Sunday 23 June 2024

संध्याकाळ

 # # # # #

संध्याकाळ डोळ्यांवाटे मनात उतरत जाते तसतसं  हळूहळू काहीतरी हातातून निसटत जाण्याचं भान येऊ लागतं. वारा पडतो. उजेड हळूहळू क्षीण होत जातो. झाडं शांत होतात. उजळून निघालेली पश्चिम दिशा काळजात एक कोपरा करून बसून राहते, जणू म्हातारी माणसं काठीवर मूठ घट्ट आवळून बसून राहतात तसं. दिवस गेला, तरी संध्याकाळ हातातून जाऊ द्यायची नाही म्हणून मी चपला पायात सरकवून घराबाहेर पडतो. एरवी थोड्याफार गजबजलेल्या बेलफोर्टवर रविवारची सुस्ती पसरलेली असते. रिकामे रस्ते, बंद दुकाने, ओस मैदाने रविवारच्या खुणा बाळगत असतात. आसुसलेल्या कान - डोळ्यांनी मी निसटती संध्याकाळ पकडून ठेवण्याचा फोल प्रयत्न करतो. माझ्या नेहेमीच्या ठरलेल्या एका ठिकाणी फिरत फिरत जाऊन जेव्हा मला मी भेटतो, तिथे थांबतो. रेल्वेचा पूल, आजूबाजूला पसरलेली फुलझाडे आणि शांत, निर्जन रस्ता. ही माझी नेहेमी स्वतःला भेटण्याची जागा. आतला - बाहेरचा कल्लोळ पश्चिम दिशेसारखा शांत होत जातो तेव्हा मला क्षितिजावर बॅलॉन द अल्झासचा निळसर हिरवा डोंगर आणि त्यावर दूरवर पसरलेली झाडाची रांग दिसू लागते. अल्झास आणि जुरा पर्वतांच्या कुशीत वसलेलं बेलफोर्ट अगदी छोटं वाटू लागतं. इतका वेळ हे सगळं दिसत असूनही मी "पाहत" नव्हतो हे कळून चुकतं. दिवसभराचं एकामागून दुसऱ्या महत्वाच्या वाटणाऱ्या बिनकामाच्या गोष्टी करत राहाण्याच्या चाळ्यात बाहेर काय चालू आहे ते कसं दिसावं ? दूरवरचे निळसर - हिरवे डोंगर आणि त्यावर दिसणारी मोठाली झाडं उन्हात चमकत असतात. आता त्या झाडावर कोणी बसलं असेल तर ते सुद्धा तिथून मला पाहू शकेल का? उगाचच विचार येऊन जातो.

घर-दार, जिव्हाळ्याची माणसं, सवयीचं झालेलं जगणं सोडून जेव्हा बेलफोर्टला आलो, त्याला आता वर्ष लोटून गेलं. कोणाची ओळखपाळख नाही, तशी बोलायला उत्सुक असणारी माणसं नाहीत, भाषा येत नाही, अशा परिस्थितीत फार लवकर मला इथल्या सगळ्याचाच उबग आला. रोज ऑफिसहून आल्यावर रिकाम्या घरात पाऊल टाकताना एकटेपण अंगावर यायचं. इतक्या सुंदर, स्वच्छ, सुखसोयीनीं सुसज्ज वातावरणात राहून सुद्धा कोंडल्यासारखं व्हायचं. पण त्याची सुद्धा हळूहळू सवय होत गेली. 

आणि आज बेलफोर्ट सोडताना मन अगदी निरुत्साह आहे, हे सगळं स्वतःसोबत राहणं इतक्या कमी वेळात नसानसांत भिनलं. प्रत्येक गोष्ट आयुष्यात काही ना काही शिकवून जाते. बेलफोर्ट ने मला स्वतःसोबत राहायला शिकवलं. सर्व गोष्टींच्या आधी स्वतःला, स्वतःच्या भाव-भावनांचा विचार समोर ठेवायला शिकवलं. आनंदी राहण्यासाठी नेहेमी माणसे भोवताली असावीत, असं नसतं, एकट्याला सुद्धा आनंदी राहता येऊ शकतं हे शिकवलं. रोजच्या आयुष्यात एखादा दिवस चांगला असतो, तसा तो कधी वाईटही असतो आणि त्याने रोजच्या आयुष्यात कसलाच फरक पडता कामा नये, हे शिकवलं. बेलफोर्ट एक खूप कडक शिस्तीचा शिक्षक म्हणून माझ्या आयुष्यात आलं आणि बऱ्याच अंगांनी मला समृद्ध करून गेलं. कदाचित माझ्यासारखे असे अनेक पुष्कर कधीकाळी त्यांचा कम्फर्ट झोन सोडून बाहेर पडले असतील आणि बरंच काही आयुष्याकडून शिकले असतील, पण माझा अनुभव सर्वस्वी माझा आहे. मी बेलफोर्ट मध्ये राहिलो नाही, तर बेलफोर्ट माझ्यात राहिलं. इथली वळणावळणांनी वाहणारी सावरूस नदी, इथली झाडी झुडुपं, प्लास कॉर्बीस, कॅथेड्रल, रेल्वे स्टेशन, प्लास रेपुब्लिक, बेलफोर्ट चा किल्ला, सेव्हनन्स मधलं माझं ऑफिस, आजूबाजूची शेतीवाडी सगळं सगळं माझ्या आत नेहेमी जिवंत राहील. सोलापूर पासून सुरु झालेला माझा प्रवास आणि त्यांनतर भेटलेली पुणे, वारंगल, हैदराबाद, मुंबई, बेलफोर्ट ही सगळी शहरं माझ्यात वसतात. कधी निवांत वेळी आठवणी निघाल्या, की ह्या शहरांच्या गल्ली-गल्लीत मला आपलेपणाच्या खुणा भेटतात, आपली वाटावी अशी माणसे ह्या प्रत्येक शहरात भेटतात. माणसे सगळीकडे सारखीच. जगभरात त्यांची सुख-दुःखे, बोलण्याचे विषय, हेवेदावे, प्रेम, आपुलकी, आशा-आकांक्षा सगळं इथून तिथून सारखं. 

असं वाटतं की पुढेसुद्धा आयुष्यात कधी एकटं वाटेल, तेव्हा मन वाहत वाहत सावरूसच्या किनाऱ्याशी येईल आणि सगळं एकटेपण तिच्या उथळ, स्वच्छंदी प्रवाहासोबत वाहून जाईल. सावरूस ह्या फ्रेंच शब्दाचा अर्थ आहे चविष्ट. ह्या नदीचं पाणी चविष्ट असेल म्हणून कदाचित हे नाव पडलं असावं. असो, हजारो वर्षांपासून सावरूस वाहते आहे, कित्यके स्थित्यंतरं, पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या कित्येक नाट्यमय घटना या प्रदेशात तिने प्रत्यक्ष पहिल्या असतील, पण तिच्या उन्हाळी फुलांनी बहरलेल्या काठावर कित्येक रविवार घालवणाऱ्या दूरदेशातून आलेल्या माझ्यासारख्या मुलाची तिला नक्की आठवण राहील याची मला खात्री आहे.


(बेलफोर्ट)


# # # # #

Friday 17 May 2024

जर्मनी ट्रिप २ : फ्रॅन्कफुर्ट

 # # # # #

दुसरी जर्मनी ट्रिप ऐन थंडीच्या दिवसांत नोव्हेंबर मध्ये झाली त्याची ही गोष्ट.

३D प्रिंटिंग च्या जगतात होणारं सगळ्यात मोठं  एक्झिबिशन म्हणजे "फॉर्म नेक्स्ट". हे दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात जर्मनी मधल्या फ्रॅन्कफुर्ट शहरात भरतं. मेसे फ्रॅन्कफुर्ट नावाचं एक मोठं  एक्झिबिशन सेन्टर तिथे आहे. संपूर्ण जगातून अनेक ३D प्रिंटिंग च्या संदर्भात व्यवसाय करणाऱ्या कंपन्या तेथे तीन दिवस स्टॉल लावतात. मुंबईत असल्यापासून पीएचडी सुरू झाली तेव्हापासून हे एक्झिबिशन अटेंड करायचं असं मनात होतं आणि शेवटी  युरोपात राहायला आल्यापासून  कधी एकदा हे एक्झिबिशन बघायला जातो असं झालं होतं. त्यामुळे यावेळीचं २०२३ मधलं एक्झिबिशन बघायचंच असं मी मनोमन ठरवलं होतं.

त्यासंदर्भात माझे इथले गाईड प्रोफेसर यिशा झान्ग यांना मी सांगून पाहिलं तर त्यांना  सुद्धा हे एक्जीबिशन बघायला जायचं आहे असं कळालं परंतु ऐनवेळी झालं असं  की कामाच्या गडबडीत माझे प्रोफेसर हे पूर्णपणे विसरून गेले आणि जेव्हा जायची वेळ आली, अगदी एक आठवडा असताना  जेव्हा मी त्यांना रिमाइंड केलं  तेव्हा त्यांच्या लक्षात आलं  की बराच उशीर झाला आहे आणि डिपार्टमेंट कडून हे एक्झिबिशन अटेंड करण्याची परमिशन मिळेल असं वाटत नाही हे ऐकून फारच दुःख झालं. परंतु मी घाबरत घाबरतच त्यांना विचारलं  की मग मी स्वतःहून तिथे जाऊ शकतो का? तर त्यांनी होकार दिला आणि मी लगेच तयारी सुरू केली. 

फ्लिक्सबसचं तिकीट काढण्यापासून ते तिथलं एक हॉस्टेल बुक करेपर्यंत सर्व काम अगदी दोन-तीन दिवसात उरकलं. तिथे एक ए अँड ओ नावाचं होस्टेल आहे तर ते हॉस्टेल बुक केलं. फ्लिक्सबसचं तिकीट चाळीसेक युरो आणि जवळ पास वीसेक युरो हॉस्टेल चा रेट होता. निघायच्या दिवशी भर थंडीच्या दिवसात आत मध्ये थर्मल, वरून टी-शर्ट त्यावर एक हूडी आणि त्यावर घालायला एक मोठा ट्रेंच कोट घेतला आणि मफलर, डोक्यावर टोपी, हातात ग्लोव्हस आणि बर्फात चालता येईल असे जाड मोठे शूज घालून मी निघालो. बिल्डिंग सोडून खाली आलो  तेव्हा लक्षात आलं की नेक पिलो घरातच राहिली आहे परत पळत पळत नेक पिलो आणायला वर गेलो. नेक पिलो कपाटातून काढून घ्यायचा नादात ट्रेंचकोट हातात होता म्हणून बाजूला ठेवलेला तो तसाच घरात राहिला  तोपर्यंत बसची वेळ झाली होती  धावत पळत बस गाठली  बस मध्ये बसल्यानंतर लक्षात आलं  की ट्रेंचकोट घरी राहिला आहे!

