कोक-ओ-वां (Coq-au-vin) चा शब्दशः अर्थ होतो वाईन मध्ये शिजवलेला कोंबडा. फ्रेंच लोक त्यांच्या चीझ, वाईन, ब्रेड, चिकन, बीफ आणि पोर्क यांच्याशिवाय जगू शकत नाहीत. त्यामुळे कोक-ओ-वां मध्ये वाईन, चिकन, बटर यांचा संगम झालेला पाहायला मिळतो. मी शिकलेल्या फ्रेंच रेसिपी मधली ही पहिली. कोक-ओ-वां करण्याच्या अनेक कृतींपैकी ही एक माझा बेलफोर्टमधला जुना घरमालक एरिक ने मला शिकवली आहे. व्यक्ती आणि प्रदेश यांनुसार ही रेसिपी बदलते. असं असलं, तरी मूळ घटक सारखे असल्याने त्याची एक विशिष्ट चव असते. तर रेसिपी खालील प्रमाणे:
साहित्य (दोन माणसांसाठी):
मॅरिनेड साठी साहित्य:
चिकन : :२ लेग संपूर्ण आणि १ ब्रेस्ट चे मध्यम तुकडे
रेड वाईन : ७५० मिली (शक्यतो कॅबर्ने सॉविन्यो (Cabernet Sauvignon) किंवा पिनो नोआ (Pinot Noir) वापराव्यात.
कांदे : ३ मोठे
मिरची : १ मध्यम
काळी मिरी : २ लहान चमचे
मॅरिनेड ची कृती:
१. एका बाउल मध्ये खाली कांद्याच्या चकत्या, मिरचीचे तुकडे, मिरी, घालून त्यावर चिकन चे पीसेस ठेवावेत.
२. हे सर्व बुडेल इतपत रेड वाईन त्यावर घालून, झाकून फ्रिज मध्ये १२ ते २४ तासांसाठी ठेवून द्यावं (शक्यतो ७५० मिली वाईन पुरेशी होते).
मुख्य कृतीचे साहित्य:
गाजर : २ मध्यम
मश्रूम : ४-५ मध्यम
बटर : ४ मोठे चमचे (आधीच फ्रिज मधून काढून मऊ होईपर्यंत ठेवावं)
पार्सले : ४ काड्या
ऑलिव्ह तेल : २ मोठे चमचे (नसेल तर बिनवासाचं कोणतही)
मैदा : २ लहान चमचे
मुख्य कृती:
१. मॅरिनेड मधून चिकन, कांदे, मिरचीचे तुकडे काढून वेगळे करावेत.
२. उरलेलं मॅरिनेड एका पातेल्यात घालून उकळायलाठेवावं. उकळताना वर येणारे फेसाचे थर काढून टाकत राहावं. साधारण ८०% होईपर्यंत उकळावं.
३. चिकन पुसून कोरडं करून घ्यावं.
४. एका खोलगट पातेल्यात १ चमचा ऑलिव्ह/इतर तेल घालून त्यात २ चमचे बटर घालावं (याठिकाणी बेकन वापरतात, पण वास आवडत नसल्याने मी वापरत नाही, तुम्ही बेकन वापरू शकता).
५. त्यावर चिकन चे तुकडे तपकिरी होईपर्यंत भाजून घ्यावेत (५-७ मिनिटे प्रत्येक बाजूने) आणि एका प्लेट मध्ये काढून ठेवावेत.
६. त्याच तेलात मॅरिनेड मधून काढलेला कांदा, मिरच्या थोड्याश्या भाजून मग त्यात गाजराचे तुकडे घालावेत.
७. गाजर मऊ झालं, कि त्यात भाजलेलं चिकन घालून, वरून आटवलेली वाईन घालावी. पाणी घालून रस्साभाजीसारखा पातळपणा आणावा. काहीजण चिकन स्टॉक पण घालतात. तो असेल तर उत्तम.
८. हे संपूर्ण मिश्रण १५ मिनिटे उकळावे. एका बाजूला पॅन मध्ये बटर गरम करून मश्रूम च्या चकत्या त्यात भाजून घ्याव्यात. मश्रूम मऊ होऊन त्यांचा वास कमी व्हायला हवा. मग ते मश्रूम पण मिश्रणात घालावेत.
९. उरलेल्या २ चमचे बटर मध्ये २ चमचे मैदा घालून फेटून त्याचा गोळा करावा. ह्याला बुएर- मॅनी (Beurre-Manie) म्हणतात. आणि तो मिश्रणात घालून एकसारखं मिश्रण ढवळून घ्यावं . त्याने घट्टपणा येतो.
१०. मग हे मिश्रण एका भांड्यात काढून OTG ला १२०° सेल्सिअस ला ४० मिनिटे ठेवावे.
गरम गरम सर्व करावे. हे नुसतंच किंवा ब्रेड सोबत खाल्लं जातं.
मॅरिनेडचं साहित्य (चिकन, कांद्याच्या चकत्या, मिरची, वाईन आणि मिरी) |
एका भांड्यात खाली कांद्याच्या चकत्या, मिरच्या टाकून वर चिकन ठेवून मिरी घालावी. |
हे सर्व बुडेल इतकी वाईन आणि मग प्लास्टिक रॅप ने झाकून फ्रिज मध्ये १२-२४ तास ठेवावं |
भाज्या - बटाटा, गाजर आणि सोबत बटर. चिकन, कांदे, मिरची वाईन मधून काढून वेगळे करावे. |
चिकन ऑलिव्ह तेल आणि बटर मध्ये तळून घ्यावं |
मॅरिनेड ची वाईन उकळून ८०% करावी |
अनुक्रमे कांदे, मिरच्या, बटाटे आणि गाजर चिकन तळलेल्या भांड्यात परतून घ्यावे. |
चिकन घालून वाईन, स्टॉक किंवा पाणी घालून उकळी घ्यावी. |
वेगळ्या भांड्यात मश्रूम तळून घ्यावेत, आणि चिकन वर घालावेत. |
बटर आणि मैद्याचे मिश्रण |
बटर आणि मैद्याचे मिश्रण |
OTG ला ५० - ६० मिनिटे १२०° वर ठेवावे. |
तयार कोक-ओ -वां |
बाउल मध्ये गरम गरम वाढावे. |
No comments:
Post a Comment