Sunday, 31 August 2014

चांदवा




# # # # #

खरंच. पावसाचा आवाज कागदावर कसा लिहायचा?

     तरीही धो धो धो पडणारा पाउस कानात साठला की मग तो मनातून वाहायला लागतो. मनाचे हजारो कप्पे. दरवेळी नवीन दार उघडं आहेच. अजून माझंच असून मलाही त्यांची पुरती मोजदाद नाही. कधी कोणती खोली उघडेल आणि पडद्यामागून पडदे बाजूला सरत काय समोर येईल याचा अंदाज कुणी कसा लावावा? नक्कीच मनाचही काही सनातन संचित आपल्या पूर्वजांकडून आपल्यात उतरत असलं पाहिजे. काही अमूर्त आठवणी... काळवेळेपलीकडच्या. काही प्रसंग आणि कधी कधी काही व्यक्तीही.

     सुरुवातीच्या अगदी अपरिचित व्यक्ती प्रत्येक भेटीनंतर वेगळ्या वेगळ्या वाटत गेल्या. परिस्थितीनुसार त्यांच्या चेहऱ्याला अगणित संदर्भ. पुस्तक वाचता वाचता कंटाळून मध्येच एखादा बुकमार्क टाकून पुस्तक ठेवून द्यावं. पुढच्या वेळी निराळंच पान उघडून पुन्हा नवा बुकमार्क. प्रत्येकच चेहेरा असा बुकमार्क ने भरलेलाय. प्रत्येकाचा वेगळा संदर्भ... कुणाकडून काय घेणारेस अन किती? बघ ते. पुन्हा एका चेहऱ्यावर दिलासा देणारं स्मित उमटलं अन त्यापाठोपाठ कित्तीतरी नवीन कोडी... क्या ब्बात है जनाब.

# # # # #

     दुपारच्या जेवणानंतर आलेली झिंग उतरवायला चहाचा डोस उपयोगी असतो. त्यातून इथले इराणी चहावाले चहा बनवण्यात मातब्बर. रस्त्यातन चालता चालता नुसत्या वासाने चहाची तलब झाली नाही असं शक्य नाही. एकीकडे मलईदार दूध खळाखळा उकळत असताना दुसरीकडे चहाचं “डिकाशन” (Decoction) एका तोटी वाल्या टाकीत ओतलं जातंय... चाय ची ऑर्डर दिल्या दिल्या पळीने दूध आणि वरची थोडी मलई कपात आणि मग त्यावर “डिकाशन”. बाजूला वरखाली करून मिसळायला दुसरा कप. आणि असा चहा दोन मिनिटात हजर. पहिल्याच “सिप” मध्ये ताजेतवाने.

     तमातून ज्योतीकडे नेणारं कलियुगातल अमृत काय असेल तर हे.

# # # # #

Monday, 9 December 2013

मन मनास...

दिवाळीचे उजळलेले दिवस परत जाताना उन्हं कलती करून जातात.

     सकाळच्या नव्या हवेत साचलेलं मऊशार गडद धुकं. लोण्याप्रमाणं धुक्यात वितळत जाणारं ऊन. चालता चालता थबकून मी तळ्याच्या काठी उभा राहतो. झाडा झुडूपांशी सलगी करत विस्तीर्ण पसरलेलं तळं. तळ्याच्या त्या काठाला मला लांबवर रस्ता दिसतो. ह्या असल्या थंडीतही रस्ता जगण्याचा ओघ वाहून नेतोच आहे. मी सावकाश नजर खाली वळवतो. तळ्यात अस्थिर असं माझं प्रतिबिंब. पहाटवाऱ्यामुळे ते हलतंय की आतली अस्थिरता तळ्याच्याही नजरेतून सुटली नाही कोण जाणे?... तसल्या दाठूरत्या थंडीतही माझ्या चेहेऱ्यावर हसू उमटलं. प्रतिबिंब मला पाहून विचारतं, “कोण आहेस तू? तुला काय हवंय?”

     मी उलट त्यालाच विचारलं, “कुणाच्या सापेक्ष मी कोण आहे म्हणून सांगू?” ते नुसतंच हसलं. तेही बहुधा माझ्याच जातकुळीतलं असावं. कुणीसं लिहून ठेवलंय, तुम्हीही जगाचाच एक भाग आहात, निर्जीवांपेक्षा तुमच्यात फक्तं एकच गोष्ट वेगळी आहे, तुमच्यात जीव आहे. बाकी तुम्हीही अणुरेणूंचा एक पुंजकाच. त्यांच्यासारखे. म्हणूनच कदाचित त्यांनाही दुःखाची जाण असेलच की. म्हणूनच दुःखाने पोळलेल्या अशाच एखाद्या हतबल जीवाने अथांगाकडे कधीकाळी याचना केली असेल... “मा कश्चित दुःखमाप्नुयात...”