आता इथून पुढे  इतक्या थंडीत सगळा मार्ग काढायचा होता  बेलफोर्ट वरून फ्रॅंक फुटला जाणारी ही बस कार्ल्सरुहे येथे थांबा घेणार होती आणि इथेच मला फ्रॅन्कफुर्टसाठीची बस बदलायची होती मध्ये अर्धा तासाचा गॅप होता  त्या हिशोबाने  ती बस  जवळपास पहाटे साडेतीन वाजता  कार्ल्सरुहे येथे पोहोचली  बस मधून बाहेर पडल्या पडल्या  चार डिग्री सेल्सिअस  तापमान होतं  त्यातून मी ट्रेंचकोट घरीच विसरून गेलो होतो  बस स्टॉपवर उभारताच प्रचंड थंडी वाजायला लागली  कारण कार्ल्सरुहे इथल्या फ्लिक्सबसच्या स्टॉपवर वेटिंग रूम नाही, बस स्टॉप उघडा आहे  त्यामुळे अगदी थंडीत कुडकुडत उभारावं लागलं. थंडीचे दिवस असल्याने दिवसही उशिरा उजाडतो  त्यामुळे अगदी  दाट काळोख होता  स्ट्रीट लॅम्पचा बारीकसा उजेड त्या बस स्टॉप वरती येत होता आणि अशात मी स्टॉप वर बसून होतो  मला पहिल्यांदा वाटलं की एका ठिकाणी बसून राहिलं  तर थंडी जरा कमी वाजेल  पण ते चुकीचं झालं  थंडी खूप वाजायला लागली  मग मी उठून इकडे तिकडे फिरायला लागलो  पण फिरल्यामुळे माझी जीन्स अगदी थंड पडली आणि त्यामुळे पायांना खूपच थंडी वाजायला लागली  बाजूलाच बस स्टॉप वरती  एक मुलगा उभा होता  त्यालाही बहुतेक फ्रॅन्कफुर्टचीच बस पकडायची होती. आपल्या फ्रेंच सवयीने सहज मी त्याला विचारलं "डू यु स्पीक इंग्लिश?"  तर तो म्हणाला, "येस, आय स्पीक इंग्लिश" आणि मग आमचं संभाषण सुरू झालं  मी त्याला विचारलं, "आर यू गोइंग टू फ्रॅन्कफुर्ट?".  तर तो म्हणालास  "येस".  पुढे मग कळालं कि तो तिथे कार्ल्सरुहे मध्ये कोणत्या तरी कॉन्फरेन्स साठी आला होता  आणि त्याला फ्रॅन्कफुर्टला जाऊन  विमानाने त्याच्या बोसनिया आणि हरजगोविना  या देशात जायचं होतं आणि त्यासाठी तो  फ्रॅन्कफुर्टच्या बसची वाट पाहत होता  त्याच्याशी गप्पा मारत असताना  हळूहळू थंडी वाजते आहे या विचारांकडून थोडसं दुर्लक्ष झालं आणि थंडी वाजायची भावना थोडी कमी झाली. यावरून लक्षात आलं कि जर कधी थंडीत असं अडकून पडायची वेळ आली तर सोबत असणाऱ्यांसोबत बोलत राहणे हा एक उपाय असू शकतो. त्याच्याशी बोलता बोलता लक्षात आलं की जवळच वायफाय असू शकतं. वायफाय बघितलं तर रेल्वे स्टेशनचं फ्री वायफाय उपलब्ध होतं. वायफाय कनेक्ट केलं तेव्हा लगेचच मेसेज आला  की बस एक तास उशिरा येणार आहे. खूप मोठा धक्का बसला. कारण इतक्या थंडीत कुडकुडत आणखी एक तास उभा राहायचं होतं. पण स्टेशनचं वायफाय कनेक्ट झाल्यामुळे रेल्वेस्टेशन कदाचित जवळच असावं अशी खात्री झाली आणि जर खूपच थंडी वाजली तर स्टेशनवर जाऊया हा विचार आला आणि आम्ही दोघेही तिथेच थांबलो. तो मात्र घाबरला होता  कारण त्याच्या फ्लाईटच्या वेळेत बसला उशीर झाल्याने कदाचित आता आम्ही पोहोचू शकणार आहोत की नाही हा संभ्रम तयार झाला. माझ्या मनात मध्येच हाही विचार येऊन गेला की इतक्या थंडीसाठी  कदाचित एखादी टॅक्सी पकडावी आणि टॅक्सीत बसून उगाचच एक चक्कर मारून यावी  तेवढाच टॅक्सीच्या हीटरमध्ये थंडी वाजणार नाही. एक 40-50 युरो गेले तरी हरकत नाही कारण एवढ्या थंडीच्या कहरात तब्येत बिघडते आणि हायपोथर्मियाचा अटॅक येतो की काय असं वाटत होतं. तो बोस्नियन मुलगा आता बस स्टॉप वर इकडे तिकडे फिरू लागला होता. तेवढ्यात त्याला त्याच्या ओळखीच्या दोन मुली भेटल्या. त्या सुद्धा कॉन्फरेन्स साठी आल्या होत्या आणि कॉन्फरेन्स मध्ये तो त्यांना भेटला होता. त्यांना सुद्धा फ्रॅन्कफुर्टला जाऊन तेथून ईस्ट युरोपमध्ये  त्यांच्या शहरात जायचं होतं. कदाचित बेलारूस. आता इतकं आठवत नाही. सारख्याच परिस्थितीत असल्यामुळे  ते सगळे चिंतेत होते. त्यातला एका मुलीला अत्यंत प्रचंड थंडी वाजत होती. ती सरते शेवटी म्हणाली कि मी स्टेशनमध्ये जाऊन बसते. बस येताच मला फोन करून बोलवा. आणि ती गेल. त्यानंतर जवळपास वीसेक मिनिटांनी बस आली  तेव्हा मग आम्ही तिला फोन केला. आणि मग बस पकडली. शेवटी कसाबसा सकाळी फ्रॅन्कफुर्टमध्ये सातच्या सुमारास होस्टेलला पोहोचलो. हॉस्टेलला पोहोचल्यानंतर दुसरा आश्चर्याचा धक्का बसला. हॉस्टेलचा चेकइन टाइम अकरा वाजता होणार होता म्हणजे मला आता रात्रभर इतका थकवणारा प्रवास करून आल्यानंतर सकाळी सात ते अकरा फक्त लॉबीमध्ये बसून वेळ काढायचा होता शेवटी कसाबसा रिसेप्शनिस्ट मुलीच्या हातापाया पडून दहा पर्यंत रूम मिळवली आणि रूममध्ये जाऊन एकदाचा बेडवर पडलो. साडेअकराच्या सुमारास एक्जीबिशन मध्ये जायचं होतं. त्यामुळे लगेचच तोंड वगैरे धुवून कपडे बदलले आणि एक्झिबिशनकडे निघालो. तेवढ्यात रिसेप्शनवरती एक मुलगा भेटला. त्याला रूम बुक करायची होती, परंतु त्याच्याकडे फक्त कॅश होती आणि तो पहिल्यांदाच टर्कीवरून फ्रॅन्कफुर्टमध्ये येत होता. त्याने माझ्या चेहऱ्यावरून ओळखलं की मी इंडियन आहे.  शक्यतो जर्मन, फ्रेंच इत्यादी लोक इतके मैत्रीपूर्ण नसतात आणि पहिल्यांदा भेट होत असेल तेव्हा तर अगदीच नाही. त्याला  रिसेप्शनिस्टने सांगितलं होतं की ते कॅश स्वीकारत नाहीत आणि त्याच्याकडे फक्त कॅश होती. त्यामुळे त्याला माझी मदत हवी होती. त्याने मला विचारलं, "आर यू इंडियन".  मी म्हणालो, "येस".  बिचाऱ्याने त्याची परिस्थिती पूर्णपणे मला समजावून सांगितली. तो पहिल्यांदाच स्टुडन्ट म्हणून टर्कीवरून जर्मनी मध्ये आला होता आणि घरून फक्त वडिलांनी दिलेली कॅश घेऊन आला होता. त्याने आधी एका दोघांना विचारलं पण कुणीही मदत करायला तयार नव्हतं. आणि त्यातून भाषेचा प्रॉब्लेम. मग मी त्याला माझं paypal वापरून रूम बुक करून दिली. त्याचे पूर्ण पैसे त्याने मला कॅश मध्ये दिले आणि पाच सात वेळा बोलता बोलता थँक यू  म्हणून मग निघून गेला. मी बाहेर पडलो. नोव्हेंबरचा महिना असल्याने रिपरिप पाऊस सुरू होता.  छत्री घेऊन मी जवळच्याच एका कॅफेमध्ये गेलो.  कॅफेमध्ये कॅपुचिनो आणि क्रोसों घेतला आणि त्यानंतर मग S-Bahn ने एक्झिबिशनकडे गेलो. एक्जीबिशन मध्ये  मुंबईचे माझे परिचित मोहित कुमार, जीत देसाई हे त्यांच्या त्यांच्या सॉफ्टवेअर कंपनीचं मार्केटिंग करायला तिथे आले होते. त्यांच्या सामीसान टेक या कंपनीचा स्टॉल तिथे होता. त्या स्टॉलवर जाऊन त्यांची भेट घेतली. थोड्याफार इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. सध्या प्रोजेक्टमध्ये काय सुरू आहे वगैरे ते त्याला सांगितलं. त्यांचं काय सुरू आहे ते विचारलं. त्यांनी STL फाईल रिपेअर करण्याचं सॉफ्टवेअर अत्यंत उत्तम प्रकारे तयार केलं आहे. आणि jewelry manufacturing साठी त्याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. त्यांच्याशी गप्प मारून मग मी निघालो आणि इतर स्टॉल बघायला सुरू केलं. बरीच नवनवीन टेक्नॉलॉजी पाहायला मिळाली. fraunhofer, stratasys, HP, xone अशा अनेक कंपन्याचे स्टॉल्स तिथे होते. शिवाय अनेक चायनीज सप्लायर्स सुद्धा होते. बऱ्याच अमेरिकन कंपन्या सुद्धा होत्या. एक-एक स्टॉल फिरताना बऱ्याच नवनवीन गोष्टी कळत होत्या. एके ठिकाणी काचेचं थ्रीडी प्रिंटिंग पाहिलं. ती ऑस्ट्रेलियन कंपनी होती. त्यानंतर बरेच मोठे मोठे थ्रीडी प्रिंटर्स लार्ज साईज, मीडियम साईज मशीन्स तिथे ठेवलेल्या दिसल्या. माझ्या प्रोजेक्टबद्दलसुद्धा बऱ्याच लोकांसोबत चर्चा केली आणि सात-आठ लोकांचे महत्वाचे कॉन्टॅक्टस घेऊन मग मी इतर स्टॉल्स पाहत फिरू लागलो. जवळपास चार-पाच मोठमोठ्या हॉलमध्ये हे एक्जीबिशन पसरलेलं होतं. एका दिवसात पाहणं अशक्यच होतं, त्यामुळे मग मी सरळ लंच करायला गेलो आणि लंच झाल्यानंतर जवळपास साडेतीन-चार वाजले होते. कालचा रात्रभराचा थकवणारा प्रवास आणि थंडी, त्यातून झालेलं जेवण, यामुळे बरीच झोप येऊ लागली. त्यामुळे मग हॉस्टेलला निघून आलो आणि सरळ झोपी गेलो. 

