# # # # #
२८ सप्टेंबर २०२३
गोपाल ची इंटर्नशिप जर्मनी मध्ये फिक्स झाल्यापासून जर्मनी ला त्याच्याकडे फिरायला जायचं हे ठरवून झालं होतं. मुळात कॉन्फरेन्स सप्टेंबर च्या सुरवातीला जर्मनी मध्ये फ्रॅन्कफुर्ट ला झाली त्यानंतर त्याला मी सप्टेंबर च्या दुसऱ्या आठवड्यात फ्रांस ला आणून स्ट्रासबुर्ग दाखवून माझ्याकडे बेलफोर्ट ला घेऊन आलोच होतो. एक-दोन दिवस राहून तो फ्रायबर्ग ला निघून गेला तेव्हा घर खायला उठलं. खूपच एकटं वाटलं. शेवटी मग त्याचा युरोप मधला शेवटचा वीकएंड ठरवून मग मी त्याच्याकडे जर्मनीला गेलो.
बेलफोर्ट पासून फ्रायबर्गला जायचं म्हणजे फ्लिक्सबस हाच एक किफायतशीर पर्याय आहे. तरीही एका बाजूचं तिकीट जवळपास ४० युरो पडलं. त्यातून फ्लिक्सबस बेलफोर्ट - स्ट्रासबुर्ग - ड्रेसडेन अशी आहे. ड्रेसडेन ला उतरून परत रेल्वे किंवा बसने फ्रायबर्ग गाठायचं असा हा बराच लांबचा जवळपास १८ तासांचा प्रवास होता, तो बस ड्रायव्हर आणि रस्ते कामांमुळे आणि ट्रॅफिक मुळे २० तासांचा झाला तो भाग वेगळा. कदाचित तो दिवसच वाईट असावा. पण चांगली गोष्ट म्हणजे बस मध्ये वायफाय आणि चार्जिंग पॉईंट होते आणि त्यामुळे मी बराच वेळ युट्युब बघण्यात घालवला. जर्मनी बद्दल, जर्मन लोकांच्या वक्तशीर पणाबद्दल ऐकलं होतं ते सगळं ह्या एका प्रवासात खोटं ठरलं . त्यातून गोपाल मला घ्यायला फ्रायबर्ग वरून ड्रेसडेन ला बस ने येणार होता. तो सारख्या नंबरच्या दुसऱ्याच बस मध्ये जाऊन बसला आणि शिवाय ड्रायव्हर ने त्याला ड्रेसडेन चं तिकीट सुद्धा दिलं म्हणू न तो निश्चिन्त होता पण जवळपास तासभर प्रवास झाल्यावर त्याला आपण भलतीकडे आल्याचं समजल, आणि मध्येच उतरून तो परत बिचारा फ्रायबर्ग ला आला. मला एकट्यालाच ड्रेसडेन वरून फ्रायबर्ग ची रेल्वे घेऊन जावं लागलं. फ्रायबर्ग ला ट्रेन बुकिंग, ट्रेन प्रवास सगळं होऊन पोहोचेपर्यंत रात्रीचे पावणे बारा वाजले होते. फ्रायबर्ग स्टेशन ला मात्र रात्री गोपाल घ्यायला आला आणि माझ्या जीवात जीव आला.
गोपाल चं घर रात्रीच्या अंधारात दुरून भूत बंगल्या सारखं दिसत होतं . जसं हॉलिवूड पिच्चर मध्ये दाखवतात तसं . छान बाग असूनही त्यात कमरेइतक गवत आणि झाडे झुडुपे वाढली होती. बाहेर कसलेही लाईट्स नाहीत, त्यामुळे अजूनच हॉरर मूवी चा अनुभव येत होता. पण एकदा मेन दार उघडून आत गेलो तेव्हा आतले प्रशस्त कॉरिडॉर, रुंद जिने आणि उंच छत पाहून बरं वाटलं . इमारत बरीच जुनी असली तरी आतून छान मॉडर्न ठेवली गेली होती. गेल्या गेल्या गोपाल ने जेवण गरम करून आणलं . कोबीची भाजी आणि चपाती खाऊन शांत वाटलं. शेजारी कोण राहतात याची चौकशी केल्यावर गोपाल ने सांगितलं कि एक पाकिस्तानी विद्यार्थी आहे, एक ईराणी प्रोफेसर आणि एक नायजेरियन पी एच डी करणारी मुलगी आहे. मग गप्पा टप्पा करत रात्री दोनेक वाजता आरामात झोपी गेलो.