     सूर्य जसजसा आकाशात वर आला, तसतसं हळूहळू धुकं विरून गेलं, तळ्याचा सभोवार लख्ख झाला. खरंच, जग उजळायचं असेल, तर दूरवर एखाद्या सूर्याला जबाबदारीनं रात्रंदिवस जळावंच लागतं. त्याचं कोणाला महत्त्व नसेलही, पण एखादा दिवस तो उगवलाच नाही तर? भयंकर कल्पना. मी मागे फिरलो. झाडांखालच्या मळलेल्या पाऊलवाटांवर चालताना झाडांतून पाझरणारे नाजूक कवडसे. पाचोळ्यात माझी पावलं वाजली, तसं बाजूच्या झाडावरून फडफड करत शेकडो बगळे आकाशात उंचच उंच उडाले, सुंदर दृश्य पाहून मी समोर नजर वळवली तर समोरचं झाड निष्पर्ण. अगदी एकाही फांदीला एकही पान शिल्लक नाही. दुर्दैव. मी म्हणालो. पण ते म्हणालं, “माझ्या डोळ्यांत वसंताची स्वप्नं आहेत.”

     मागे फिरून एकदा या सगळ्या दृश्यावर नजर टाकली.

     “पितात सारे गोड हिवाळा...”

Friday, 18 October 2013

खा खा

# # # # #


     दिवसभराच्या कामानंतर चेहेऱ्यावर पसरलेला मख्ख थकवा घेऊन मी नवीन बुटाच्या आत दुखणाऱ्या पायाकडं साफ दुर्लक्ष करत डी. आर. डी. ओ. चौकात बसची वाट पाहत असतो. कामाचा ताण घालवण्यासाठी कानात अखंड वाजणारे शंकर महादेवन, सोना महापात्रा, श्रेया घोषाल...

     नेहेमीप्रमाणे बसचा रश अवर. चुकूनमाकून थांब्याला बस लागलीच तर जणू बालापूरला चौरस्त्याला जाणारी ती जगातली शेवटची बस असल्याप्रमाणे लोकांची गर्दी. शिवाय एवढ्या दिव्यातून बसमध्ये जागा मिळालीच, आणि एखाद्या म्हातारबुवांनी वगैरे जागा मागितलीच, तर “ ओके अंकल, कूरचोअंदी” (म्हणजे बसा; तेलुगु) म्हणण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून एखाद्या unfortunate दिवशी मग शेअर ऑटोनेच जायचं, असं माझं आणि शाहीदचं ठरतं.

     “अबे रोक उस ऑटोको...” – असं मला म्हणून “आपेंडी आपेंडी” (थांबवा; तेलुगु) असं स्वतःच करत कपूर ती गच्च भरलेली केविलवाणी ऑटो थांबवायचा “ऑटोकाट” प्रयत्न करतो. अशा दोन तीन भरगच्च ऑटो आणि मग सरतेशेवटी खास आमच्यासाठी आली असावी अशी एखादी रिकामी शेअर ऑटो.

     अभिषेक कपूर. खाण्याचे पदार्थ शोधणाऱ्याला जर नोबेल मिळत असतं तर यंदाचं नोबेल त्याच्या “बन–बोंडा” या शोधासाठी त्याला नक्की मिळालं असतं.
www.blendwithspices.com
     बन–बोंडा म्हणजे अभिषेक कपूर या माझ्या उत्तर भारतीय मित्राने जमवून आणलेलं मराठमोळ्या वडा–पावचं तिलंगणातलं रूप. चौघात मिळून अर्धा डझन बनपाव घेतले आणि तितकेच बोंडे (बोंडे? – अनेकवचनासाठी माफी) घेतले की मग संध्याकाळी भातासोबत कसली आंबट-चिंबट करी खायला मिळेल याची चिंता करायची जास्त आवश्यकता नसते. आंबट चव म्हणजे तेलुगु लोकांचा जीव की प्राण. अगदी चटण्यांपासून भाज्यांपर्यंत सगळं आंबट ढाण!

     त्यातल्या त्यात दिलासा म्हणजे चिकन बिर्याणी. सिकंदराबाद स्टेशन च्या बाहेर अल्फा म्हणून एक फेमस बिर्याणी चं हॉटेल आहे. एकदा सिकंदराबाद ला गेलो तेव्हा आणि परत निघताना अश्या दोन्ही वेळेस जायला मिळालं. चिकन बिर्याणी तर टेस्टी होतीच होती पण व्हेज बिर्याणीही त्याचा तोडीस तोड!

# # # # #

     रंगल च्या चौरस्त्याला गेलं, कि तिथे कोपर्यावर एक अल्टीमेट फास्ट फूड ची टपरी आहे. पहिल्यांदा जेव्हा शाहीद, अभिषेक, दीपक आणि मी मिळून तिकडे गेलो तेव्हा बोंडा खाल्ला होता. आतापर्यंत माझी आणि बोन्ड्याची ओळख पुण्यात मिळणाऱ्या “आलू बोन्ड्यापर्यंत” मर्यादित. पण इथला बोंडा हा तांदळाच्या आंबवलेल्या पिठापासून तयार केलेला. भुकेच्या तावात तिसरी प्लेट संपवताना आम्ही चौघेही या डीशच्या प्रेमात पडलो. शिवाय एवढं खाऊनही मी शेवटी निर्लज्जपणे मसाला डोसा मागवला. उत्तरेकडच्या मसाला डोशाच्या तोंडात मारेल इतकी सुंदर टेस्ट. नुसता मसाला खाऊनच हायसं वाटलं. खरं डोशात भरायच्या सुक्या बटाट्याच्या भाजीला “मसाला” का म्हणायचं हा प्रश्न असला, तरी हा मसाला तयार करण्यात इकडचे लोक माहीर.