झोपेतून उठलो  तेव्हा हॉस्टेलवर एक रूममेट येऊन बसला होता. मस्तपैकी अगदी हळू आवाजात त्याचं गिटार वाजवत निवांत बसला होता. मी उठलो आणि त्याला गुडआफ्टरनून विश केलं. तो ऑस्ट्रेलियाचा होता. त्याचं नाव जॅस्पर. नुकतंच कॉलेज संपलेलं असल्याने सुट्ट्यांसाठी तो युरोपात फिरत होता. त्याची आई जर्मन आणि वडील ऑस्ट्रेलियन आहेत  आणि ते ऑस्ट्रेलियात राहतात. त्याने त्याच्या गिटारवर बरीचशी गाणी वाजवून दाखवली. त्यात मला सर्वात जास्त  लॉर्ड ऑफ द रिंग्स यातल्या काही ट्युन्स त्याने वाजवल्या ते खूप आवडलं इतरही अनेक गप्पा झाल्या. त्यानंतर मी डिनरला बाहेर निघून गेलो. मस्तपैकी एका कबाबच्या हॉटेलमध्ये जाऊन तुर्की हॉटेलात जाऊन  कबाब सँडविच खाल्लं. त्याला डोनर असं म्हणतात. शावरमाच्या जवळपास जाणारी  ही डिश. जेवण करून परत आलो. जॅस्परसोबत थोड्याफार गप्पा मारल्या आणि मग झोपी गेलो. दुपारी झोप घेतलेली असून सुद्धा  कालच्या थकव्यामुळे  खूप शांत झोप आली. सकाळी उठलो तेव्हा अजून एक रूममेट आलेला दिसला. तो फ्रान्समधील परपिन्या इथून आलेला होता. बोलता बोलता जॅस्पर म्हणाला की मला सुद्धा एक्झिबिशन बघायचं आहे. मग त्याचा सुद्धा पास तयार केला आणि त्याला एक्जीबिशन बघायला घेऊन गेलो. एखाद्या लहान मुलाने पहिल्यांदा जत्रेत जावे  तशा पद्धतीने तो एकदम हरखून जाऊन एक्झिबिशन पाहत होता. त्याच्यासाठी हे थ्रीडी प्रिंटिंग जग अगदी नवीन होतं. फारच मजा आली. मला सुद्धा बरंच काही शिकता आलं.

त्याच्यासोबत मग एक्सहिबिशनचे बरेच फोटो काढले. त्याने सुद्धा त्याच्या फोनमध्ये एक्झिबिशनचे बरेच फोटो काढले. आणि मग आम्ही सूप आणि ब्रेडचे लंच करून तिथून निघालो. मला फ्रॅंकफुर्ट शहर पाहायचं होतं. फ्रॅंकफुर्ट मधून वाहणारी  माईन नदी आणि तिच्यावरचा लोखंडाचा पूल (Eiserner Steg - Iron Bridge) पाहिला. हा केवळ पादचारी पूल आहे आणि त्यावर युरोपियन प्रथेप्रमाणे प्रेमी लोकांनी प्रेम कायम राहावे म्हणून कुलुपे लावून ठेवली होती. पुलावरून खाली दिसणारी माईन नदी आणि तिचे बांधीव काठ खूपच छान दिसत होते. लोक सायकलिंग आणि रनिंग करत होते. त्यानंतर कॉनस्टाब्लरवाशं याठिकाणी गेलो. हे शहराचं मध्यवर्ती ठिकाण आहे. तिथे अनेक हॉटेल्स आणि बरेचसे इतर व्यवसाय आहेत. एकएक दुकाने पहात आणि हॉटेलमध्ये एके ठिकाणी कॉफी एके ठिकाणी पोटॅटो फ्राईस खात-खात फिरत होतो. त्यानंतर माईन नदीकाठी बरेच फोटो काढले. मग माझ्या बसची वेळ झाली त्यामुळे परत बसस्टॉपला हाऊटबाहनहॉफला आलो. आणखीन तासभर वेळ होता. मग जवळच एक गणेशा नावाचं भारतीय रेस्टॉरंट आहे  तिथे जाऊन डिनर केलं. अगदी घरच्यासारखीच चव होती. चिकन मद्रास करी, रोटी, राईस हे सगळं खाऊन मन अगदी तृप्त झालं आणि मग परतीच्या प्रवासाला लागलो. 








Tuesday 7 May 2024

जर्मनी ट्रिप १ : ड्रेसडेन आणि फ्रायबर्ग

# # # # #

२८ सप्टेंबर २०२३

गोपाल ची इंटर्नशिप जर्मनी मध्ये फिक्स झाल्यापासून जर्मनी ला त्याच्याकडे फिरायला जायचं हे ठरवून झालं होतं. मुळात कॉन्फरेन्स सप्टेंबर च्या सुरवातीला जर्मनी मध्ये फ्रॅन्कफुर्ट ला झाली त्यानंतर त्याला मी सप्टेंबर च्या दुसऱ्या आठवड्यात फ्रांस ला आणून स्ट्रासबुर्ग दाखवून माझ्याकडे बेलफोर्ट ला घेऊन आलोच होतो. एक-दोन दिवस राहून तो फ्रायबर्ग ला निघून गेला तेव्हा घर खायला उठलं. खूपच एकटं वाटलं. शेवटी मग त्याचा युरोप मधला शेवटचा वीकएंड ठरवून मग मी त्याच्याकडे जर्मनीला  गेलो. 

बेलफोर्ट पासून फ्रायबर्गला जायचं म्हणजे फ्लिक्सबस हाच एक किफायतशीर पर्याय आहे. तरीही एका बाजूचं  तिकीट जवळपास ४० युरो पडलं. त्यातून फ्लिक्सबस बेलफोर्ट - स्ट्रासबुर्ग - ड्रेसडेन अशी आहे. ड्रेसडेन ला उतरून परत रेल्वे किंवा बसने फ्रायबर्ग गाठायचं असा हा बराच लांबचा जवळपास १८ तासांचा प्रवास होता, तो बस ड्रायव्हर आणि रस्ते कामांमुळे आणि ट्रॅफिक मुळे २० तासांचा झाला तो भाग वेगळा. कदाचित तो दिवसच वाईट असावा. पण चांगली गोष्ट म्हणजे बस मध्ये वायफाय आणि चार्जिंग पॉईंट होते आणि त्यामुळे मी बराच वेळ युट्युब बघण्यात घालवला. जर्मनी बद्दल, जर्मन लोकांच्या वक्तशीर पणाबद्दल ऐकलं होतं ते सगळं ह्या एका प्रवासात खोटं  ठरलं . त्यातून गोपाल मला घ्यायला फ्रायबर्ग वरून ड्रेसडेन ला बस ने येणार होता. तो सारख्या नंबरच्या दुसऱ्याच बस मध्ये जाऊन बसला आणि शिवाय ड्रायव्हर ने त्याला ड्रेसडेन चं तिकीट सुद्धा दिलं म्हणू न तो निश्चिन्त होता पण जवळपास तासभर प्रवास झाल्यावर त्याला आपण भलतीकडे आल्याचं समजल, आणि मध्येच उतरून तो परत बिचारा फ्रायबर्ग ला आला. मला एकट्यालाच ड्रेसडेन वरून फ्रायबर्ग ची रेल्वे घेऊन जावं लागलं. फ्रायबर्ग ला ट्रेन बुकिंग, ट्रेन प्रवास सगळं होऊन पोहोचेपर्यंत रात्रीचे पावणे बारा वाजले होते. फ्रायबर्ग स्टेशन ला मात्र रात्री गोपाल घ्यायला आला आणि माझ्या जीवात जीव आला. 

गोपाल चं घर रात्रीच्या अंधारात दुरून भूत बंगल्या सारखं दिसत होतं . जसं हॉलिवूड पिच्चर मध्ये दाखवतात तसं . छान बाग असूनही त्यात कमरेइतक गवत आणि झाडे झुडुपे वाढली होती. बाहेर कसलेही लाईट्स नाहीत, त्यामुळे अजूनच हॉरर मूवी चा अनुभव येत होता. पण एकदा मेन दार उघडून आत गेलो तेव्हा आतले प्रशस्त कॉरिडॉर, रुंद जिने आणि उंच छत पाहून बरं वाटलं . इमारत बरीच जुनी असली तरी आतून छान मॉडर्न ठेवली गेली होती. गेल्या गेल्या गोपाल ने जेवण गरम करून आणलं . कोबीची भाजी आणि चपाती खाऊन शांत वाटलं. शेजारी कोण राहतात याची चौकशी केल्यावर गोपाल  ने सांगितलं कि एक पाकिस्तानी विद्यार्थी आहे, एक ईराणी प्रोफेसर आणि एक नायजेरियन पी एच डी करणारी मुलगी आहे. मग गप्पा टप्पा करत रात्री दोनेक वाजता आरामात झोपी गेलो.

# # # # #

२९ सप्टेंबर २०२३

सकाळी जाग आली ती थंडी मुळे . मस्त गारवा सुटला होता. गोपाल  सुद्धा तेव्हाच उठला आणि मग आम्ही चहा केला. गोपाल ला आज युनिव्हर्सिटी मध्ये एक मीटिंग होती. त्यामुळे दोघेही आवरून मग युनिव्हर्सिटी ला गेलो. Technische Universitat Bergakademie Frieberg (Technical Mining University Freiberg) असं त्या युनिव्हर्सिटी चं नाव. फ्रायबर्ग हे आधी खाणकामा साठी प्रसिद्ध होतं . त्यामुळे खाणकामाशी संबंधित युनिव्हर्सिटी इथे आहे. पण कालानुरूप इथे खाणकामाव्यतिरिक्त इतरही इंजिनियरिंग चे विषय शिकवले जातात. नाश्ता न केल्यामुळे भूक लागली होती म्हणून पहिल्यांदा मेस (Mensa) मध्ये गेलो. तिथे चिकन बर्गर होते. परंतु गोपाल बर्गर खात नसल्याने त्याने फक्त फ्रेंच फ्राईज तेवढ्या खाल्ल्या. मग जमेल तिथे फोटो काढत काढत गोपाल च्या लॅब मध्ये पोहोचलो. लॅब सुनसान होती, बहुतेक लंच टाइम असल्याने सगळे गेले असावेत. 