# # # # #
२९ सप्टेंबर २०२३
सकाळी जाग आली ती थंडी मुळे . मस्त गारवा सुटला होता. गोपाल सुद्धा तेव्हाच उठला आणि मग आम्ही चहा केला. गोपाल ला आज युनिव्हर्सिटी मध्ये एक मीटिंग होती. त्यामुळे दोघेही आवरून मग युनिव्हर्सिटी ला गेलो. Technische Universitat Bergakademie Frieberg (Technical Mining University Freiberg) असं त्या युनिव्हर्सिटी चं नाव. फ्रायबर्ग हे आधी खाणकामा साठी प्रसिद्ध होतं . त्यामुळे खाणकामाशी संबंधित युनिव्हर्सिटी इथे आहे. पण कालानुरूप इथे खाणकामाव्यतिरिक्त इतरही इंजिनियरिंग चे विषय शिकवले जातात. नाश्ता न केल्यामुळे भूक लागली होती म्हणून पहिल्यांदा मेस (Mensa) मध्ये गेलो. तिथे चिकन बर्गर होते. परंतु गोपाल बर्गर खात नसल्याने त्याने फक्त फ्रेंच फ्राईज तेवढ्या खाल्ल्या. मग जमेल तिथे फोटो काढत काढत गोपाल च्या लॅब मध्ये पोहोचलो. लॅब सुनसान होती, बहुतेक लंच टाइम असल्याने सगळे गेले असावेत.
त्याची मीटिंग सुरु झाली तेव्हा मी परत घरी आलो. तेव्हा तिथे रोहित आणि ऋषी असे दोन इंडियन स्टुडंट्स भेटले. नुकतेच त्या अपार्टमेंट मध्ये राहायला आलेले होते. मुळात पूर्ण ड्रेसडेन आणि फ्रायबर्ग मध्ये कित्यके इंडियन, पाकिस्तानी, बांगलादेशी स्टुडंट्स आहेत. त्यांनंतर रूम मध्ये येऊन जे झोपलो ते थेट ५ वाजता उठलो. कारण कालचा दिवसभराचा प्रवास. संध्याकाळी गोपाल आला तेव्हा मग आम्ही चहा करायला घेतला. तितक्यात ते इराणी प्रोफेसर किचन मध्ये आले. त्यांचं नाव इनायत. बऱ्याच वेळ त्यांच्याशी गप्पा झाल्या, त्यांनी इराण चं अकॅडेमिकस कसं काम करतं ते सांगितलं . शिवाय त्यांना भारत आवडत असल्याचं सुद्धा सांगितलं . जोधा अकबर नावाची सिरीयल ते आणि त्यांचं कुटुंब पाहतं असं त्यांनी सांगितलं. बोलायला ते फारच मोकळे आणि मनमिळावू वाटले. नंतर मग कौफलँड म्हणून एक जवळच डिपार्टमेंटल स्टोर आहे, तिथे चिकन आणि इतर किराणा आणायला गेलो. कौफलँड मध्ये जवळपास ५०% जनता इंडियन, पाकिस्तानी वगैरे दिसत होती. आणि सगळे युनिव्हर्सिटी स्टुडंट्स. आपली लोकं पाहून जरा बरं वाटलं.
घरी येऊन मग मस्तपैकी चिकन बनवल आणि खाऊन झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी ड्रेसडेन फिरायला जायचं होतं .