www.sree-srecipes.blogspot.com



# # # # #

Saturday, 3 August 2013

बोलावणं

“जित्यापणी पाणी पाजायला कुणाला फुरसत नसती. सगळे आपापल्या परपंच्यात असत्यात! मेल्यालं माणूस कधी पाणी प्येतय व्हय? आन ते काय! हाताला येईल तो फटकूर कुणी कधी धुतल्याला असतोय का नसतोय त्यात पाणी पिळायला दहा जणांचे हात! अर्ध पाणी तोंडात न अर्ध भाईर! अशा तर्हा, कशाचं काय आलंय? मेलं म्हजी गेलं.”

या ओळी वाचल्या अन तासभर कानात घुमत राहिल्या.

जिनं हे म्हटलं तिलाही शेवटी त्याच पद्धतीनं पाणी पाजण्यात आलं. मरण. प्रत्येकासाठी अटळ.

# # # # #

पल्या सर्वांच्याच आयुष्यात एका “आई” चं स्थान ती नसते तेव्हाच कळणारं. एरवी सगळे आपापल्या प्रपंचात गढून गेलेले असतात. नरेंद्र जाधव म्हणतात त्याप्रमाणे आई ही आपल्या जगण्याच्या रेल्वेचं जणू “अनसीन इंजिन” असतं. रावसाहेब ससाणे यांनी त्यांच्या “बोलावणं” या पुस्तकाच्या रूपाने त्यांच्या आईचं जाणं अन त्यायोगे आईचं संपूर्ण आयुष्य उलगडून दाखवलंय.
माझ्या नगरच्या आत्याचे मिस्टर डॉ. अनिल ससाणे, रावसाहेब ससाणे हे त्यांचे भाऊ. त्यांच्या आई भीमाबाई यांच्या सहवासात मला कधी राहण्याचा प्रसंग आला नसला तरी, तरी त्या सर्वांनाच फार जीव लावायच्या असं मी बाई, बाबा, आणि माझ्या सगळ्याच माणसांकडून ऐकलंय. आणि आता या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचं आणि त्यांनी जगलेल्या आयुष्याचं पर्व अगदी जसंच्या तसं वाचायला मिळालं.

गावाकडच्या चालीरीती, महार म्हणून भाकरीच्या उद्देशाने करावी लागलेली गावकीची कामे, बाबासाहेबांच्या शिकवणुकीतून वाहू लागलेले परिवर्तनाचे वारे, त्यांनी गावकीची कामे नाकारण्याचा दिलेला संदेश, तरीही कुटुंब चालवता यावे म्हणून म्हातार्याला(लेखकाचे आजोबा) करावी लागलेली गावकी, त्यातून उद्भवलेले कौटुंबिक वाद, वाळीत टाकलं जाणं, तरीही म्हातार्याने खंबीरपणे त्या सगळ्यांशी लढून पुढे नेलेलं कुटुंब... वाचता वाचता अनेकदा रडूही येतं.

तर काही प्रसंग मजेशीर. उदाहरणार्थ सौन्दराबाईचं अंगात येणं, तिचं भूतं पळवून लावणं, यासारखे अनेक.

एक चांगलं पुस्तक.
# # # # #



Wednesday, 12 June 2013

तो फोन आणि हा फोन...

यडिया चं असूनसुद्धा माझ्या सिमकार्ड नं मला द्यायचा तो दगा दिलाच. ऐन प्रोजेक्ट च्या वेळी No Service चा मेसेज!!! बरं, सुट्ट्या असल्याने माझ्या आजू बाजूच्या रूम्स मधली लोकं आपापल्या घरी गेलेली. आणि त्यातनं मी सिंहगड रोड पासनं साधारण किलोमीटर भर आत वडगाव मध्ये राहत असल्यानं मला STD बूथ शोधत हिंडण्याशिवाय पर्याय नव्हता.

     सुमारे निम्मं वडगाव पालथं घालून झालं. कुठेच बूथ दिसेना. बरं, बूथ असलाच तर त्याला टाळं लागलेलं. आणि त्या बंद पडलेल्या STD ला वाकुल्या दाखवत त्यांच्याच नाकाखाली उभी असलेली Mobile ची दुकानं. क्वचित कुठेतरी PCO चा बोर्ड. आणि तिथे चौकशी केली तर म्हणे फक्त  FAX पुरताच चालूये म्हणे फोन! वरून धो धो पडणारा पाउस, आणि छत्रीखालून दुकानांचे बोर्ड वाचत फिरणारा मी.