त्याची मीटिंग सुरु झाली तेव्हा मी परत घरी आलो. तेव्हा तिथे रोहित आणि ऋषी असे दोन इंडियन स्टुडंट्स भेटले. नुकतेच त्या अपार्टमेंट मध्ये राहायला आलेले होते. मुळात पूर्ण ड्रेसडेन आणि फ्रायबर्ग मध्ये कित्यके इंडियन, पाकिस्तानी, बांगलादेशी स्टुडंट्स आहेत. त्यांनंतर रूम मध्ये येऊन जे झोपलो ते थेट ५ वाजता उठलो. कारण कालचा दिवसभराचा प्रवास. संध्याकाळी गोपाल आला तेव्हा मग आम्ही चहा करायला घेतला. तितक्यात ते इराणी प्रोफेसर किचन मध्ये आले. त्यांचं नाव इनायत. बऱ्याच वेळ त्यांच्याशी गप्पा झाल्या, त्यांनी इराण चं अकॅडेमिकस कसं काम करतं ते सांगितलं . शिवाय त्यांना भारत आवडत असल्याचं सुद्धा सांगितलं . जोधा अकबर नावाची सिरीयल ते आणि त्यांचं कुटुंब पाहतं असं त्यांनी सांगितलं. बोलायला ते फारच मोकळे आणि मनमिळावू वाटले. नंतर मग कौफलँड म्हणून एक जवळच डिपार्टमेंटल स्टोर आहे, तिथे चिकन आणि इतर किराणा आणायला गेलो. कौफलँड मध्ये जवळपास ५०% जनता इंडियन, पाकिस्तानी वगैरे दिसत होती. आणि सगळे युनिव्हर्सिटी स्टुडंट्स. आपली लोकं पाहून जरा बरं वाटलं. 

घरी येऊन मग मस्तपैकी चिकन बनवल आणि खाऊन झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी ड्रेसडेन फिरायला जायचं होतं . 

# # # # #

३० सप्टेंबर २०२३

पहाटे बरीच थंडी होती. साधारण ६ डिग्री वगैरे असावं तापमान. सकाळी उठायला उशीर झाला आणि सडे आठ वाजता ड्रेसडेन ला जायची बस चुकली. मग त्यानंतर ट्रेन होती पण ती जवळपास साडेचार यूरोने महाग असल्याने आम्ही मग साडे अकराच्या बसने जायचं ठरवलं . बसने ड्रेसडेन मध्ये मुख्य स्टॉप हाऊप्टबानहॉफ ला पोचल्या पोचल्या तिकीट व्हेंडिंग मशीन वरून पहिल्यांदा डे पास घेतला. मग ग्रोसर गार्डन पाहायला गेलो. फार मोठं गार्डन आहे, आणि त्यात मध्यभागी एक महाल आहे. ट्राम ने पोहोचून गार्डन मध्ये गेल्या गेल्या खूप छान दृश्य पाहायला मिळालं. बाजूलाच नदी होती, त्यात संथ बोटी चालत होत्या, आणि आजूबाजूला दाट झाडी. सर्व परिसर अगदी स्वच्छ आणि चकचकीत दिसत होता. आपल्याकडे भारतात असलं गार्डन म्हटलं कि आजूबाजूला भुट्टे, पाणीपुरी, भेळ, आईस्क्रिम विकणारे गाडे लागतील, मग त्यांचा कचरा आजूबाजूला पडलेला राहील आणि सर्वत्र अगदी गजबजाट होऊन त्या जागेची शांतता लगेच भंग होईल. पण इथे अगदी सायकल चालवणारे, धावणारे, आपापल्या लेन ने जात होते आणि असले काही विकणारे, फेरीवाले अजिबात दिसत नव्हते. त्यामुळे तिथली शांतता, निसर्ग आणि स्वच्छता एन्जॉय करता आली. चालत चालत मग महालात पोचलो. महाल संपूर्णपणे खुला नसला तरी तिथे एक फॅशन एक्सहिबिशन सुरु होतं. ते पाहायला आम्ही गेलो. प्लास्टिक, कार्डबोर्ड, टाकाऊ कपडे, इत्यादींपासून खूप छान कपडे बनवून ते तिथे पुतळ्यांना घातले होते. काही कपडे अर्थात फारसे चांगले नव्हते, पण बऱ्यापैकी एक्सहिबिशन चांगलं होतं . ते पाहून मग आम्ही परत ट्राम घेऊन मुख्य शहरात आलो. आणि तिथे चर्च, म्युझियम, झ्विंगर म्हणून एक इमारत आहे अशा ठिकाणी आलो. खूप ऐतिहासिक शहर वाटत होतं ते. तिथे बरेच फोटो घेतले. आणि मुख्य चौकात आलो, तेव्हा कसलातरी ख्रिश्चन लोकांचा इव्हेंट चालला होता. पुरुष फॉर्मल काळ्या कोटावर पांढरे झगे चढवून आणि विशिष्ट प्रकारची गोंडा असलेली टोपी घालून रांगेत चर्च मध्ये जात होते. चर्चच्या घंटा जोरजोराने घंटानाद करत होत्या. त्यामागून मग स्त्रिया काळे झगे घालून, आणि काळ्या टोप्या घालून रांगेने चर्चमध्ये गेल्या आणि चर्च चं दार बंद झालं . आम्ही हि सगळी गम्मत बघत बाहेर गर्दीत उभा होतो.  मग पुढे जाऊन त्या भागातली, आणि ड्रेसडेन शहर जिच्या काठावर वसलं आहे, ती एल्ब नदी पहिली. शहर खूपच सुंदर वाटलं. मग तिथेच एक टेरेस आहे, त्यावर जाऊन कारंजे वगैरे पहिले आणि मग के एफ सी मध्ये गेलो. दिवसभर फिरून खूपच भूक लागली होती. के एफ सी मध्ये काम करणारी सगळी मुले-मुली भारतीय होती. भरपूर खाऊन मग हाऊप्टबानहॉफ ला परतलो. फ्रायबर्ग ला परतणाऱ्या बस मध्ये वायफाय होतं . त्यामुळे सगळे फोटो शेअर करून घेतले.  घरी जाऊन मग कालचं चिकन आणि भात भरपूर उरला होता. ते खाऊन मग झोपी गेलो.

# # # # #

१ ऑक्टोबर २०२३

आज सॅक्सन स्विस नॅशनल पार्क ला जायचं ठरलं होतं . पण बस अव्हेलेबल नव्हती. मग Nossen  Markt च्या स्टॉप वरून वळसा घालून जाणारी बस मिळाली. वेळ लागला, पण एक महत्वाची गोष्ट त्या प्रवासात घडली. बस मध्ये एक मुलगा बराच वेळ आम्ही काय करतोय, काय बोलतोय ते पाहत होता. आम्ही ड्रेस्डेन ला उतरल्या उतरल्या गोपाळ ने त्याला जवळ जाऊन सांगितलं कि अमुक ठिकाणी जायचं आहे, कसं जायचं? आम्ही सांगितल्यावर तो म्हणाला माझ्या सोबत या. मला थोडी भीती वाटत होती, कि हा कुठे नक्की घेऊन जाईल. पण गोपाळ त्याच्यासोबत पुढे गेला. त्या मुलाने न विचार करता आमच्यासाठी तिकीट मशीन कशी ऑपरेट करायची ते दाखवलं, तिकीट काढायला मदत केली  आणि शिवाय आमचा प्लॅटफॉर्म कुठे आहे ते सुद्धा दाखवलं, कारण प्लॅटफॉर्म वरच्या मजल्यावर होता. हे माझ्यासाठी सर्वस्वी नवीन होतं . कारण फ्रांस मध्ये मला इतक्या सौजन्याचा आणि मदत करण्याच्या वृत्तीचा अनुभव कधीच आला नाही. फ्रेंच लोक मुळातच खूप बुजरे असतात आणि त्यातून फॉरेनर्स साठी तर जास्तच अंतर राखून वागतात. 

मग रेल्वे ची वाट पाहत गोपाळ आणि मी प्लॅटफॉर्म वर उभे राहिलो. प्रचंड गर्दी होती. कदाचित सगळेच रविवार ची सुट्टी असल्याने नॅशनल पार्क फिरायला चालले असावेत. शेवटी रेल्वे आली. डबल डेकर रेल्वे मध्ये बसण्याचा अनुभव खूप छान होता. लोक दाटी वाटी न करता अगदी आरामात जागा मिळेल तसे बसत होते. डब्यातील काही जागा हि सायकल ठेवण्यासाठी होती. सायकल घेऊन प्रवास करणारे सायकलिस्ट सुद्धा बरेच होते. गर्दीत भारतीय लोकांची संख्या पण लक्षणीय होती. शेवटी थोड्या कष्टांनंतर आम्हाला वरच्या बाजूला हवी तशी जागा मिळाली. आणि रेल्वे हळू हळू ड्रेस्डेन च्या शहरी भागातून बाहेर पडली. त्यानंतर काय एकेक दृश्य दिसत होती! डाव्या बाजूला संथपणे वाहणारी एल्ब नदी, उजव्या बाजूला टुमदार घरांची छोटी छोटी गावे. एकेक स्टेशन येईल तसे तसे लोक उतरत होते. मध्ये एक स्टेशन आले Kurort Rathen नावाचे. तिथे बऱ्यापैकी रेल्वे रिकामी झाली आणि आम्ही पुढे आमच्या Bad Schandau स्टेशन ला उतरलो. आधी माहिती घेतल्याप्रमाणे तिथे एक ट्रेकिंग ची माहिती देणारे सेंटर आहे आणि तिथे जाऊन माहिती विचारायची असं ठरलं होतं . त्यानुसार तिथे पोचलो तर कळलं कि ट्रेक तिथून बरेच लांब आहेत आणि तेवढ्यात एक तुर्की पोस्ट डॉक्टरल येऊन आम्हाला भेटला आणि माहिती विचारू लागला. आम्हालाच काही समजत नसल्याने आम्ही हवालदिल झालो होतो त्यामुळे मग आम्ही त्याला निरोप देऊन google map  वर नीट ठिकाण शोधलं तर ते मुळात Kurort Rathen हेच स्टेशन होतं, जिथे मगाशी रेल्वे रिकामी झाली होती. पुन्हा पळत जाऊन परत जाणारी रेल्वे घेऊन आम्ही शेवटी Kurort Rathen  ला उतरलो. तर तिथे ते टुरिस्ट सेंटर सुद्धा सापडलं , त्यांनी नकाशा सुद्धा दिला आणि आम्ही निश्चिन्त झालो. मग आरामात आधी फ्राईज खाल्ल्या. इथे जर्मनी मध्ये सगळीकडे कॅश मागायची पद्धत आहे. कार्ड ने किंवा ऑनलाईन व्यवहार शक्यतो करत नाहीत. नशिबाने कॅश होती जवळ म्हणून सगळं पार पडलं . 

