# # #
बेंगलोर च्या दोन - दोन खेपा आणि त्यातही शेवटची खेप बेंगलोर टू हैदराबाद व्हाया सोलापूर अशी झाल्याने अतिप्रचंड अशा स्वरूपाचा थकवा होताच. त्यातून ऑफीस मध्ये पाउल टाकल्या टाकल्याच नितीन सरांचा हसरा चेहरा दिसला. सकाळी सकाळी हे एव्हडं मोठं स्मितहास्य आणि वरतून विचारपूस झाल्याने मला गडबडीची शंका आलीच होती. नतीजा - तीन दिवसांसाठी(रात्रींसाठी) नाईट शिफ्ट ची ऑर्डर!
तसं मला नाईट शिफ्ट मनापासून आवडते. निद्रादेवीचा माझ्यावर अदरवाईजही कोपच असतो. त्यामुळे त्या वेळात काही काम झालंच तर वेळ सत्कारणी लागल्याची ख़ुशी. दुसऱ्या दिवशी नाही म्हटल तरी जरासा त्रास होतो, पण त्या त्रासापुढे ऑफिस मध्ये रात्री मिळणारी शांतता आणि बऱ्यापैकी एकांत हे नेहेमीच चांगले वाटतात.
# # #
सकाळी रूम वर आल्या आल्याच एक थंडगार हवेची एक मंद झुळूक आली. हैदराबादच्या भर मार्च महिन्यात ही अशी थंड सकाळ बरीच दुर्मिळ. कदाचित रूममेटने रात्रभर चालू ठेवलेल्या आणि अजूनही चालूच असलेल्या डेझर्ट कूलर चा हा परिणाम असावा.अगदी दहा वाजेपर्यंत बिनधास्त ताणून दिल्यानंतर चहाची आठवण झाली.
इंडक्शन वर पाणी आणि चहा उकळून झाल्यावर साखर संपल्याचा साक्षात्कार झाला. पातेलं झाकून सुटे पैसे वगैरे घेऊन निघालो. दुकानात गेलो. बऱ्याच दिवसांतून आल्याने दुकानदाराची नेहेमीची विचारपूस. क्या साब, दिखते नई आजकल? कायको? गांव को गये थे? लगा च मेरेको. ऐसा क्या? लगातार छुट्टीया आयी समझो, नही? हम्म सही है. और ब्रेकफास्ट किये, नही किये? ब्रेड नक्को? सिरफ शुगर? अय्यो... शुगर तो हो गया. कायके वास्ते लेरे? चाय के वास्ते? हम्म जर्रा बचा है डब्बे मे. अभी के लिये बस हो जाइंगा. असं करत त्याने अगदी छोटीशी पुडकी बांधून दिली. हा अगदी मी हैदराबाद मध्ये राहायला आलो तेव्हापासूनचा आमचा दुकानदार. घराबाहेरच्या छोट्याश्या पडवीत उघडलेलं दुकान आणि दुकानात बसलेला तो, त्याची गालांवर छोटेसे हळदीचे पट्टे उमटवलेली त्याची बायको आणि कधी -मधी दिसणारा त्यांचा 'पोट्टा'.
# # #
चहा वगैरे घेऊन झाल्यानंतर reflexes थोडे strong झाले. आणि झोप पूर्णपणे दूर झाली. आणि मी गेल्या दोन आठवड्यांत घडलेल्या घटनांचा विचार करू लागलो. अचानक बेंगलोर चा प्रोजेक्ट मिळणं, मी त्यासाठी बेंगलोर ला दोनदा जाणं, तिथून सोलापूर ला घरी, सोलापूर हून कोल्हापूर ला भावाला भेटायला जाणं, म्हणजे या दोन आठवड्यात माझा जवळपास तीन हजार किलोमीटरचा प्रवास झाला. प्रवासात माणूस अंतर्मुखी होतो. याला कारण असं की प्रवासात काही करायचं नसतं. लोक कादंबऱ्या वाचतात, news papers वाचतात, मोबाईल वर गेम्स खेळतात आणि सगळं करून झालं की झोपतात. माझं याच्या अगदी विरुद्ध मत आहे. प्रवासात तुम्ही स्वतःच्या अगदी जवळ असता, स्वतःसाठी काळजी करत असता आणि इतर गोष्टींपेक्षा तुम्ही स्वतःचा जास्त विचार करता. त्यामुळे ध्यानासाठी प्रवास हा ही एक उत्तम avenue ठरू शकतो.
प्रवासात आपण एका ठिकाणाहून निघून दुसऱ्या ठिकाणी पोहोचतो. पण technically, आपण स्वतः काहीच करत नाही. कुणीतरी आपल्याला पैशांच्या मोबदल्यात कुठेतरी घेऊन जातं. आयुष्याचंही असं च नाही का? आपण नेहमी एखाद्या प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात प्रवास करतो, आणि त्यात आपली फारशी भूमिका नसते. परिस्थिती आणि इतर लोक आपल्याला एका प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात घेऊन जातात. आपण फक्तं सुरुवात करतो, आणि एका वेगळ्या अवस्थेत, वेगळ्या ठिकाणी जाऊन पोहोचतो, ज्याची आपल्याला कसलीही कल्पना नसते.
# # #
अचानक दार वाजलं तसं मी उठून बाहेर गेलो.
पाहिलं तर पाणी वाला. रिकामे बबल्स त्याला देऊन भरलेले घेतले, हिशोब करून तो निघून गेला,
तोपर्यंत चांगले पाचेक वाजलेच होते. परत एकदा दूध आणून मी चहाचं पातेलं इंडक्शन वर ठेवलं.
# # #
No comments:
Post a Comment