    संपर्क साधनांच्या क्रांतीने टेलिफोन चे बूथ म्हणजे अडगळ हे ठरवूनच टाकलं होतं कदाचित. पण असल्या धांदलीत पण मला माझं लहानपण आठवलं. घरात पाहिलं टेलिफोन कनेक्शन आलं, त्याचं केवढं कौतुक! आलेला प्रत्येक फोन पहिल्यांदा मीच उचलून hello म्हणण्यासाठी माझी धडपड असायची. हे मोबाईल वगैरे आत्ता आत्ता चे. आणि या टेलिफोन ची झालेली ही केविलवाणी अवस्था!!! चक्क Antique म्हणून फोन चं device दिवाणखान्यात मांडलेलं!

     बरं, असल्या landline चा आणखी एक फायदा असा कि ते एका जागी फिक्स केलेले असायचे. miscall देऊन त्यांच्या आवाजाचा मागोवा घेत त्यांना घरभर शोधत हिंडाव लागत नसायचं. त्याची जागा ठरलेली! शिवाय त्यांची चोरी वगैरे ही तर गोष्ट लांबच राहिली.

     आजकाल तर मोबाईल पण smart झाले!!! Net Connectivity आली तसं मग फेसबुक, We chat,  आणि Whatsapp. फोन उचलून बोलायलाही नको. फक्त मेसेज type करून सेंड चं बटन दाबायची खोटी.

     बदलत्या काळाला माझं नमन असो अश्या अर्थाचं एक सुभाषित आहे... तेच माझ्या नुकत्याच सुरु झालेल्या so called smart फोन मधून “Google” करतोय!!!

Friday, 8 March 2013

भूतकाळातला प्रवास


कोण म्हणतं कि time travel ही एक fantasy आहे?

     Time travel म्हणजे हॉलिवूडी fantasy पटात  दाखवल्या जाणाऱ्या मोठमोठाल्या मशिनिंमधून एकदम फाटकन time travel करणं, एवढंच नाही. कधी घरातली एखादी खोली आवरायला घ्या. एरवी अडगळ वाटणाऱ्या कित्येक गोष्टी घड्याळाचे काटे मागे फिरवत नेतात. पहिली पानं उलटून पाहत “कोरीच तर आहे” करून वापरायला काढलेल्या जुन्या डायरीची मागची पानं abstract art कधी झालेली असतात काही कळत नाही. कधीकाळच्या कुणाच्या व्यक्त-अव्यक्त भावनांनी त्यांची शेवटची पानं गच्च.

     “झालं. आता ही एवढी रद्दी बांधली की झालंच” असं म्हणत जुन्या वह्यांचे गठ्ठे उचलताना एखादी rather जुनाट म्हणजे अगदी जीर्ण झालेली वही हातात येते. “बघू तरी काय आहे ते” .. पानांमागून पानं उलटताना पुन्हा kaleidoscope चा आविष्कार. पहिल्या पानावर बारीक बारीक अक्षरांत पद्मा गोळ्यांची कविता कुणा रसिक मनानं तिथं लिहून काढलेली असते,

“इतकी बेपर्वाई आकाशालाच शोभणारी...
तुही स्वतःला आकाश समजू लागलास का
मी म्हटले म्हणून?
कितीही म्हटले परस्परांना अलौकिक असामान्य...
तरी मूळ मातीतच
हे तुला कळत नाही असे का मी म्हणते?
एक विचारू?
कलंदराला हवीच का असली बेपर्वाई?
आकाशाची पोकळ पोकळ निळाई?
चिडले नाही रे..
चंद्र-सूर्य पाहते न मी तुझ्याच डोळ्यांत?
चंद्र-सूर्याला का दिसावीत आसवं कोणाच्या डोळ्यातली?
मातीचे मुके कढ मातीच जाणे...
... पण तू आकाशच राहा
नाहीतर मी डोळे उचलून पहायचे तरी कोणाकडे?”

     कविता वाचत वाचत मनानं कवितेत हरवून जावं तर अगदी पुढच्याच दोन पानांवर “कैरीचा तक्कू” कसा बनवायचा याची कृती लिहिलेली. अन त्यापाठोपाठ रसलिंबू, पोह्याचे पापड... यांच्या कृती. त्याच्याच पुढच्या पानावर आठवून आठवून लिहिलेला महिन्याचा हिशेब. “७ तारीख – दूध अर्धा लिटर जास्त” अशा सांकेतिक वाटणाऱ्या मेमोजनी वही अजूनच interesting झालेली. अन अश्या साताठ वह्या अडगळीत. प्रत्येक वही आधीपेक्षा जास्त nostalgic... घर आवरायचं म्हणजे खरं निवांत एखादा दिवसच काढायला हवा.

     कुठल्यातरी कोपऱ्यात सापडणारा पत्त्यांचा क्याट. अन सापडला म्हणून खेळलेला एखादा रमीचा डाव.