आता फेरीबोट ने नदी ओलांडून पलीकडे जायचं होतं . तीन युरो हे जाण्याचं आणि परत येण्याचं तिकीट होतं . बोटीच्या रांगेत थांबलो. त्या बोटीत जवळपास शंभर एक लोक दाटीवाटीने उभे करून त्यांनी नदी ओलांडून दिली. नदी ओलांडून rathen गावात शिरलो आणि तिथलं सृष्टी सौंदर्य पाहून थक्क झालो. अगदी प्रत्येक जागा हि फोटो घेण्यालायक होती. सावकाशपाने चालत वस्तीत शिरलो, सर्व घरे अगदी नीटनेटकी, स्वच्छ आणि टुमदार दिसत होती. बाजूनेच एक लहानसा ओढा वाहत होता. त्याच्या कडेकडेने आम्ही चालत होतो. सर्वत्र रविवारची हलकीशी गर्दी दिसत होती. लोक आपापल्या कुटुंबासोबत, मित्र मैत्रिणींसोबत आले होते. थोड्याच पुढे एक तलाव दिसला. खूप सुंदर दृश्य होत ते. बाजूने मोठमोठाले पर्वत, जंगल आणि मधोमध तलाव आणि त्याच्या बाजूने जाणारा निमुळता रास्ता. तलावात लोक शांतपणे बोटींग चा आनंद घेत होते. गोपाळ ची बोटींग ची इच्छा होती पण बोटींग ला वेळ घालवला असता तर मग पुढचं पाहायचा राहून जाईल म्हणून मग आम्ही तसेच पुढे गेलो. पुढे पायऱ्या सुरु होत होत्या. पायऱ्या सुद्धा खूप कलेने बनवल्या होत्या. लाकडी फळ्या उभ्या करून त्यांच्या मध्ये वाळू भरून पायऱ्या तयार केल्या गेल्या होत्या. 

जवळपास चारेक हजार पायऱ्या असतील, पण त्या खूपच कडेकपारीतून जाणाऱ्या आणि मध्ये मध्ये गुहा, झाडे, दगड यांच्यामुळे बऱ्याच नागमोडी आकाराच्या होत्या. चढायला जवळपास दोन तास गेले असतील. पण एकदा चढून वर गेलो आणि हुश्श झालं . मग वरती पठारासारखा भाग होता त्यामुळे फिरताना जास्त कष्ट पडले नाहीत.

नंतर बॅस्टेई पूल पाहायला जायच्या रस्त्याला लागलो. बॅस्टेई पूल हा दोन डोंगरांच्या मध्ये अगदी उंचीवर तयार केला गेला आहे. फक्त चालत जाण्यासाठी तयार केल्या गेलेल्या या पुलावरून rathen  गावाचे विहंगम दृश्य दिसते. जवळपास तासभर त्या देखाव्याच्या भुलीत पडून आम्ही तिथे थांबून राहिलो होतो. मग खाली उतरण्याच्या रस्त्याला लागलो. खाली उतरताना इतका त्रास जाणवला नाही. पण इथला रस्ता सुद्धा जरा सोपा वाटला . लहान लहान पायऱ्या आणि शक्यतो उतार  होता. त्यामुळे कष्ट वाचले. उतरून आल्यावर परत फेरीबोट घेऊन Kurort rathen  स्टेशन ला गेलो आणि ड्रेस्डेन ला परतलो. आणि नंतर दुसऱ्या दिवशी मग बेलफोर्ट ला परतीचा प्रवास.

# # # # # 




बनाना फ्लॉम्बे

# # # # #

फ्रान्स मध्ये लंच अवर सिरियसली घेतला जातो. साधारणपणे दुपारी बारा ला जेवायला बसून आरामात गप्पा मारत शेवटी दीडेक तासाने कॉफी घेऊन मगच कामाची परत सुरुवात होते. तर परवा गप्पांचा विषय होता ख्रिसमस. इथे जवळच स्ट्रासबुर्ग शहरात भरणारं ख्रिसमस मार्केट संपूर्ण फ्रांस मध्ये प्रसिद्ध आहे. गप्पांच्या ओघात माझी फ्रेंच सहकारी ऍलिस हिने तिच्या घरी ख्रिसमस ला केली जाणारी स्वीट डिश "बनाना फ्लॉम्बे (banana flambé)" विषयी सांगितलं. तशी हि खास ख्रिसमस डिश नाही. पण त्यांच्या घरी आवडत असल्याने बनवतात. ख्रिसमस डिशेस म्हणजे चौथ्या म्हणजेच मेन कोर्स ला खाल्ल्या जाणाऱ्या "दांद (Dinde)" ज्याला आपण टर्की म्हणतो आणि "फ्वाग्रा (Foie Gras)" म्हणजे fat duck liver ह्या आहेत.  बनाना फ्लॉम्बे बनवायला सोपी असल्याने मी करून पहिली, आणि मला खूप आवडली. त्याची कृती इथे देत आहे. फ्लॉम्बे ही एक कृती आहे. जसं sauté करणं ही तीव्र आच आणि कमी तेलावर भाजण्याची एक कृती आहे, त्याप्रमाणेच पदार्थावर अल्कोहोल शिंपडून आग लावून त्यावर पदार्थ भाजण्याच्या कृतीला फ्लॉम्बे करणं असं म्हणतात. 

साहित्य:
केळी (२)
बटर (२० ग्रॅम)
साखर (२० ग्रॅम)
४०% अल्कोहोल असणारी दारू, शक्यतो रम वापरावी (१५ मिली)

कृती:
१. पॅन गरम करून त्यात बटर आणि साखर घालून विरघळून घ्यावी.
२. केळीचे मध्यम तुकडे करून घ्यावेत. 
३. मध्यम आचेवर साखर आणि बटर चे मिश्रण ढवळत राहावे, साखर कॅरॅमलाईझ होऊ लागेल तेव्हा  त्यात केळीचे तुकडे घालून आच बंद करावी. आणि मिश्रण ढवळत राहावे. साखर संपूर्ण कॅरॅमलाईझ होईपर्यंत थांबू नये, कारण बटर च्या उष्णतेमुळे आच बंद करूनही काही वेळ कॅरॅमलाईझेशन  सुरु राहते. थोडासा अंदाज घेऊन हे करावे. 
४. यानंतर महत्वाची आणि काळजीपूर्वक करण्याची कृती म्हणजे फ्लॉम्बे. मिश्रणावर रम शिंपडून लगेच गॅसयुक्त लायटर किंवा पेटत्या काडीने ती रम पेटवून द्यावी. आग सुरु असताना मिश्रण हलवायची गरज नाही. हे करताना हातावर भडका उडणार नाही अशा बेताने हे करावे. ४०% किंवा त्याहून जास्त अल्कोहोल असेल तरच दारू पेट घेईल त्यामुळे अल्कोहोल कन्टेन्ट पाहून दारू घ्यावी. १५ मिली पेक्षा जास्त दारू घेतल्यास फ्लॉम्बेला केमिकल सारखा वास येतो त्यामुळे जास्त दारू वापरू नये. काहीवेळा ज्योत निळसर रंगाची आणि मंद असल्याने दिसत नाही, काळजीपूर्वक वाट पाहून मगच मिश्रण ढवळावे. आग बंद झाल्यावर सावकाश मिश्रण ढवळून गरम गरम वाढावे. काही ठिकाणी आईसक्रिम सोबत हे वाढतात, पण माझा अनुभव आहे की थंड झाल्यावर बटर घट्ट होते आणि हवी तशी चव येत नाही.

Tuesday 20 June 2023

कोक-ओ-वां

# # #

कोक-ओ-वां (Coq-au-vin) चा शब्दशः अर्थ होतो वाईन मध्ये शिजवलेला कोंबडा. फ्रेंच लोक त्यांच्या चीझ, वाईन, ब्रेड, चिकन, बीफ आणि पोर्क यांच्याशिवाय जगू शकत नाहीत. त्यामुळे कोक-ओ-वां मध्ये वाईन, चिकन, बटर यांचा संगम झालेला पाहायला मिळतो. मी शिकलेल्या फ्रेंच रेसिपी मधली ही पहिली. कोक-ओ-वां करण्याच्या अनेक कृतींपैकी ही एक माझा बेलफोर्टमधला जुना घरमालक एरिक ने मला शिकवली आहे. व्यक्ती आणि प्रदेश यांनुसार ही रेसिपी बदलते. असं असलं, तरी मूळ घटक सारखे असल्याने त्याची एक विशिष्ट चव असते. तर रेसिपी खालील प्रमाणे:

साहित्य (दोन माणसांसाठी):

मॅरिनेड साठी साहित्य:
चिकन        : :२ लेग संपूर्ण आणि १ ब्रेस्ट चे मध्यम तुकडे
रेड वाईन      : ७५० मिली (शक्यतो कॅबर्ने सॉविन्यो (Cabernet Sauvignon) किंवा पिनो नोआ (Pinot Noir) वापराव्यात.
कांदे             : ३ मोठे 
मिरची         : १ मध्यम 
काळी  मिरी : २ लहान चमचे 

मॅरिनेड ची कृती:
१. एका बाउल मध्ये खाली कांद्याच्या चकत्या, मिरचीचे तुकडे, मिरी, घालून त्यावर चिकन चे पीसेस ठेवावेत. 
२. हे सर्व बुडेल इतपत रेड वाईन त्यावर घालून, झाकून फ्रिज मध्ये १२ ते २४ तासांसाठी ठेवून द्यावं (शक्यतो ७५० मिली वाईन पुरेशी होते). 

