Monday 9 December 2013

मन मनास...

दिवाळीचे उजळलेले दिवस परत जाताना उन्हं कलती करून जातात.

     सकाळच्या नव्या हवेत साचलेलं मऊशार गडद धुकं. लोण्याप्रमाणं धुक्यात वितळत जाणारं ऊन. चालता चालता थबकून मी तळ्याच्या काठी उभा राहतो. झाडा झुडूपांशी सलगी करत विस्तीर्ण पसरलेलं तळं. तळ्याच्या त्या काठाला मला लांबवर रस्ता दिसतो. ह्या असल्या थंडीतही रस्ता जगण्याचा ओघ वाहून नेतोच आहे. मी सावकाश नजर खाली वळवतो. तळ्यात अस्थिर असं माझं प्रतिबिंब. पहाटवाऱ्यामुळे ते हलतंय की आतली अस्थिरता तळ्याच्याही नजरेतून सुटली नाही कोण जाणे?... तसल्या दाठूरत्या थंडीतही माझ्या चेहेऱ्यावर हसू उमटलं. प्रतिबिंब मला पाहून विचारतं, “कोण आहेस तू? तुला काय हवंय?”

     मी उलट त्यालाच विचारलं, “कुणाच्या सापेक्ष मी कोण आहे म्हणून सांगू?” ते नुसतंच हसलं. तेही बहुधा माझ्याच जातकुळीतलं असावं. कुणीसं लिहून ठेवलंय, तुम्हीही जगाचाच एक भाग आहात, निर्जीवांपेक्षा तुमच्यात फक्तं एकच गोष्ट वेगळी आहे, तुमच्यात जीव आहे. बाकी तुम्हीही अणुरेणूंचा एक पुंजकाच. त्यांच्यासारखे. म्हणूनच कदाचित त्यांनाही दुःखाची जाण असेलच की. म्हणूनच दुःखाने पोळलेल्या अशाच एखाद्या हतबल जीवाने अथांगाकडे कधीकाळी याचना केली असेल... “मा कश्चित दुःखमाप्नुयात...”

     सूर्य जसजसा आकाशात वर आला, तसतसं हळूहळू धुकं विरून गेलं, तळ्याचा सभोवार लख्ख झाला. खरंच, जग उजळायचं असेल, तर दूरवर एखाद्या सूर्याला जबाबदारीनं रात्रंदिवस जळावंच लागतं. त्याचं कोणाला महत्त्व नसेलही, पण एखादा दिवस तो उगवलाच नाही तर? भयंकर कल्पना. मी मागे फिरलो. झाडांखालच्या मळलेल्या पाऊलवाटांवर चालताना झाडांतून पाझरणारे नाजूक कवडसे. पाचोळ्यात माझी पावलं वाजली, तसं बाजूच्या झाडावरून फडफड करत शेकडो बगळे आकाशात उंचच उंच उडाले, सुंदर दृश्य पाहून मी समोर नजर वळवली तर समोरचं झाड निष्पर्ण. अगदी एकाही फांदीला एकही पान शिल्लक नाही. दुर्दैव. मी म्हणालो. पण ते म्हणालं, “माझ्या डोळ्यांत वसंताची स्वप्नं आहेत.”

     मागे फिरून एकदा या सगळ्या दृश्यावर नजर टाकली.

     “पितात सारे गोड हिवाळा...”

Friday 18 October 2013

खा खा

# # # # #


     दिवसभराच्या कामानंतर चेहेऱ्यावर पसरलेला मख्ख थकवा घेऊन मी नवीन बुटाच्या आत दुखणाऱ्या पायाकडं साफ दुर्लक्ष करत डी. आर. डी. ओ. चौकात बसची वाट पाहत असतो. कामाचा ताण घालवण्यासाठी कानात अखंड वाजणारे शंकर महादेवन, सोना महापात्रा, श्रेया घोषाल...

     नेहेमीप्रमाणे बसचा रश अवर. चुकूनमाकून थांब्याला बस लागलीच तर जणू बालापूरला चौरस्त्याला जाणारी ती जगातली शेवटची बस असल्याप्रमाणे लोकांची गर्दी. शिवाय एवढ्या दिव्यातून बसमध्ये जागा मिळालीच, आणि एखाद्या म्हातारबुवांनी वगैरे जागा मागितलीच, तर “ ओके अंकल, कूरचोअंदी” (म्हणजे बसा; तेलुगु) म्हणण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून एखाद्या unfortunate दिवशी मग शेअर ऑटोनेच जायचं, असं माझं आणि शाहीदचं ठरतं.