     सगळ्यात महत्वाचं आणि मला आवडणारं काम म्हणजे एक्सपायरी डेट झालेली औषधं फेकून देणं. कधी कुणी न बघता घेतली तर पंचाईत नको म्हणून जुनी औषधं धडाधड फेकून देता येतात. पण अडगळीत नवनवीन सापडणाऱ्या वस्तूंनी ताज्या होत जाणाऱ्या आठवणी. या असल्या आठवणी थोड्याच एक्सपायरी डेटसोबत येतात? फेकून द्यायचं म्हटलं तरी न फेकता येणाऱ्या आठवणींची अडगळ. आयुष्यात कधीही न साफ होणारी. सगळे जुने दिवस जसेच्या तसे डोळ्यांसमोर उभे करणाऱ्या आठवणी.

     घर आवरताना आठवणींच्या कोळीष्टकामध्ये आपसूकच गुंतून जायला होतं. एका झाडूच्या फटक्यासरशी ती कुठली उडून जायला?

Wednesday, 10 October 2012

श्रीरंजन चा वाढदिवस.


श्रीरंजन आवटे.

माझा ज्युनिअर कॉलेज ला असल्यापासून चा मित्र . त्याचा वाढदिवस म्हणजे माझ्यासाठी किंवा आम्हा सर्वांसाठी एक फार चांगली वेळ असते. कारण त्याचा वाढदिवस म्हणजे खरंच “वाढ”-“दिवस” ची खरीखुरी संकल्पना काय आहे हे समजावून देणारा असतो.

मुळातच श्री हा एक unconventional आणि कुठल्याही गोष्टीबद्दल स्वतःची अशी (आणि तीसुद्धा ठाम!!!) मते असणारा मला भेटलेला माझ्या वयाचा एकमेव मनुष्य आहे. Unconventional  यासाठी की बरोबरीचे सगळे engineering ला जात असताना त्याने modern college ला मिळालेलं admission सोडून फर्ग्युसन कॉलेज ला B.Sc. ला जाण्याचा निर्णय घेतला. आणि आज त्याच्याकडे पाहिलं की त्याने घेतलेला निर्णय किती योग्य होता हे कळतं.

वाढदिवस म्हटला की केक, पाहुणे आणि मित्रांना पार्टी, आणि बर्थडे बम्प्स ह्या एवढ्याच गोष्टी “फन” म्हणून होणाऱ्या वाढदिवसांपेक्षा हा खराखुरा वाढदिवस मला भलताच आवडतो.

होतं असं, की त्याच्या वाढदिवसाला सगळ्या वयोगटातली लोकं, म्हणजे त्याचे आई बाबा, मावशी, आम्ही मित्रमंडळी, त्याची लहान बहिण श्रुती, कधी कधी त्याचे चुलत / मावस भाऊ-बहिणी असे सगळेजण निवांत सतरंजी वगैरे टाकून गोल करून बसतात. काव्यवाचनाचा कार्यक्रम होतो. गेल्या वर्षभरात ज्या काही कविता केल्या, प्रत्येकजण आपापल्या कविता वाचून दाखवतो. श्री चे बाबा म्हणजे कवितेतला मानदंड! त्यांचा धम्मधारा हा कवितासंग्रह गेल्याच वर्षी रावसाहेब कसब्यांच्या आणि सतीश काळसेकरांच्या हस्ते एस एम जोशी मध्ये प्रकाशित झाला. त्यांच्या कविता त्यांच्याच तोंडून ऐकायच्या म्हणजे सोने पे सुहागा!

तसा कवितांच्या बाबतीत श्री पण काही कमी नाही. नुकतच त्याच्या कवितांसाठी एका दिवाळी अंकाचं पत्र त्याला आलंय.

मग या कविता-गप्पा-विनोद ( विनय च्या भाषेत बोलायचं, तर बौद्धिक टिंगलटवाळक्या) सुरु असताना मध्येच काकूंची लगबग सुरु होते आणि मग पाव-भाजी किंवा वडा-पाव, आईसक्रीम serve होतं. खाता खाता मग श्रुतीचं गाणं, (ती छान गाते),एक दोन उत्तम काव्यसंग्रह circulate होत असतात, ते चाळायचे, अन मग पुन्हा वेगवेगळ्या विषयांवर गप्पा सुरु. श्री चे almost सगळेच मित्र political science ला आहेत. त्यामुळं गांधीवाद, आम्बेडकरवाद काही चळवळीतल्या, बंडखोर कविता हेही ऐकायला मिळतं. आता यावेळी गणेशदा लवकर निघाले, (तब्येत बरी नव्हती) पण गेल्या वर्षी त्यांनी गालिब ची “हजारो ख्वाहिशे ऐसी” ही गझल खूप छान म्हंटली होती.

“हजारो ख्वाहिशे ऐसी
की हर ख्वाहिश पे दम निकले
बोहोत निकले मेरे अरमा लेकीन फिर भी कम निकले
निकलना खुल्द से आदम का सुनते आये थे लेकीन
बोहोत बे-आबरू होकर तेरे कूचे से हम निकले...”

मी तर त्या गझलचा अन तेव्हापासून मिर्झा गालिबचाही fan होऊन गेलो.