मुख्य कृतीचे साहित्य:
गाजर        : २ मध्यम 
मश्रूम         : ४-५ मध्यम 
बटर           : ४ मोठे चमचे  (आधीच फ्रिज मधून काढून मऊ होईपर्यंत ठेवावं)
पार्सले        : ४ काड्या
ऑलिव्ह तेल : २ मोठे चमचे (नसेल तर बिनवासाचं कोणतही)
मैदा             : २ लहान चमचे

मुख्य कृती:
१. मॅरिनेड मधून चिकन, कांदे, मिरचीचे तुकडे काढून वेगळे करावेत. 
२. उरलेलं मॅरिनेड एका पातेल्यात घालून उकळायलाठेवावं. उकळताना वर येणारे फेसाचे थर काढून टाकत राहावं. साधारण ८०% होईपर्यंत उकळावं. 
३. चिकन पुसून कोरडं  करून घ्यावं. 
४. एका खोलगट पातेल्यात १ चमचा ऑलिव्ह/इतर तेल घालून त्यात २ चमचे बटर घालावं (याठिकाणी बेकन वापरतात, पण वास आवडत नसल्याने मी वापरत नाही, तुम्ही बेकन वापरू शकता).
५. त्यावर चिकन चे तुकडे तपकिरी होईपर्यंत भाजून घ्यावेत (५-७ मिनिटे प्रत्येक बाजूने) आणि एका प्लेट मध्ये काढून ठेवावेत. 
६. त्याच तेलात मॅरिनेड मधून काढलेला कांदा, मिरच्या थोड्याश्या भाजून मग त्यात गाजराचे तुकडे घालावेत.
७. गाजर मऊ झालं, कि त्यात भाजलेलं चिकन घालून, वरून आटवलेली वाईन घालावी. पाणी घालून रस्साभाजीसारखा पातळपणा आणावा. काहीजण चिकन स्टॉक पण घालतात. तो असेल तर उत्तम.
८. हे संपूर्ण मिश्रण १५ मिनिटे उकळावे. एका बाजूला पॅन मध्ये बटर गरम करून मश्रूम च्या चकत्या त्यात भाजून घ्याव्यात. मश्रूम मऊ होऊन त्यांचा वास कमी व्हायला हवा. मग ते मश्रूम पण मिश्रणात घालावेत. 
९. उरलेल्या २ चमचे बटर मध्ये २ चमचे मैदा घालून फेटून त्याचा गोळा करावा. ह्याला बुएर- मॅनी (Beurre-Manie) म्हणतात. आणि तो मिश्रणात घालून एकसारखं मिश्रण ढवळून घ्यावं . त्याने घट्टपणा येतो. 
१०. मग हे मिश्रण एका भांड्यात काढून OTG ला १२०° सेल्सिअस ला ४० मिनिटे ठेवावे. 

गरम गरम सर्व करावे. हे नुसतंच किंवा ब्रेड सोबत खाल्लं जातं.


मॅरिनेडचं साहित्य (चिकन, कांद्याच्या चकत्या, मिरची, वाईन आणि मिरी)

एका भांड्यात खाली कांद्याच्या चकत्या, मिरच्या टाकून वर चिकन ठेवून मिरी घालावी.

हे सर्व बुडेल इतकी वाईन आणि मग प्लास्टिक रॅप ने झाकून फ्रिज मध्ये १२-२४ तास ठेवावं

भाज्या - बटाटा, गाजर आणि सोबत बटर. चिकन, कांदे, मिरची वाईन मधून काढून वेगळे करावे. 

चिकन ऑलिव्ह तेल आणि बटर मध्ये तळून घ्यावं

मॅरिनेड ची वाईन उकळून ८०% करावी 

अनुक्रमे कांदे, मिरच्या, बटाटे आणि गाजर चिकन तळलेल्या भांड्यात परतून घ्यावे. 

चिकन घालून वाईन, स्टॉक किंवा पाणी घालून उकळी घ्यावी.

वेगळ्या भांड्यात मश्रूम तळून घ्यावेत, आणि चिकन वर घालावेत.

बटर आणि मैद्याचे मिश्रण 

बटर आणि मैद्याचे मिश्रण 


OTG  ला ५० - ६० मिनिटे १२०° वर  ठेवावे. 

तयार कोक-ओ -वां

बाउल मध्ये गरम गरम वाढावे.



Wednesday 26 April 2023

मुंबई ते बेलफोर्ट

बेलफोर्ट चा प्रवास. 

काय आणि कुठून सुरु करायचं? कितीतरी लढाया वैयक्तिक, व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर लढायची पहिलीच वेळ. आपण हे करू शकणार आहोत का हा स्वतःला पडलेला पहिला प्रश्न. आणि हे करायचंच आहे का? हा दुसरा. चांगलं चाललंय कि सगळं. कशाला उगाच हजारो किलोमीटर दूर जाऊन पडायचं? वगैरे वगैरे. 

तर तयारीची पहिली सुरुवात झाली Aviophobia पासून. आणि मुळात Cleithrophobia असल्याने विमान ही त्या भीतीची अत्युच्च पातळी. नुसतं एअरपोर्ट चं नाव काढलं कि अंगावर काटा यायचा. आता हे एवढे मोठं मोठाले विमान प्रवास झाल्यानंतर त्या phase बद्दल हसू येतं, पण ते जे काही होतं, अगदी खरं होतं आणि तेव्हा माझ्यासाठी अशक्य होतं. रात्रीतून अचानक दचकून जाग  यायची, पोटात आतड्यांना पीळ पडतोय असं वाटायचं, भूक नाही, काही करायची इच्छा नाही. वेगळीच मनस्थिती होती. शेवटी दीपाली पुरंदरे यांना गाठलं. प्रचंड सकारात्मक बाई. त्यांनी नुसतं good morning इतकं  म्हटलं फोन वर  तरी मन हलकं होऊन जायचं. त्यांना बोललो सगळं जे काही आहे ते सुरुवातीपासून सांगितलं. पॅनिक अटॅक, मग तो पॅनिक अटॅक कुठेही येण्याची भीती, मग त्यातून पॅनिक अटॅक आला तर पटकन निसटता येणार नाही अश्या जागांची भीती आणि मग जिथे जाईल तिथे exit शोधण्याची लागलेली मानसिक सवय, खूप मोठा struggle होता. पण दीपाली  च्या नुसत्या counselling ने माझा वर्षा नु वर्षे सुरु असलेला struggle  थांबवला. मला नवीन विचार करण्याची दिशा दिली. फेसबुक वर Cleithrophobia सपोर्ट ग्रुप जॉईन केला. त्यातून पण बरीच माहिती मिळत गेली. आणि मी हळू हळू स्वतः ला बदलू शकलो. अजूनही ती प्रोसेस सुरू आहे. जमेल हळू हळू, मग शुभम च्या मदतीने आणि दीपाली  च्या भरवशावर थरथरत्या हाताने मुंबई अहमदाबाद विमानाचं तिकीट काढलं. कसंबसं स्वतः ला ढकलत ढकलत का होईना एअरपोर्ट वर  गेलो आणि पहिला विमान प्रवास पार पडला. एक फार मोठी वैयक्तिक लढाई मी जिंकलो होतो. त्याबद्दल शुभम, दीपाली चे आभार. त्या दोघांनाही हे श्रेय जातं. 

पुढची लढाई होती ती आपल्या माणसांना सोडून जाण्याची. भारत सोडून कधीही कुठे प्रवास केला नसल्याने काय होईल याची हुरहूर, त्यातून सगळीच अनिश्चितता, मुंबई मधल्या जॉब चे संपत आलेलं कॉन्ट्रॅक्ट त्यामुळे एकमेव ऑपशन असलेला फ्रान्स. २०१७ पासून पाचेक वर्ष काढल्यानंतर मुंबई सोडून जायचं जीवावर आलं  होतं. आता हे सगळं असणार नाही अशी वेगळीच भावना होती. एक प्रकारची मानसिक सवय झाली होती सगळ्याची. एखादं  चांगलं रुजलेलं मोठं झाड अचानक उपटून दुसरीकडे लावावं असं काहीसं झालेलं. परदेश म्हणजे खूप मोठं काहीतरी, भव्य दिव्य असलं काहीतरी खूळ डोक्यात होतं. आता इथे आल्यावर ते किती छोटं आणि बिनमहत्वाचं असतं ते कळलं. पण तेव्हा अक्षरशः फक्त पाच महिने कामाला असलेल्या housemaid ने जेव्हा माझ्या भरलेल्या बॅग्ज पाहून  "भाऊ निघालात? मुंबईत आलात तर नक्की सांगा. तुम्ही आधी सांगितलं असतं तर कायतरी गिफ्ट घेऊन आले असते." म्हटलं तेव्हा सुद्धा डोळ्यात पाणी आलं. शेवटच्या दिवशी PhD ग्रुप ला शेवटचं भेटलो तेव्हा सुद्धा भरून आलं . "अब खाना कौन बनायेगा? ट्रीप प्लॅन कौन करेगा?" असं श्रुती म्हणाली तेव्हा मात्र रडू आवरलं नाही. सगळेच खूप भावुक झाले होते. अक्षरशः डोळे पुसत पुसत टॅक्सी मध्ये बसलो आणि टॅक्सी सोलापूर च्या मार्गाला लागली. 

कल्पित चं लग्न या सगळ्याच्या मध्ये आलं हा खूप मोठा रिलीफ होता. त्यामुळे सगळ्यांच्या भेटी झाल्या, एन्जॉय करता आलं. पण त्याच लग्न झालं त्या रात्री आता पुढची स्टेप म्हणजे मला निघायच आहे हे कळून खूप आत तुटल्यासारखं झालं. झोप आली नाही. मग सोलापूर ला येऊन बॅग्ज भरणे, डॉक्टर अपॉइंटमेंट, या सगळ्या गोष्टी हळू हळू सुरु होत्या. आणि जायच्या आदल्या दिवशी मात्र खूप शांत झोप लागली. बॅग्स वगैरे भरल्याने, आणि काका कांकींनी खूप छान डिनर पार्टी दिल्याने निवांत झालो होतो. 

दुसऱ्या दिवशी निघताना सुद्धा शांत वाटत होतं. अजिबात गडबड गोंधळ काही नाही. फक्त घसा तेवढा दुखत होता. आणि थोडंसं ताप आल्यासारखं वाटत होतं. विकनेस होता. काका, अर्णव आणि पजू सोडवायला येणार होते म्हणून काहीही वाटलं नाही. पण प्रवास सुरु झाला, तसं हळू हळू घसा थोडा दुखायला लागला, ताप आल्यासारखं वाटलं. त्यात न्यूज कळली कि माझी पॅरिस हुन बेलफोर्ट ला जाणारी ट्रेन कॅन्सल झाली आहे. स्ट्राईक असल्याने ट्रेन्स रद्द आहेत हा मेल आला. मग थोडासा डिस्टर्ब झालो. कारण पुढे फक्त बस हाच ऑपशन होता आणि बस पहाटे ६ वाजता पोचवणार होती मग बस स्टॉप वरून घरी कसं जायचं हा प्रश्न होता. पण बरं झालं airbnb चा मालक स्वतः गाडी घेऊन येतो म्हणाला. पण नाहक पॅरिस मध्ये हॉटेल चा खर्च वाढला. हा सगळा विचार डोक्यात चालू असताना एकीकडे अंगदुखी आणि ताप वाटतच होता. त्या सगळ्या गोंधळात काकांनी चहा साठी गाडी एका धाब्यावर थांबवली तेव्हा परत येताना मी दुसऱ्याच कार चा दरवाजा उघडला. सगळे हसले.

