Tuesday, 30 November 2021

अप्रेषित

प्रिय दादा,

शेवटी हे अप्रेषित पत्र लिहायची वेळ आलीच. विश्वाच्या अथांग प्रतलावर आपण सगळेच कुठेतरी पुन्हा भेटू तेव्हा कदाचित हे पाठवेन. मी आता आनंदी आहे, पण काळीज घट्ट करून आनंदी राहताना तुमच्या आठवणींची कोवळी सल अजूनही मनात आहे. असं अचानक तुमचं शांत होणं माहीत असतं, तर आधीच तुमच्याशी अमुक बोललो असतो, तमुक केलं असतं, याची उजळणी मनात परत परत होत राहते. मृत्यू - म्हटलं तर एक नैसर्गिक अवस्था, म्हटलं तर एक अगम्य गूढ. जणू एखादं सुरेल गाणं अर्ध्यातच थांबावं आणि पुढे भीषण शांतता पसरावी तसं काही. देहाच्या जाणिवेपासून जाणिवेपलीकडे जाण्याच्या प्रवासात नक्की काय दुरावतं? आपसातले संवाद, विचारव्यापार, अस्तिभाव अचानक नाहीसे होतात तेव्हा मनाची त्रेधा उडते. आता इथून पुढे हे सगळं असणार नाही हा विचार अंगावर काटा आणतो. एखाद्या क्षणी वाटतं की सगळं पुन्हा एकदा पहिल्यापासून घडावं. तुमच्या समक्ष घडलेलं मुक्त बालपण, शिस्तप्रिय विद्यार्थीदशा आणि मग जबाबदारीचं तारूण्य. पुन्हा एकदा हे सगळं आयुष्य तुमच्या सहवासात आणखी संगतवार जगायला मिळावं. कदाचित मग पत्र लिहिण्याऐवजी बाजूला बसून हे सगळं आधीच तुमच्यासमोर बसून बोललो असतो. किंवा नसतोही - गरजही नसती. पण हे नेहेमीच असं होतं - सरबताचा पेला रिकामा झाला, की तळाशी न विरघळलेली साखर दिसावी, तसं सगळं काही नंतर आठवायला होतं, पण वेळ गेलेली असते.

नीट आठवलं की लक्षात येतं, आमच्या थोड्याफार महत्वाकांक्षा म्हणजे तुम्हीच कधीकाळी पेरलेली बीजं, ज्याचे आज मोठाले वृक्ष झालेत. आपणही मोठं काही करू शकतो हा तुम्हीच जागवलेला विश्वास अन आश्वस्त आधार. तुमचा खंबीर आधार नसता तर आज आम्हा सगळ्यांच्या डोळ्यात एकाच हिंमतीची नक्षत्रे कशी चमकली असती? तुम्ही एखाद्या चिरेबंदी दगडाप्रमाणे स्वतःला पायात गाडून घेतलं, त्याची परिणती म्हणूनच आमच्या आयुष्याच्या इमारती अस्खलितपणे उभ्या राहू शकल्या. आज जेव्हा आम्ही आपापल्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी खटपट करत आहोत, अनेक प्रश्न घेऊन झगडत आहोत, तर त्याकाळी नारीसारख्या खेड्यातून बाहेर पडून कोणत्याही ठोस मदतीशिवाय थेट रेल्वेमध्ये स्टेशन मास्तर होण्यापर्यंतचा प्रवास हा किती मोठा संघर्ष असेल याची फक्त कल्पनाच स्तिमित करून सोडते.

जन्म, व्याधी, जरा, मृत्यू या त्रिकालाबाधित सत्याशी कसंबसं जुळवून घेत अस्थी गोळा करताना तुमच्या राखेला स्पर्श केला तेव्हा वाटलं, जरी अग्नीने देहाची राख केली असली, तरी तुमच्या संस्कारांची, हिमतीची राख करेल असा अग्नी या विश्वात अजून जन्माला यायचा आहे. तुमचे संस्कार आणि आदर्श चिरंतन आहेत आणि आम्हाला ते मार्गदर्शन करत राहतील.

कित्येक शतकांच्या, पिढ्यांच्या दीर्घ ओळीला तुम्ही तळमळीने एक आकार दिला. इथून पुढच्या अनेक पिढ्यांत आता हा ज्ञानाचा दीप प्रज्वलित होत राहील. हा विचारच इतका ऊर्जादायी आहे, कि इथून पुढल्या अगणित पिढ्या जर सुखी होणार असतील, तर त्या केवळ तुम्ही केलेल्या  कष्टांमुळे आणि घेतलेल्या निर्णयांमुळे. परिघवर्ती दुःखाच्या गाभ्यात हे एक समाधानाचं रोपटं पालवतं आहे. तुम्ही ही शिकवण दिलीत की, आपलं जीवन हे कधीच सर्वस्वी आपलं नसतं, आपण आज करत असलेल्या कामामुळे, आज घेतलेल्या निर्णयांचा आपल्या पुढील कित्येक पिढ्यांवर चांगला - वाईट परिणाम होणार असतो, म्हणून आपली स्वतःची जबाबदारी फार मोठी असते आणि ती प्रत्येकाने पार पडायलाच हवी. एक-एक दिवस मागे पडत जातो, तसं तुमचे कष्ट आणि साधेपणा आठवत राहतो. आजही जेव्हा आमची वाट अंधारलेली असते, तेव्हा आमच्याकडून तुम्हाला असलेल्या अपेक्षांचं स्मरण होतं आणि आमची वाट हजारो लामणदिव्यांनी आपोआप उजळून जाते.

शेवटी आपण सगळे एकाच रेल्वेचे प्रवासी. कुणाचं स्टेशन लवकर येईल तर कुणाचं उशिरा, एवढंच काय ते. कधीतरी तुम्ही पुन्हा भेटालही, की आणखी पुढे निघून गेला असाल? माहीत नाही. पण जिथे कुठे असाल तिथे हा एवढाच निरोप की, तुम्ही कधीकाळी एकट्याने अंधारात पेटवलेला दिवा अजूनही उजळतो आहे आणि तो तसाच उजळत राहील याबाबत निश्चिन्त असा.

तुमचाच,

पुष्कर


No comments:

Post a Comment

मी(तू?)

अधाशासारख्या कोसळणाऱ्या पावसात सप्तमीचा चंद्र झाकोळला तेव्हा तू कुठे होतास? एरवी कितीही दाबून ठेवलं तरी आतून उसळ्या घेणारं तुझं प्रतिबिंबित ...