गेल्या वर्षी भैरुरतन दमाणी पुरस्काराचे मानकरी ठरलेले कवी नागराज मंजुळे ह्यांना मी श्री च्या बर्थडे(गेल्या वर्षीचा) मुळे भेटू शकलो. त्यांचा “उन्हाच्या कटाविरुद्ध”, हा काव्यसंग्रह वाचायला मिळाला, आणि तेव्हा त्यांनी स्वतः त्यातली “पाऊस” ही कविता विश्लेषणासकट सादर केली होती. अप्रतिम कविता. प्रेमात पडलेल्या मुलाची अन मुलीची ती गोष्ट आहे. मुलासाठी पाऊस हे रूपक त्यांनी फार छान वापरलंय.

त्यांचीच त्या कवितासंग्रहातली “बेईमान” अशीच एक short but sweet कविता आहे.

“...आता कसा तुला
मी या डोळ्यांत साठवू,
माझी नजर नेसून गेलं
एक बेईमान फुलपाखरू.”

या अशा कविता तर अजिंक्य चंदनशिवेच्या (माझा मावसभाऊ) बंडखोर कविता. “लाज वाटते रामा, तू माझ्या देशात जन्माला आलास...”ही रामावर केलेली,
“आणि मरतानाही “हे राम” म्हणून शंबुकाच्या मारेकर्याचा जयजयकार केलास, अन दलितांना “हरिजन” ही शिवी देऊन गेलास” ही गांधींवरची कविता....या आणि अशा अनेक... फारच बेधडक.... पण कवितेच्या निकषांवर फार उत्तम जमलेल्या कविता...

आणि खरंच, अजिंक्य साठी तर माझा respect! PVG सारखं कॉलेज, Electrical सारखी ब्रांच असूनही त्यानं फर्स्ट इयर झाल्यावर engineering सोडायचा धाडसी निर्णय घेतला. आणि Fergusson ला Political Science ला admission घेतलंही. स्वप्नांना सत्यात उतरवण्याची जिद्द असावी तर अशी.

# # # # #

यावेळी स्नेहलता ताईने एक नवीन संकल्पना मांडली. (स्नेहलता ही श्री ची मावसबहीण. Zeal कॉलेज मध्ये Maths ची Faculty म्हणून काम करते. नुकतीच ती लंडन येथे Leadership Quality वरचा एक २१ दिवसांचा course करून आली.) तर तिच्या संकल्पनेनुसार श्री ने तिथे जमलेल्या प्रत्येकाच्या २ चांगल्या Qualities सगळ्यांना सांगायच्या अन  शेवटी मग सगळ्यांनी श्री च्या दोन चांगल्या अन दोन वाईट qualities सांगायच्या असं ठरलं.

त्यानुसार मला माझ्याबद्दल दोन चांगले शब्द ऐकायला मिळाले.

श्री ने सांगितलं की मला कोणत्याही परिस्थितीचं फार लवकर आकलन होतं (म्हणे!), आणि माझ्यातली ऋजुता. आणि दुसरी quality म्हणजे सगळ्यांचं मत नीट ऐकून घेऊन मग कृती करण्याचा स्वभाव. ह्या दोन qualities चांगल्या आहेत. आजकाल स्वतः बद्दल हे एवढं कौतुक फुकटात कुठे ऐकायला मिळतं?

पण कल्पना छान होती. श्री ला एकच वाईट quality बद्दल feedback मिळाला. म्हणजे तू सर्वाना समजेल अश्या भाषेत लिहित जा. त्याचं लेखन हे फार बोजड असतं असं सगळ्यांचं म्हणणं. त्याने त्यावर योग्य तो follow up घेईन असं सांगितलं.

# # # # #

र असा हा वाढदिवस म्हणजे आपल्या जाणीवा आणखी एका वर्षाने समृद्ध करण्याचा दिवस, ही संकल्पना मला तर फारच पटली. रूटीन पद्धतीने फक्त केक, खाणे, आणि टाईमपास गप्पा यासाठी वर्षभरातले इतर ३६४ दिवस आहेतच की. पण वाढदिवसानिमित्त का होईना ,एकमेकांशी "संवाद" साधून एकमेकांच्या जगणं share करणं ही भावनाच किती छान आहे. आणि असा हा खऱ्याखुऱ्या अर्थाने साजरा होणारा श्रीचा "वाढ"दिवस म्हणजे ९ ऑक्टोबर माझ्यासाठी तरी एक पर्वणीच असते.

# # # # #

Wednesday, 3 October 2012

बर्फी...


गदी काल बर्फी पहिला. laptop वर.

     काही पिक्चर बघितल्यामुळे आपलाही जगण्याचा दृष्टीकोन बदलतो असे काही पिक्चर असतात. बर्फी त्यातलाच एक.

     पिक्चर सुरु असताना हजारदा वाटून गेलं, मर्फीला बोलता यायला हवं होतं. झिलमील मधूनच एकदम शहाण्या मुलीसारखी वागायला लागायला हवी होती. म्हणजे कसं सगळं सुरळीत होऊन गेलं असतं. पण नंतर नंतर जसा पिक्चर पुढे जायला लागला, तसतसं मग माझ्या मनानेही ही “नॉर्मल” जगण्याची चौकट सोडून दिली. And they lived happily ever after” हे वाक्य ज्याच्या त्याच्या या Happiness च्या कल्पनेनुसार बदलतं हे हळूहळू लक्षात यायला लागलं.