     “अबे रोक उस ऑटोको...” – असं मला म्हणून “आपेंडी आपेंडी” (थांबवा; तेलुगु) असं स्वतःच करत कपूर ती गच्च भरलेली केविलवाणी ऑटो थांबवायचा “ऑटोकाट” प्रयत्न करतो. अशा दोन तीन भरगच्च ऑटो आणि मग सरतेशेवटी खास आमच्यासाठी आली असावी अशी एखादी रिकामी शेअर ऑटो.

     अभिषेक कपूर. खाण्याचे पदार्थ शोधणाऱ्याला जर नोबेल मिळत असतं तर यंदाचं नोबेल त्याच्या “बन–बोंडा” या शोधासाठी त्याला नक्की मिळालं असतं.
www.blendwithspices.com
     बन–बोंडा म्हणजे अभिषेक कपूर या माझ्या उत्तर भारतीय मित्राने जमवून आणलेलं मराठमोळ्या वडा–पावचं तिलंगणातलं रूप. चौघात मिळून अर्धा डझन बनपाव घेतले आणि तितकेच बोंडे (बोंडे? – अनेकवचनासाठी माफी) घेतले की मग संध्याकाळी भातासोबत कसली आंबट-चिंबट करी खायला मिळेल याची चिंता करायची जास्त आवश्यकता नसते. आंबट चव म्हणजे तेलुगु लोकांचा जीव की प्राण. अगदी चटण्यांपासून भाज्यांपर्यंत सगळं आंबट ढाण!

     त्यातल्या त्यात दिलासा म्हणजे चिकन बिर्याणी. सिकंदराबाद स्टेशन च्या बाहेर अल्फा म्हणून एक फेमस बिर्याणी चं हॉटेल आहे. एकदा सिकंदराबाद ला गेलो तेव्हा आणि परत निघताना अश्या दोन्ही वेळेस जायला मिळालं. चिकन बिर्याणी तर टेस्टी होतीच होती पण व्हेज बिर्याणीही त्याचा तोडीस तोड!

# # # # #

     रंगल च्या चौरस्त्याला गेलं, कि तिथे कोपर्यावर एक अल्टीमेट फास्ट फूड ची टपरी आहे. पहिल्यांदा जेव्हा शाहीद, अभिषेक, दीपक आणि मी मिळून तिकडे गेलो तेव्हा बोंडा खाल्ला होता. आतापर्यंत माझी आणि बोन्ड्याची ओळख पुण्यात मिळणाऱ्या “आलू बोन्ड्यापर्यंत” मर्यादित. पण इथला बोंडा हा तांदळाच्या आंबवलेल्या पिठापासून तयार केलेला. भुकेच्या तावात तिसरी प्लेट संपवताना आम्ही चौघेही या डीशच्या प्रेमात पडलो. शिवाय एवढं खाऊनही मी शेवटी निर्लज्जपणे मसाला डोसा मागवला. उत्तरेकडच्या मसाला डोशाच्या तोंडात मारेल इतकी सुंदर टेस्ट. नुसता मसाला खाऊनच हायसं वाटलं. खरं डोशात भरायच्या सुक्या बटाट्याच्या भाजीला “मसाला” का म्हणायचं हा प्रश्न असला, तरी हा मसाला तयार करण्यात इकडचे लोक माहीर.

www.sree-srecipes.blogspot.com



# # # # #

Saturday 3 August 2013

बोलावणं

“जित्यापणी पाणी पाजायला कुणाला फुरसत नसती. सगळे आपापल्या परपंच्यात असत्यात! मेल्यालं माणूस कधी पाणी प्येतय व्हय? आन ते काय! हाताला येईल तो फटकूर कुणी कधी धुतल्याला असतोय का नसतोय त्यात पाणी पिळायला दहा जणांचे हात! अर्ध पाणी तोंडात न अर्ध भाईर! अशा तर्हा, कशाचं काय आलंय? मेलं म्हजी गेलं.”

या ओळी वाचल्या अन तासभर कानात घुमत राहिल्या.

जिनं हे म्हटलं तिलाही शेवटी त्याच पद्धतीनं पाणी पाजण्यात आलं. मरण. प्रत्येकासाठी अटळ.

