच्या घोटांसोबत पाहत राहतो.


सांजवेळेची सुंदरता आणि शांतता संपूर्ण परिसरावर पसरलेली असते. फोटो काढण्याचे व्यर्थ प्रयत्न करूनही त्यात तो भारून टाकणारा भोवताल टिपता येत नाही. मग कंटाळून मी तो नाद सोडून देतो. दूरवर ढगांमध्ये सोनेरी काळसर पांढरे रंग दिसत असतात. हिरव्यागार नारळाच्या झाडांच्या साथीने हे संध्याकाळचं आकाश भलतंच छान दिसतं. शेवटी मग हळूहळू दिवस संपत जातो तसतसं नारळाच्या झाडांमधून काळोख खाली उतरतो. बाजूच्या रस्त्यात  गाड्यांचे हेडलाईट्स सुरु झालेले दिसतात. मग मीसुद्धा सावकाश तिथून घरी जायला निघतो.

# # # # #

 


No comments:

Post a Comment

वेळसावची संध्याकाळ

# # # # # ग्रीन टी चा बाजूला ठेवलेला कप कामाच्या नादात थंड झाला आहे हे लक्षात येतं, तेव्हा घड्याळाकडे लक्ष जातं. संध्याकाळचे सात. म्हणजे बाह...