     कशीही असली तरी शेवटी जगाच्या Reference मध्ये “अबनोर्मल” असणारी माणसं पण माणूस म्हणून नॉर्मल असतात.

     झोपताना फक्त आपली करंगळी एका अनोळखी माणसाच्या करंगळीत अडकवली की झिलमिलच्या  सगळ्या insecurities संपतात.

आपल्या insecurities ?

कोण नॉर्मल ?

कोण अबनोर्मल?

हे इतकं साधं सिम्पल आयुष्य असू शकतं?

?

     अब्जावधी लोकांच्या गर्दीतली आपण बिनचेहऱ्याची माणसं. रोज नव असं काय अन किती घडतं आपल्या आयुष्यात? मर्फीला एक साधी गोष्ट श्रुतीला समजावून सांगायला टॉवर वर चढावं लागतं. अर्थात आता तो सिनेमाचा भाग झाला. डिरेक्टर च्या डोक्यातल्या कल्पनेचं मूर्त रूप. पण आजही आपल्या अवतीभवती असे कितीतरी मर्फी आणि झिलमील असतील... रोजचं जगणं म्हणजे एक आव्हान असणारे...

# # # # #

श्रुती घोष.

     आईने खुद्द स्वतःच उदाहरण दिल्यामुळं शेवटी confuse होऊन अरविंद सोबत लग्न करूनही ती सुखी नाही. पण परत एकदा नशीबानं मर्फी  भेटला, तरी आता त्याला झिलमील हवीये. अन ती त्याला सापडतेही.

     पण श्रुती त्या दोघांचं लग्न लावून देते... हा सीन मात्र अगदीच इमोशनल. विनोदाला कारुण्याची किनार असते म्हणतात त्या प्रमाणे. लाग्नातही तो झिलमील ला खुश करायला म्हणून चित्रविचित्र अवतार केलेली सोंगं नाचवतो, तेव्हा झिलमिलचे expressions खरच बघण्यासारखे. प्रियांका चोप्रानं खरंच अक्टिंग म्हणजे काय हे दाखवून दिलंय.

# # # # #

     अन शेवटी जेव्हा म्हातारा मर्फी मरतो, तेव्हा झिलमिल त्याच्या करंगळीत आपली करंगळी अडकवून झोपी जाते, तो सीन तर अगदी Climax असावा तर असा असं वाटायला लावणारा. खरंच एक अप्रतिम पिक्चर.

# # # # #

Wednesday, 26 September 2012

बऱ्याच दिवसांतून ...

     अगदी कालपरवाची गोष्ट. तसा अगदी लहान प्रसंग, पण कायमचाच लक्षात राहून गेला. मी यावर्षी GATE ची तयारी करतोय. (PG ची entrance ) तर झालं असं की त्यासाठी च्या exam form वर Principal ची सही हवी होती . त्या सही शिक्क्यासाठी मी आणि तुषार त्यांच्या केबिन बाहेर थांबलो होतो. इतक्यात बेल वाजली. मी आपलं घाबरत घाबरत दार किलकिलं करून May I come in sir ? असं आज्ञाधारकपणे विचारलं.  मानेनंच त्यांनी येण्यासाठी खुणावलं. मी आणि तुषार अगदी पावलांचाही आवाज न करता सावकाशपणे आत शिरलो. त्यांनी चष्मा वगैरे ठीकठाक केला आणि एकदा तो फॉर्म नीट वाचला. अन त्यावर भर्रकन सही केली. "हुश्श !" मी मनातल्या मनात म्हटलं. "झाली बुवा एकदाची सही" अशा अर्थाने मी तुषार कडे पाहिलं. कधी एकदा त्या tense वातावरणातून बाहेर पडतोय असं होऊन गेलं होतं. आता आम्ही मागे फिरणार तेवढ्यात त्यांनी वर पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर अगदी खरंखुरं स्मितहास्य होतं. "All the best ! Dwell in exam" असं अगदी प्रेमळपणे त्यांनी सांगितलं. त्याक्षणी जे काही वाटलं, ते शब्दात वर्णन करणं खरंच कठीण आहे. कारण याआधी असं निदान faculty मधल्या कुणीच कधी wish केलं नव्हतं. आणि त्यातूनही Principal म्हणजे फार करडा वगैरे माणूस असं वाटलं होतं, आणि Principal generally तसे असतातही. पण या सरांचा खरंच मनापासून आदर करावा असं आतूनच वाटलं. (शाळेनंतर कित्येक वर्षांनी असं पहिल्यांदा वाटलं.