शेवटी रात्री चं जेवण खाण आटोपून काकांनी रात्री एअरपोर्ट ला सोडलं तेव्हा लॅब मधून यश, गोपाळ आणि योगेश आले होते. सगळ्यांना बाय करून एअरपोर्ट मध्ये शिरलो. सगळे सोपस्कार पार पडून अर्धा तास आधी गेट वर पोचलो. आणि एकदाचा सुरु झाला फ्रान्स चा प्रवास. दुखत असलेला घसा  आणि थोडासा ताप सोडला तर प्रवासात काही त्रास झाला नाही. पॅरिस ला मात्र भयंकर थंडी वाजली आणि थंडीशी जुळवून घ्यायला बराच वेळ गेला. 

सध्या हळू हळू अड्जस्ट होत आहे, नवीन गोष्टी पाहायला, शिकायला मिळत आहेत आणि मुळात हे सगळं करताना मजा येतेय ये खूप चांगलं  आहे.

त्यामुळे मुंबई ते बेलफोर्ट मध्ये जितकं भौगोलिक अंतर आहे, त्यापेक्षा कितीतरी जास्त बदल ह्या मुंबई - बेलफोर्ट प्रवासाने माझ्यात केला, आणि एक व्यक्ती म्हणून मला अंतर्बाह्य बदलून टाकलं. 

# # # 

Tuesday 24 January 2023

जाणिवेबाहेरची परिमाणे

# # # # #

विज्ञाननिष्ठ जगात जगत असताना विज्ञानाच्या मर्यादा सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे,

विज्ञानात एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी प्रयोग असतात, आणि प्रयोगातून निघालेले निष्कर्ष एखाद्या घटनेचा कार्य-कारण भाव स्पष्ट करत असतात. पण हे निष्कर्ष आपण आपल्या पाच ज्ञानेंद्रियांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे काढत असतो. पण खरंच ही माहिती पुरेशी आहे? कान - ध्वनी, डोळे - प्रकाश, त्वचा - स्पर्श, नाक - गंध आणि जीभ - चव या पाच परिमाणांव्यतिरिक्त वस्तूची, पदार्थाची, घटनेची इतर परिमाणे असू शकतात आणि केवळ ते अवयव मनुष्याकडे नसल्याने आपल्याला त्या परिमाणांची जाणीव नसली तर? आता काही लोक म्हणतील आपल्याकडे अद्ययावत मोजमाप करणारी यंत्रे आहेत पण ही यंत्रे केवळ पाच ज्ञानेंद्रियांची एक्सटेन्शन्स आहेत. एखादं जाणिवेत नसलेलं परिमाण ती कशी सांगू शकतील? कारण माहितीचा संकलक शेवटी मेंदू आहे आणि मेंदू फक्त ज्ञानेंद्रियांपासून येणारी माहिती गोळा करू शकतो. 

एक फार रंजक काल्पनिक कथा आहे. कुठे वाचली ते आठवत नाही. संपूर्ण काल्पनिक आहे. एकदा एका वैमानिकाचे विमान हिमालयात कुठेतरी कोसळले. त्यातून वैमानिक कसाबसा वाचला आणि बाहेर आला. बाहेर येऊन त्याने पाहिलं, त्याच्या आजूबाजूला विचित्र लोक होते. त्यांना डोळेच नव्हते. डोळ्यांच्या जागी मांस होते. पडलेल्या विमानाचा आवाज ऐकून ते गोळा झाले होते. वैमानिकाने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना चक्क वैमानिकाची भाषा अवगत होती. त्याला ते आपल्या गावाच्या मुख्य ठिकाणी घेऊन गेले. बोलताना वैमानिकाला कळलं की त्यांना दिवस, रात्र, उजेड, रंग याविषयी काडीचीही माहिती नाही. वैमानिकाने त्यांना दिवस - रात्र काय असतात आणि रंग काय असतात ते सांगायचा प्रयत्न केला. त्यांना काहीही समजलं नाही. त्यांनी शेवटी वैमानिकाला वेडं ठरवलं कारण डोळेच नसल्याने त्यांच्या शब्दकोशात सुद्धा वैमानिक बोलत असलेले शब्द नव्हते. शेवटी वैमानिकाने तो नाद सोडून दिला आणि त्यांच्याप्रमाणेच जगू लागला. गोष्ट इथे संपली. 

माहितीची देवाण घेवाण करण्याचे साधन म्हणजे भाषा. भाषा हे विचारांचं आदान - प्रदान करण्याचं एक अपुरं साधन आहे. कारण यात संवेदनांच्या आणि भावनांच्या स्वरूपात असणाऱ्या विचारांचं स्वरयंत्राद्वारे आधी एका ध्वनी मध्ये रूपांतर केलं. लिहिताना त्याचंच एका चित्रात किंवा चिन्हात रूपांतर केलं जातं. या ध्वनी किंवा चिन्हाला आपण अक्षरं आणि शब्द म्हणतो. कितीही केलं तरी कुठल्याही भाषेचा शब्दसंचय हा सीमित आहे. आणि नवीन शब्द निर्माण करण्याची प्रक्रिया किचकट आणि नॉन-स्टॅंडर्ड अशी आहे. अशा कित्येक भावना आहेत ज्या ध्वनी किंवा चिन्हामार्फत व्यक्त करता येत नाहीत. त्याला आपण इंट्रीन्सिक नॉलेज (intrinsic knowledge)/अंतर्गत माहिती  म्हणतो. ही माहिती आपल्याला कधीच कुणाशी बोलता किंवा कम्युनिकेट करता येऊ शकत नाही. उदा. गुलाबाचा सुगंध कसा असतो हे तुम्ही इतरांना कधीच कुठल्याच भाषेत समजावून सांगू शकत नाही. त्यासाठी त्या व्यक्तीला स्वतः गुलाबाच्या फुलाजवळ नाक नेणं गरजेचं आहे, अगदी तसंच कोणताही आध्यात्मिक अनुभव जसं की समाधी, निर्वाण हे फक्त आणि फक्त त्या व्यक्तीलाच जाणवू शकतं. त्यामुळेच अशा गोष्टींना वैज्ञानिक आधार असत नाही. कारण विज्ञान फक्त शब्दात व्यक्त होणारी माहिती (Extrinsic Knowledge) देऊ शकतं. 

आपणही कदाचित अशीच माणसे आहोत. विश्व काय आहे याचे संपूर्ण ज्ञान कदाचित आपल्याला कधीही होऊ शकणार नाही कारण मोजून पाच ज्ञानेंद्रिये शरीरात आहेत ज्यायोगे पृथ्वीवर आपण आजपर्यंत तरी आरामात जगू शकतो. पण अशी अनेक निनावी परिमाणे केवळ ती-ती इंद्रिये नसल्याने आपल्या जाणिवेच्या कक्षेत नाहीत आणि कधी येऊही शकणार नाहीत.

# # # # #

Friday 10 June 2022

Navy officer

 म्हणावं तर फारसा महत्वाचा नसला तरी घडला म्हणून हा प्रसंग लिहितो. 


आत्ताच काही वेळापूर्वी म्हणजे रात्री दीडच्या सुमारास मित्राकडे जेवण वगैरे करून गप्पा मारून आम्ही सायकलवर परत हॉस्टेलला येत होतो. हॉस्टेलकडे जाणारा रस्ता उताराचा आहे आणि नुकताच पाऊस पडून गेला होता आणि अजूनही पडण्याची शक्यता म्हणून आम्ही घाईने निघालो होतो. अचानक चार पाच जण हसत खिदळत रस्त्याच्या मध्ये आले. हे इकडे नेहमीचं दृश्य असतं म्हणून आम्हीसुद्धा त्यांना आहोत त्या वेगात वळसा घालून पुढे गेलो कारण वेग कमी करणं शक्य नव्हतं. सायकल घसरण्याचे चान्सेस होते. ह्या सगळ्या धावपळीत आमच्या बऱ्याच मागून येणाऱ्या चारचाकी गाडीचा वेग त्या ड्रायवरला नाईलाजाने कमी करावा लागला. मुळात कॅम्पस रोडचं स्पीड लिमिट २५ आहे. बऱ्याच लोकांना हे २५ माहीतसुध्दा नसेल. पण रात्रीचा रिकामा रस्ता पाहून मोह कुणाला आवरतोय?


आता दुसरा कोणी ड्रायवर असता तर ही परिस्थिती पाहून निमूट निघूनही गेला असता. पण हा ड्रायवर एन्टायटल्ड निघाला. साधारण लेट थर्टीज असावा. 

I'm honking and you're still coming in my way with your bicycle? 


जेवण वगैरे भरपूर झाल्याने मी पण तयारीतच होतो. मी म्हणालो, first of all speed limit for this road is 25. It's inside the campus. I'm pretty sure you were overspeeding. Otherwise why would you honk for overtaking?


मग तो चिडलाच. You know who you're talking to? I'm a Navy officer on deputation. Don't teach me the rules. 


आता खरं कारण मला समजलं. मी हसत हसत म्हणालो doesn't make you eligible for overspeeding. And you're driving car. Better safety and skid control than my bicycle. 


डोकं हलवत खांदे उडवत तो झपाट्याने पुढे निघून गेला आणि पुढे १०० मी वर जाऊन पुन्हा थांबला. पुन्हा मला थांबवलं. बऱ्याच मऊ आवाजात मग हिंदी वाणी सुरू झाली. देखो ऐसे आप बीच में आओगे तो हमे भी तकलीफ होगी ना. वगैरे वगैरे. मग तुम्ही कुठचे वगैरे. मी सांगितलं सोलापूर. तो म्हणाला I'm from Dehradun. मी म्हणालो लगा ही था मुझे. मग म्हणे कैसे क्या ?

म्हटलं जिस तरह से आपने बोला "तुझे पता है तू किस्से बात कर रहा है?" दोघेही हसलो. 

ओळख वगैरे झाली. आणि बाय बाय करून हॉस्टेल ला पोहोचलो. 


Tuesday 30 November 2021

अप्रेषित

प्रिय दादा,

शेवटी हे अप्रेषित पत्र लिहायची वेळ आलीच. विश्वाच्या अथांग प्रतलावर आपण सगळेच कुठेतरी पुन्हा भेटू तेव्हा कदाचित हे पाठवेन. मी आता आनंदी आहे, पण काळीज घट्ट करून आनंदी राहताना तुमच्या आठवणींची कोवळी सल अजूनही मनात आहे. असं अचानक तुमचं शांत होणं माहीत असतं, तर आधीच तुमच्याशी अमुक बोललो असतो, तमुक केलं असतं, याची उजळणी मनात परत परत होत राहते. मृत्यू - म्हटलं तर एक नैसर्गिक अवस्था, म्हटलं तर एक अगम्य गूढ. जणू एखादं सुरेल गाणं अर्ध्यातच थांबावं आणि पुढे भीषण शांतता पसरावी तसं काही. देहाच्या जाणिवेपासून जाणिवेपलीकडे जाण्याच्या प्रवासात नक्की काय दुरावतं? आपसातले संवाद, विचारव्यापार, अस्तिभाव अचानक नाहीसे होतात तेव्हा मनाची त्रेधा उडते. आता इथून पुढे हे सगळं असणार नाही हा विचार अंगावर काटा आणतो. एखाद्या क्षणी वाटतं की सगळं पुन्हा एकदा पहिल्यापासून घडावं. तुमच्या समक्ष घडलेलं मुक्त बालपण, शिस्तप्रिय विद्यार्थीदशा आणि मग जबाबदारीचं तारूण्य. पुन्हा एकदा हे सगळं आयुष्य तुमच्या सहवासात आणखी संगतवार जगायला मिळावं. कदाचित मग पत्र लिहिण्याऐवजी बाजूला बसून हे सगळं आधीच तुमच्यासमोर बसून बोललो असतो. किंवा नसतोही - गरजही नसती. पण हे नेहेमीच असं होतं - सरबताचा पेला रिकामा झाला, की तळाशी न विरघळलेली साखर दिसावी, तसं सगळं काही नंतर आठवायला होतं, पण वेळ गेलेली असते.