# # # # #
३० सप्टेंबर २०२३
पहाटे बरीच थंडी होती. साधारण ६ डिग्री वगैरे असावं तापमान. सकाळी उठायला उशीर झाला आणि सडे आठ वाजता ड्रेसडेन ला जायची बस चुकली. मग त्यानंतर ट्रेन होती पण ती जवळपास साडेचार यूरोने महाग असल्याने आम्ही मग साडे अकराच्या बसने जायचं ठरवलं . बसने ड्रेसडेन मध्ये मुख्य स्टॉप हाऊप्टबानहॉफ ला पोचल्या पोचल्या तिकीट व्हेंडिंग मशीन वरून पहिल्यांदा डे पास घेतला. मग ग्रोसर गार्डन पाहायला गेलो. फार मोठं गार्डन आहे, आणि त्यात मध्यभागी एक महाल आहे. ट्राम ने पोहोचून गार्डन मध्ये गेल्या गेल्या खूप छान दृश्य पाहायला मिळालं. बाजूलाच नदी होती, त्यात संथ बोटी चालत होत्या, आणि आजूबाजूला दाट झाडी. सर्व परिसर अगदी स्वच्छ आणि चकचकीत दिसत होता. आपल्याकडे भारतात असलं गार्डन म्हटलं कि आजूबाजूला भुट्टे, पाणीपुरी, भेळ, आईस्क्रिम विकणारे गाडे लागतील, मग त्यांचा कचरा आजूबाजूला पडलेला राहील आणि सर्वत्र अगदी गजबजाट होऊन त्या जागेची शांतता लगेच भंग होईल. पण इथे अगदी सायकल चालवणारे, धावणारे, आपापल्या लेन ने जात होते आणि असले काही विकणारे, फेरीवाले अजिबात दिसत नव्हते. त्यामुळे तिथली शांतता, निसर्ग आणि स्वच्छता एन्जॉय करता आली. चालत चालत मग महालात पोचलो. महाल संपूर्णपणे खुला नसला तरी तिथे एक फॅशन एक्सहिबिशन सुरु होतं. ते पाहायला आम्ही गेलो. प्लास्टिक, कार्डबोर्ड, टाकाऊ कपडे, इत्यादींपासून खूप छान कपडे बनवून ते तिथे पुतळ्यांना घातले होते. काही कपडे अर्थात फारसे चांगले नव्हते, पण बऱ्यापैकी एक्सहिबिशन चांगलं होतं . ते पाहून मग आम्ही परत ट्राम घेऊन मुख्य शहरात आलो. आणि तिथे चर्च, म्युझियम, झ्विंगर म्हणून एक इमारत आहे अशा ठिकाणी आलो. खूप ऐतिहासिक शहर वाटत होतं ते. तिथे बरेच फोटो घेतले. आणि मुख्य चौकात आलो, तेव्हा कसलातरी ख्रिश्चन लोकांचा इव्हेंट चालला होता. पुरुष फॉर्मल काळ्या कोटावर पांढरे झगे चढवून आणि विशिष्ट प्रकारची गोंडा असलेली टोपी घालून रांगेत चर्च मध्ये जात होते. चर्चच्या घंटा जोरजोराने घंटानाद करत होत्या. त्यामागून मग स्त्रिया काळे झगे घालून, आणि काळ्या टोप्या घालून रांगेने चर्चमध्ये गेल्या आणि चर्च चं दार बंद झालं . आम्ही हि सगळी गम्मत बघत बाहेर गर्दीत उभा होतो. मग पुढे जाऊन त्या भागातली, आणि ड्रेसडेन शहर जिच्या काठावर वसलं आहे, ती एल्ब नदी पहिली. शहर खूपच सुंदर वाटलं. मग तिथेच एक टेरेस आहे, त्यावर जाऊन कारंजे वगैरे पहिले आणि मग के एफ सी मध्ये गेलो. दिवसभर फिरून खूपच भूक लागली होती. के एफ सी मध्ये काम करणारी सगळी मुले-मुली भारतीय होती. भरपूर खाऊन मग हाऊप्टबानहॉफ ला परतलो. फ्रायबर्ग ला परतणाऱ्या बस मध्ये वायफाय होतं . त्यामुळे सगळे फोटो शेअर करून घेतले. घरी जाऊन मग कालचं चिकन आणि भात भरपूर उरला होता. ते खाऊन मग झोपी गेलो.