     म्हटलं तर प्रसंग अगदी छोटासाच पण कायमचा लक्षात राहून गेला. बात जो दिल को छू गयी म्हणतात तसा काहीसा.
# # # # #

  तसा पीयूषाचा फोन म्हणजे ईद का चांद. म्हणजे मी तिला फार फोन वगैरे करतो अशातला भाग नाही, म्हणजे थोडक्यात करतच नाही. पण तीच बिचारी महिन्या-पंधरा दिवसातनं करत असते फोन. तर परवा तिचा फोन आला. सांगत होती की मुंबईत फार फिरणं वगैरे होत नाही, कारण room mates चं सोशिओ-इकॉनॉमिक background वेगळं पडतं वगैरे. त्यांची ट्रीप दिल्लीला चाललीये. थोडी थोडकी नाही तर तब्बल आठेक दिवस. म्हटलं मजा आहे. शेवटी Grant Medical. आणि ट्रीप पण AIIMS ला visit द्यायला  चाललीये. मला AIIMS फक्त "तिथे पंतप्रधान admit होते " यामुळेच माहीत. असो. पण आठ वगैरे दिवसांचा stay शिवाय शिमला आणि आसपासची ठिकाणं पण ती बघून येणारे म्हणजे छानच.
    
     बोलता बोलता academics चं विषय निघाला. त्यांचं एक अकॅडेमिक इयर दीड वर्षांचं असतं असं ती सांगत होती. शिवाय जसं जसं वरच्या वर्गात जाईल तसं तसं ही वर्ष चक्रवाढीने वाढत जातात. म्हणजे totally सातेक वर्ष! मला कधी कधी प्रश्न पडायचा की आपण medical ला गेलो असतो तर काय झालं असतं? काय झालं असतं त्याचं केस-स्टडी सकट उत्तर मिळालं.

    म्हणजे ज्यांचं डॉक्टरकी हेच ध्येय आहे त्यांनी medical ला गेलंच पाहिजे पण ध्येय वेगळं असेल तर फक्त तिथलं glamour बघून जाण्यात काही point नाही.
# # # # #

  Meanwhile मृतानं excelsior चे फोटो धुवून आणलेत. सगळंच्या सगळं कलेक्शन तिनं मला पेनड्राइव मध्ये आणून दिलंय. त्यादिवशी सगळे फोटो बघून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. खरंच ते दिवस सोन्याचे होते. मी कॉलेज च्या आर्ट कमिटी चा हेड होतो.आम्ही दिवसच्या दिवस मस्तमौला सारखं  कॉलेज बंक करून आर्ट कमिटी ची कामे करीत असायचो. हे जमायचं . कारण आम्हाला आर्ट कमिटी च्या कामासाठी कॉलेज कडून officially bunksheet मिळायच्या. (नावडती भाजी पथ्यावर)  आणि त्यातच तेव्हा cultural वीक असल्यामुळे रोज रात्री CC वर gathering असायचं. दिवसभराच्या कामाचा थकवा ट्रेजररने (हर्षल पह्राते) दिलेल्या कोल्ड कॉफी च्या पार्टी आणि त्या नाच गाण्यांच्या कार्यक्रमाने कुठल्या कुठे पळून जायचा. हे असंच कॉलेज रोज असावं असं वाटायचं. त्या दिवसांतल्या कित्येक संध्याकाळी कोल्ड कॉफी च्या स्वादाने गोड (किंवा कधीकधी roll house मधल्या chicken/veg रोल मुळे मसालेदार) झालेल्या आहेत. असो. नमनाला घडाभर घालण्याऐवजी ते तेल वाचवून मी थेट फोटोच अपलोड करतो. हे काही फोटो.

excelsior    चं वेलकम डिझाईन - क्रेडीट गोज टू तुषार ! त्याच्या बाजूला क्वोट्स लिहिलेले पोस्टर्स चिकटवलेले दिसतायेत आणि मागच्या भिंतीच्या दगडाच्या pattern मुळे ते अजून उठून दिसतंय ( हे तुषार चं तीन तीनदा व्यक्त करून झालेलं मत.)
work in progress!!!



पायरेट्स मधली black pearl !!! (idea by Ekta, Priyanka  and efforts by  all) फायनल सेट अप सुरु असताना 



Well-finished Black Pearl. शिप खरंच नजर खिळवून ठेवणारी बनली होती. Mechanical Department च्या सजावटीचं प्रमुख आकर्षण.
तुषार आणि शशांक 

कोल्ड कॉफी ची पार्टी  इन मंदार 

शोएब 

I specially liked this scene

Sunday at work

Black पर्ल चं काम सुरु असताना

आम्ही केलेल्या सजावटीचा संपूर्ण view  मध्ये Triangle लटकलेला दिसतोय  
Track चं एका रात्रीत केलेलं पेंटिंग 

माउंटन rally चा track

Wall E - Cartoon Character

हाच तो   Phenomenal  Triangle.  आयडिया चं पूर्ण क्रेडीट माझं. (सॉरी तुषार!) बाकी बनवताना सगळ्यांचीच फार हेल्प झाली Thanks to all !!  माझी आयडिया इतक्या छान पद्धतीने execute करण्यासाठी 

a funny moment!!!
हो .. आणि फोटो चं संपूर्ण क्रेडीट अमृतालाच !!!

वेळसावची संध्याकाळ

# # # # # ग्रीन टी चा बाजूला ठेवलेला कप कामाच्या नादात थंड झाला आहे हे लक्षात येतं, तेव्हा घड्याळाकडे लक्ष जातं. संध्याकाळचे सात. म्हणजे बाह...