नीट आठवलं की लक्षात येतं, आमच्या थोड्याफार महत्वाकांक्षा म्हणजे तुम्हीच कधीकाळी पेरलेली बीजं, ज्याचे आज मोठाले वृक्ष झालेत. आपणही मोठं काही करू शकतो हा तुम्हीच जागवलेला विश्वास अन आश्वस्त आधार. तुमचा खंबीर आधार नसता तर आज आम्हा सगळ्यांच्या डोळ्यात एकाच हिंमतीची नक्षत्रे कशी चमकली असती? तुम्ही एखाद्या चिरेबंदी दगडाप्रमाणे स्वतःला पायात गाडून घेतलं, त्याची परिणती म्हणूनच आमच्या आयुष्याच्या इमारती अस्खलितपणे उभ्या राहू शकल्या. आज जेव्हा आम्ही आपापल्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी खटपट करत आहोत, अनेक प्रश्न घेऊन झगडत आहोत, तर त्याकाळी नारीसारख्या खेड्यातून बाहेर पडून कोणत्याही ठोस मदतीशिवाय थेट रेल्वेमध्ये स्टेशन मास्तर होण्यापर्यंतचा प्रवास हा किती मोठा संघर्ष असेल याची फक्त कल्पनाच स्तिमित करून सोडते.

जन्म, व्याधी, जरा, मृत्यू या त्रिकालाबाधित सत्याशी कसंबसं जुळवून घेत अस्थी गोळा करताना तुमच्या राखेला स्पर्श केला तेव्हा वाटलं, जरी अग्नीने देहाची राख केली असली, तरी तुमच्या संस्कारांची, हिमतीची राख करेल असा अग्नी या विश्वात अजून जन्माला यायचा आहे. तुमचे संस्कार आणि आदर्श चिरंतन आहेत आणि आम्हाला ते मार्गदर्शन करत राहतील.

कित्येक शतकांच्या, पिढ्यांच्या दीर्घ ओळीला तुम्ही तळमळीने एक आकार दिला. इथून पुढच्या अनेक पिढ्यांत आता हा ज्ञानाचा दीप प्रज्वलित होत राहील. हा विचारच इतका ऊर्जादायी आहे, कि इथून पुढल्या अगणित पिढ्या जर सुखी होणार असतील, तर त्या केवळ तुम्ही केलेल्या  कष्टांमुळे आणि घेतलेल्या निर्णयांमुळे. परिघवर्ती दुःखाच्या गाभ्यात हे एक समाधानाचं रोपटं पालवतं आहे. तुम्ही ही शिकवण दिलीत की, आपलं जीवन हे कधीच सर्वस्वी आपलं नसतं, आपण आज करत असलेल्या कामामुळे, आज घेतलेल्या निर्णयांचा आपल्या पुढील कित्येक पिढ्यांवर चांगला - वाईट परिणाम होणार असतो, म्हणून आपली स्वतःची जबाबदारी फार मोठी असते आणि ती प्रत्येकाने पार पडायलाच हवी. एक-एक दिवस मागे पडत जातो, तसं तुमचे कष्ट आणि साधेपणा आठवत राहतो. आजही जेव्हा आमची वाट अंधारलेली असते, तेव्हा आमच्याकडून तुम्हाला असलेल्या अपेक्षांचं स्मरण होतं आणि आमची वाट हजारो लामणदिव्यांनी आपोआप उजळून जाते.

शेवटी आपण सगळे एकाच रेल्वेचे प्रवासी. कुणाचं स्टेशन लवकर येईल तर कुणाचं उशिरा, एवढंच काय ते. कधीतरी तुम्ही पुन्हा भेटालही, की आणखी पुढे निघून गेला असाल? माहीत नाही. पण जिथे कुठे असाल तिथे हा एवढाच निरोप की, तुम्ही कधीकाळी एकट्याने अंधारात पेटवलेला दिवा अजूनही उजळतो आहे आणि तो तसाच उजळत राहील याबाबत निश्चिन्त असा.

तुमचाच,

पुष्कर


Thursday 18 March 2021

संधिप्रकाश

 # # # # #


संध्यासमयीची स्तब्ध झाकोळ पसरत जाते

तेव्हा अणकुचीदार होत जातात 

अवैध भावनांचे कोपरे

पूर्वेकडच्या अंधारात 

बीभत्स

संधिप्रकाश

पश्चिमेकडच्या आभाळात

स्तंभित अहर्निशेच्या सीमारेषेवर 

आणि कातरवेळी अभिमुख होतो

स्वतःपासून स्वतःपर्यंतचा अव्याहत चालणारा प्रवास 

- पुष्कर

(१९ मार्च २०२१)


Friday 25 December 2020

एक होता ठोंबा...

 # # # # #

तर त्याचं असं झालं, की एक होता ठोंबा. 

ठोंब्याचं झोपेच्या बाबतीत नेहेमीच रडगाणं. सशाची झोप म्हणतात तशी ठोंब्याची झोप होती.  झोप म्हणून ती कशी यायचीच नाही. आणि आली तरी कधी जाग येईल नेम नाही. वारसाहक्काने मिळालेले बीपी, अँक्झायटी इ. तर होतेच. तर त्यादिवशी ठोंबा आपला थकून भागून रिसर्च आर्टिकल्स वाचून, एक्सपेरीमेंट्स करून रात्री १ वाजता त्याच्या पीजी वर आला. आशादीदी ने मोठ्या काळजीने ठोंब्याची सवय ओळखून बिसलेरी, इस्त्रीचे कपडे, इ ठोंब्याच्या रूम मध्ये ठेवले होते. 

तर नेहेमीप्रमाणे ठोंब्याने हात पाय तोंड धुतले, स्टीम घेतली (गो कोरोना गो), मोबाईल इ. इससेन्शियल्स सॅनिटाईज करून घेतले, आणि बेडवर पडला. इंदोरची ऑक्टोबर मधली रात्र. त्यातून निपाणिया सारखा सिटी आऊटस्कर्ट चा एरिया, थंड सुखद हवा सुटली होती. नेहेमीचे लेट नाईट सोशल मीडिया रिच्युअल्स होता होता ठोंब्याला कधी नव्हे ती झोप आली. ठोंबा खुश झाला. मोबाईल लांब ठेऊन दिला (रेडिएशन्स… यु नो..!!!).  आणि खिडकीतून येणाऱ्या थंड हवेच्या झुळुकेत झोपणार इतक्यात एक डास गुणगुण करीत कानाजवळून गेला. संभाव्य धोक्यासाठी खबरदारी म्हणून ठोंब्याने दुसरी उशी डोक्यावर घेतली तितक्यात एक डास पाठीला चावला आणि घात झाला. डोळ्यावर आलेली सुखकारक झोप हळू हळू उतरायला लागली, ती कायम ठेवण्याचा प्रयत्न ठोंब्याने केला आणि कूस बदलून झोपला. 

थंडगार हवेची झुळूक खिडकीतून येत होती आणि शरीर विश्रांतीचा अनुभव घेत होतं. खिडकीला जाळ्या असल्याने ठोंबा अगदी निर्धास्त होता, असेल एखादा डास असा एक दिलासा मनाला देऊन त्याने विचार सैल सोडले, तशी हळू हळू स्वप्ने तरळू लागली. आणि अचानक पायाला आणखी एक डास कचकचून चावला, आणि ठोंब्याची सुखनिद्रा भंगली. फ्रस्ट्रेशन आलं, तसं झोप उतरायला लागली, आणि थोड्याच वेळात ठोंब्याला जाणीव झाली कि बंद डोळ्यांच्या मागे आपण टक्क जागे आहोत. डोळे उघडायला हरकत नाही. आणि शेवटी ठोंबा बेडवरुन उठून डासांच्या विरोधात लढायला सज्ज झाला. प्रथमतः लाईट लावली. तसा तो लख्ख प्रकाश डोळ्यांना खुपायला लागला आणि त्याला अजूनच अलर्ट व्हायला झालं. फ्रस्ट्रेशन लेवल मॅक्स झाली तसं मग त्याने नेहेमीच्या सवयीने जागरणाची मानसिक तयारी केली. लाईट मध्ये मच्छर कमी होतात हा स्वानुभव. ठोंब्याने पहिलं तर कॉइल, फास्ट कार्ड, ओडोमोस अगदी कसलीच हत्यारं नव्हती. हे युद्ध आता केवळ मुत्सद्देगिरीच्या जोरावर लढायचं होतं. 

लाईट असल्याने डासांचा आतंक कमी झाला होता. एकच उपाय म्हणजे लाईट चालू करून झोपणे. सेन्सिटिव्ह झोपेच्या ठोंब्यासाठी हे कर्मकठीण. मग यूट्यूब वर एकामागून एक जुनी गाणी लावली तसतसं मग डोक्यातला ताण मऊ पडत गेला. जुनी गणीच अशी लिरिक्स प्रधान. एकेका शब्दांत गुंतून जायला लावणारी गाणी. असं वाटतं किती विचार करून लिहिलं असावं... "तू तू है वही दिल ने जिसे अपना कहा" सुरू झालं आणि यूट्यूब प्लेलिस्ट मोड वर गेलं.

 साधारण हे सगळं तासएक भर चाललं असेल. मग ठोंब्या जांभया द्यायला लागला. डासांचा जोर एव्हाना कमी झालाच होता. 

मग सावकाश ठोंब्याने पाठ टेकली आणि उद्या डास युद्धाची सर्व हत्यारे विकत आणायची ठरवत त्या सुखकारक विचारात कधी झोपी गेला ते त्याचं त्यालाच कळलं नाही...

संध्याकाळ

 # # # # # सं ध्याकाळ डोळ्यांवाटे मनात उतरत जाते तसतसं  हळूहळू काहीतरी हातातून निसटत जाण्याचं भान येऊ लागतं. वारा पडतो. उजेड हळूहळू क्षीण हो...