# # # # #
१ ऑक्टोबर २०२३
आज सॅक्सन स्विस नॅशनल पार्क ला जायचं ठरलं होतं . पण बस अव्हेलेबल नव्हती. मग Nossen Markt च्या स्टॉप वरून वळसा घालून जाणारी बस मिळाली. वेळ लागला, पण एक महत्वाची गोष्ट त्या प्रवासात घडली. बस मध्ये एक मुलगा बराच वेळ आम्ही काय करतोय, काय बोलतोय ते पाहत होता. आम्ही ड्रेस्डेन ला उतरल्या उतरल्या गोपाळ ने त्याला जवळ जाऊन सांगितलं कि अमुक ठिकाणी जायचं आहे, कसं जायचं? आम्ही सांगितल्यावर तो म्हणाला माझ्या सोबत या. मला थोडी भीती वाटत होती, कि हा कुठे नक्की घेऊन जाईल. पण गोपाळ त्याच्यासोबत पुढे गेला. त्या मुलाने न विचार करता आमच्यासाठी तिकीट मशीन कशी ऑपरेट करायची ते दाखवलं, तिकीट काढायला मदत केली आणि शिवाय आमचा प्लॅटफॉर्म कुठे आहे ते सुद्धा दाखवलं, कारण प्लॅटफॉर्म वरच्या मजल्यावर होता. हे माझ्यासाठी सर्वस्वी नवीन होतं . कारण फ्रांस मध्ये मला इतक्या सौजन्याचा आणि मदत करण्याच्या वृत्तीचा अनुभव कधीच आला नाही. फ्रेंच लोक मुळातच खूप बुजरे असतात आणि त्यातून फॉरेनर्स साठी तर जास्तच अंतर राखून वागतात.
मग रेल्वे ची वाट पाहत गोपाळ आणि मी प्लॅटफॉर्म वर उभे राहिलो. प्रचंड गर्दी होती. कदाचित सगळेच रविवार ची सुट्टी असल्याने नॅशनल पार्क फिरायला चालले असावेत. शेवटी रेल्वे आली. डबल डेकर रेल्वे मध्ये बसण्याचा अनुभव खूप छान होता. लोक दाटी वाटी न करता अगदी आरामात जागा मिळेल तसे बसत होते. डब्यातील काही जागा हि सायकल ठेवण्यासाठी होती. सायकल घेऊन प्रवास करणारे सायकलिस्ट सुद्धा बरेच होते. गर्दीत भारतीय लोकांची संख्या पण लक्षणीय होती. शेवटी थोड्या कष्टांनंतर आम्हाला वरच्या बाजूला हवी तशी जागा मिळाली. आणि रेल्वे हळू हळू ड्रेस्डेन च्या शहरी भागातून बाहेर पडली. त्यानंतर काय एकेक दृश्य दिसत होती! डाव्या बाजूला संथपणे वाहणारी एल्ब नदी, उजव्या बाजूला टुमदार घरांची छोटी छोटी गावे. एकेक स्टेशन येईल तसे तसे लोक उतरत होते. मध्ये एक स्टेशन आले Kurort Rathen नावाचे. तिथे बऱ्यापैकी रेल्वे रिकामी झाली आणि आम्ही पुढे आमच्या Bad Schandau स्टेशन ला उतरलो. आधी माहिती घेतल्याप्रमाणे तिथे एक ट्रेकिंग ची माहिती देणारे सेंटर आहे आणि तिथे जाऊन माहिती विचारायची असं ठरलं होतं . त्यानुसार तिथे पोचलो तर कळलं कि ट्रेक तिथून बरेच लांब आहेत आणि तेवढ्यात एक तुर्की पोस्ट डॉक्टरल येऊन आम्हाला भेटला आणि माहिती विचारू लागला. आम्हालाच काही समजत नसल्याने आम्ही हवालदिल झालो होतो त्यामुळे मग आम्ही त्याला निरोप देऊन google map वर नीट ठिकाण शोधलं तर ते मुळात Kurort Rathen हेच स्टेशन होतं, जिथे मगाशी रेल्वे रिकामी झाली होती. पुन्हा पळत जाऊन परत जाणारी रेल्वे घेऊन आम्ही शेवटी Kurort Rathen ला उतरलो. तर तिथे ते टुरिस्ट सेंटर सुद्धा सापडलं , त्यांनी नकाशा सुद्धा दिला आणि आम्ही निश्चिन्त झालो. मग आरामात आधी फ्राईज खाल्ल्या. इथे जर्मनी मध्ये सगळीकडे कॅश मागायची पद्धत आहे. कार्ड ने किंवा ऑनलाईन व्यवहार शक्यतो करत नाहीत. नशिबाने कॅश होती जवळ म्हणून सगळं पार पडलं .