# # # # #

पल्या सर्वांच्याच आयुष्यात एका “आई” चं स्थान ती नसते तेव्हाच कळणारं. एरवी सगळे आपापल्या प्रपंचात गढून गेलेले असतात. नरेंद्र जाधव म्हणतात त्याप्रमाणे आई ही आपल्या जगण्याच्या रेल्वेचं जणू “अनसीन इंजिन” असतं. रावसाहेब ससाणे यांनी त्यांच्या “बोलावणं” या पुस्तकाच्या रूपाने त्यांच्या आईचं जाणं अन त्यायोगे आईचं संपूर्ण आयुष्य उलगडून दाखवलंय.
माझ्या नगरच्या आत्याचे मिस्टर डॉ. अनिल ससाणे, रावसाहेब ससाणे हे त्यांचे भाऊ. त्यांच्या आई भीमाबाई यांच्या सहवासात मला कधी राहण्याचा प्रसंग आला नसला तरी, तरी त्या सर्वांनाच फार जीव लावायच्या असं मी बाई, बाबा, आणि माझ्या सगळ्याच माणसांकडून ऐकलंय. आणि आता या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचं आणि त्यांनी जगलेल्या आयुष्याचं पर्व अगदी जसंच्या तसं वाचायला मिळालं.

गावाकडच्या चालीरीती, महार म्हणून भाकरीच्या उद्देशाने करावी लागलेली गावकीची कामे, बाबासाहेबांच्या शिकवणुकीतून वाहू लागलेले परिवर्तनाचे वारे, त्यांनी गावकीची कामे नाकारण्याचा दिलेला संदेश, तरीही कुटुंब चालवता यावे म्हणून म्हातार्याला(लेखकाचे आजोबा) करावी लागलेली गावकी, त्यातून उद्भवलेले कौटुंबिक वाद, वाळीत टाकलं जाणं, तरीही म्हातार्याने खंबीरपणे त्या सगळ्यांशी लढून पुढे नेलेलं कुटुंब... वाचता वाचता अनेकदा रडूही येतं.

तर काही प्रसंग मजेशीर. उदाहरणार्थ सौन्दराबाईचं अंगात येणं, तिचं भूतं पळवून लावणं, यासारखे अनेक.

एक चांगलं पुस्तक.
# # # # #



Wednesday 12 June 2013

तो फोन आणि हा फोन...

यडिया चं असूनसुद्धा माझ्या सिमकार्ड नं मला द्यायचा तो दगा दिलाच. ऐन प्रोजेक्ट च्या वेळी No Service चा मेसेज!!! बरं, सुट्ट्या असल्याने माझ्या आजू बाजूच्या रूम्स मधली लोकं आपापल्या घरी गेलेली. आणि त्यातनं मी सिंहगड रोड पासनं साधारण किलोमीटर भर आत वडगाव मध्ये राहत असल्यानं मला STD बूथ शोधत हिंडण्याशिवाय पर्याय नव्हता.

     सुमारे निम्मं वडगाव पालथं घालून झालं. कुठेच बूथ दिसेना. बरं, बूथ असलाच तर त्याला टाळं लागलेलं. आणि त्या बंद पडलेल्या STD ला वाकुल्या दाखवत त्यांच्याच नाकाखाली उभी असलेली Mobile ची दुकानं. क्वचित कुठेतरी PCO चा बोर्ड. आणि तिथे चौकशी केली तर म्हणे फक्त  FAX पुरताच चालूये म्हणे फोन! वरून धो धो पडणारा पाउस, आणि छत्रीखालून दुकानांचे बोर्ड वाचत फिरणारा मी.

    संपर्क साधनांच्या क्रांतीने टेलिफोन चे बूथ म्हणजे अडगळ हे ठरवूनच टाकलं होतं कदाचित. पण असल्या धांदलीत पण मला माझं लहानपण आठवलं. घरात पाहिलं टेलिफोन कनेक्शन आलं, त्याचं केवढं कौतुक! आलेला प्रत्येक फोन पहिल्यांदा मीच उचलून hello म्हणण्यासाठी माझी धडपड असायची. हे मोबाईल वगैरे आत्ता आत्ता चे. आणि या टेलिफोन ची झालेली ही केविलवाणी अवस्था!!! चक्क Antique म्हणून फोन चं device दिवाणखान्यात मांडलेलं!

     बरं, असल्या landline चा आणखी एक फायदा असा कि ते एका जागी फिक्स केलेले असायचे. miscall देऊन त्यांच्या आवाजाचा मागोवा घेत त्यांना घरभर शोधत हिंडाव लागत नसायचं. त्याची जागा ठरलेली! शिवाय त्यांची चोरी वगैरे ही तर गोष्ट लांबच राहिली.

     आजकाल तर मोबाईल पण smart झाले!!! Net Connectivity आली तसं मग फेसबुक, We chat,  आणि Whatsapp. फोन उचलून बोलायलाही नको. फक्त मेसेज type करून सेंड चं बटन दाबायची खोटी.

     बदलत्या काळाला माझं नमन असो अश्या अर्थाचं एक सुभाषित आहे... तेच माझ्या नुकत्याच सुरु झालेल्या so called smart फोन मधून “Google” करतोय!!!