आता फेरीबोट ने नदी ओलांडून पलीकडे जायचं होतं . तीन युरो हे जाण्याचं आणि परत येण्याचं तिकीट होतं . बोटीच्या रांगेत थांबलो. त्या बोटीत जवळपास शंभर एक लोक दाटीवाटीने उभे करून त्यांनी नदी ओलांडून दिली. नदी ओलांडून rathen गावात शिरलो आणि तिथलं सृष्टी सौंदर्य पाहून थक्क झालो. अगदी प्रत्येक जागा हि फोटो घेण्यालायक होती. सावकाशपाने चालत वस्तीत शिरलो, सर्व घरे अगदी नीटनेटकी, स्वच्छ आणि टुमदार दिसत होती. बाजूनेच एक लहानसा ओढा वाहत होता. त्याच्या कडेकडेने आम्ही चालत होतो. सर्वत्र रविवारची हलकीशी गर्दी दिसत होती. लोक आपापल्या कुटुंबासोबत, मित्र मैत्रिणींसोबत आले होते. थोड्याच पुढे एक तलाव दिसला. खूप सुंदर दृश्य होत ते. बाजूने मोठमोठाले पर्वत, जंगल आणि मधोमध तलाव आणि त्याच्या बाजूने जाणारा निमुळता रास्ता. तलावात लोक शांतपणे बोटींग चा आनंद घेत होते. गोपाळ ची बोटींग ची इच्छा होती पण बोटींग ला वेळ घालवला असता तर मग पुढचं पाहायचा राहून जाईल म्हणून मग आम्ही तसेच पुढे गेलो. पुढे पायऱ्या सुरु होत होत्या. पायऱ्या सुद्धा खूप कलेने बनवल्या होत्या. लाकडी फळ्या उभ्या करून त्यांच्या मध्ये वाळू भरून पायऱ्या तयार केल्या गेल्या होत्या.
जवळपास चारेक हजार पायऱ्या असतील, पण त्या खूपच कडेकपारीतून जाणाऱ्या आणि मध्ये मध्ये गुहा, झाडे, दगड यांच्यामुळे बऱ्याच नागमोडी आकाराच्या होत्या. चढायला जवळपास दोन तास गेले असतील. पण एकदा चढून वर गेलो आणि हुश्श झालं . मग वरती पठारासारखा भाग होता त्यामुळे फिरताना जास्त कष्ट पडले नाहीत.
नंतर बॅस्टेई पूल पाहायला जायच्या रस्त्याला लागलो. बॅस्टेई पूल हा दोन डोंगरांच्या मध्ये अगदी उंचीवर तयार केला गेला आहे. फक्त चालत जाण्यासाठी तयार केल्या गेलेल्या या पुलावरून rathen गावाचे विहंगम दृश्य दिसते. जवळपास तासभर त्या देखाव्याच्या भुलीत पडून आम्ही तिथे थांबून राहिलो होतो. मग खाली उतरण्याच्या रस्त्याला लागलो. खाली उतरताना इतका त्रास जाणवला नाही. पण इथला रस्ता सुद्धा जरा सोपा वाटला . लहान लहान पायऱ्या आणि शक्यतो उतार होता. त्यामुळे कष्ट वाचले. उतरून आल्यावर परत फेरीबोट घेऊन Kurort rathen स्टेशन ला गेलो आणि ड्रेस्डेन ला परतलो. आणि नंतर दुसऱ्या दिवशी मग बेलफोर्ट ला परतीचा प्रवास.
# # # # #