Friday 8 March 2013

भूतकाळातला प्रवास


कोण म्हणतं कि time travel ही एक fantasy आहे?

     Time travel म्हणजे हॉलिवूडी fantasy पटात  दाखवल्या जाणाऱ्या मोठमोठाल्या मशिनिंमधून एकदम फाटकन time travel करणं, एवढंच नाही. कधी घरातली एखादी खोली आवरायला घ्या. एरवी अडगळ वाटणाऱ्या कित्येक गोष्टी घड्याळाचे काटे मागे फिरवत नेतात. पहिली पानं उलटून पाहत “कोरीच तर आहे” करून वापरायला काढलेल्या जुन्या डायरीची मागची पानं abstract art कधी झालेली असतात काही कळत नाही. कधीकाळच्या कुणाच्या व्यक्त-अव्यक्त भावनांनी त्यांची शेवटची पानं गच्च.

     “झालं. आता ही एवढी रद्दी बांधली की झालंच” असं म्हणत जुन्या वह्यांचे गठ्ठे उचलताना एखादी rather जुनाट म्हणजे अगदी जीर्ण झालेली वही हातात येते. “बघू तरी काय आहे ते” .. पानांमागून पानं उलटताना पुन्हा kaleidoscope चा आविष्कार. पहिल्या पानावर बारीक बारीक अक्षरांत पद्मा गोळ्यांची कविता कुणा रसिक मनानं तिथं लिहून काढलेली असते,

“इतकी बेपर्वाई आकाशालाच शोभणारी...
तुही स्वतःला आकाश समजू लागलास का
मी म्हटले म्हणून?
कितीही म्हटले परस्परांना अलौकिक असामान्य...
तरी मूळ मातीतच
हे तुला कळत नाही असे का मी म्हणते?
एक विचारू?
कलंदराला हवीच का असली बेपर्वाई?
आकाशाची पोकळ पोकळ निळाई?
चिडले नाही रे..
चंद्र-सूर्य पाहते न मी तुझ्याच डोळ्यांत?
चंद्र-सूर्याला का दिसावीत आसवं कोणाच्या डोळ्यातली?
मातीचे मुके कढ मातीच जाणे...
... पण तू आकाशच राहा
नाहीतर मी डोळे उचलून पहायचे तरी कोणाकडे?”

     कविता वाचत वाचत मनानं कवितेत हरवून जावं तर अगदी पुढच्याच दोन पानांवर “कैरीचा तक्कू” कसा बनवायचा याची कृती लिहिलेली. अन त्यापाठोपाठ रसलिंबू, पोह्याचे पापड... यांच्या कृती. त्याच्याच पुढच्या पानावर आठवून आठवून लिहिलेला महिन्याचा हिशेब. “७ तारीख – दूध अर्धा लिटर जास्त” अशा सांकेतिक वाटणाऱ्या मेमोजनी वही अजूनच interesting झालेली. अन अश्या साताठ वह्या अडगळीत. प्रत्येक वही आधीपेक्षा जास्त nostalgic... घर आवरायचं म्हणजे खरं निवांत एखादा दिवसच काढायला हवा.

     कुठल्यातरी कोपऱ्यात सापडणारा पत्त्यांचा क्याट. अन सापडला म्हणून खेळलेला एखादा रमीचा डाव.

     सगळ्यात महत्वाचं आणि मला आवडणारं काम म्हणजे एक्सपायरी डेट झालेली औषधं फेकून देणं. कधी कुणी न बघता घेतली तर पंचाईत नको म्हणून जुनी औषधं धडाधड फेकून देता येतात. पण अडगळीत नवनवीन सापडणाऱ्या वस्तूंनी ताज्या होत जाणाऱ्या आठवणी. या असल्या आठवणी थोड्याच एक्सपायरी डेटसोबत येतात? फेकून द्यायचं म्हटलं तरी न फेकता येणाऱ्या आठवणींची अडगळ. आयुष्यात कधीही न साफ होणारी. सगळे जुने दिवस जसेच्या तसे डोळ्यांसमोर उभे करणाऱ्या आठवणी.

     घर आवरताना आठवणींच्या कोळीष्टकामध्ये आपसूकच गुंतून जायला होतं. एका झाडूच्या फटक्यासरशी ती कुठली उडून जायला?

कोक-ओ-वां

# # # कोक-ओ-वां (Coq-au-vin) चा शब्दशः अर्थ होतो वाईन मध्ये शिजवलेला कोंबडा. फ्रेंच लोक त्यांच्या चीझ, वाईन, ब्रेड, चिकन, बीफ आणि पोर्क यांच...