Wednesday, 10 October 2012

श्रीरंजन चा वाढदिवस.


श्रीरंजन आवटे.

माझा ज्युनिअर कॉलेज ला असल्यापासून चा मित्र . त्याचा वाढदिवस म्हणजे माझ्यासाठी किंवा आम्हा सर्वांसाठी एक फार चांगली वेळ असते. कारण त्याचा वाढदिवस म्हणजे खरंच “वाढ”-“दिवस” ची खरीखुरी संकल्पना काय आहे हे समजावून देणारा असतो.

मुळातच श्री हा एक unconventional आणि कुठल्याही गोष्टीबद्दल स्वतःची अशी (आणि तीसुद्धा ठाम!!!) मते असणारा मला भेटलेला माझ्या वयाचा एकमेव मनुष्य आहे. Unconventional  यासाठी की बरोबरीचे सगळे engineering ला जात असताना त्याने modern college ला मिळालेलं admission सोडून फर्ग्युसन कॉलेज ला B.Sc. ला जाण्याचा निर्णय घेतला. आणि आज त्याच्याकडे पाहिलं की त्याने घेतलेला निर्णय किती योग्य होता हे कळतं.

वाढदिवस म्हटला की केक, पाहुणे आणि मित्रांना पार्टी, आणि बर्थडे बम्प्स ह्या एवढ्याच गोष्टी “फन” म्हणून होणाऱ्या वाढदिवसांपेक्षा हा खराखुरा वाढदिवस मला भलताच आवडतो.

होतं असं, की त्याच्या वाढदिवसाला सगळ्या वयोगटातली लोकं, म्हणजे त्याचे आई बाबा, मावशी, आम्ही मित्रमंडळी, त्याची लहान बहिण श्रुती, कधी कधी त्याचे चुलत / मावस भाऊ-बहिणी असे सगळेजण निवांत सतरंजी वगैरे टाकून गोल करून बसतात. काव्यवाचनाचा कार्यक्रम होतो. गेल्या वर्षभरात ज्या काही कविता केल्या, प्रत्येकजण आपापल्या कविता वाचून दाखवतो. श्री चे बाबा म्हणजे कवितेतला मानदंड! त्यांचा धम्मधारा हा कवितासंग्रह गेल्याच वर्षी रावसाहेब कसब्यांच्या आणि सतीश काळसेकरांच्या हस्ते एस एम जोशी मध्ये प्रकाशित झाला. त्यांच्या कविता त्यांच्याच तोंडून ऐकायच्या म्हणजे सोने पे सुहागा!

तसा कवितांच्या बाबतीत श्री पण काही कमी नाही. नुकतच त्याच्या कवितांसाठी एका दिवाळी अंकाचं पत्र त्याला आलंय.

मग या कविता-गप्पा-विनोद ( विनय च्या भाषेत बोलायचं, तर बौद्धिक टिंगलटवाळक्या) सुरु असताना मध्येच काकूंची लगबग सुरु होते आणि मग पाव-भाजी किंवा वडा-पाव, आईसक्रीम serve होतं. खाता खाता मग श्रुतीचं गाणं, (ती छान गाते),एक दोन उत्तम काव्यसंग्रह circulate होत असतात, ते चाळायचे, अन मग पुन्हा वेगवेगळ्या विषयांवर गप्पा सुरु. श्री चे almost सगळेच मित्र political science ला आहेत. त्यामुळं गांधीवाद, आम्बेडकरवाद काही चळवळीतल्या, बंडखोर कविता हेही ऐकायला मिळतं. आता यावेळी गणेशदा लवकर निघाले, (तब्येत बरी नव्हती) पण गेल्या वर्षी त्यांनी गालिब ची “हजारो ख्वाहिशे ऐसी” ही गझल खूप छान म्हंटली होती.

“हजारो ख्वाहिशे ऐसी
की हर ख्वाहिश पे दम निकले
बोहोत निकले मेरे अरमा लेकीन फिर भी कम निकले
निकलना खुल्द से आदम का सुनते आये थे लेकीन
बोहोत बे-आबरू होकर तेरे कूचे से हम निकले...”

मी तर त्या गझलचा अन तेव्हापासून मिर्झा गालिबचाही fan होऊन गेलो.

गेल्या वर्षी भैरुरतन दमाणी पुरस्काराचे मानकरी ठरलेले कवी नागराज मंजुळे ह्यांना मी श्री च्या बर्थडे(गेल्या वर्षीचा) मुळे भेटू शकलो. त्यांचा “उन्हाच्या कटाविरुद्ध”, हा काव्यसंग्रह वाचायला मिळाला, आणि तेव्हा त्यांनी स्वतः त्यातली “पाऊस” ही कविता विश्लेषणासकट सादर केली होती. अप्रतिम कविता. प्रेमात पडलेल्या मुलाची अन मुलीची ती गोष्ट आहे. मुलासाठी पाऊस हे रूपक त्यांनी फार छान वापरलंय.

त्यांचीच त्या कवितासंग्रहातली “बेईमान” अशीच एक short but sweet कविता आहे.

“...आता कसा तुला
मी या डोळ्यांत साठवू,
माझी नजर नेसून गेलं
एक बेईमान फुलपाखरू.”

या अशा कविता तर अजिंक्य चंदनशिवेच्या (माझा मावसभाऊ) बंडखोर कविता. “लाज वाटते रामा, तू माझ्या देशात जन्माला आलास...”ही रामावर केलेली,
“आणि मरतानाही “हे राम” म्हणून शंबुकाच्या मारेकर्याचा जयजयकार केलास, अन दलितांना “हरिजन” ही शिवी देऊन गेलास” ही गांधींवरची कविता....या आणि अशा अनेक... फारच बेधडक.... पण कवितेच्या निकषांवर फार उत्तम जमलेल्या कविता...

आणि खरंच, अजिंक्य साठी तर माझा respect! PVG सारखं कॉलेज, Electrical सारखी ब्रांच असूनही त्यानं फर्स्ट इयर झाल्यावर engineering सोडायचा धाडसी निर्णय घेतला. आणि Fergusson ला Political Science ला admission घेतलंही. स्वप्नांना सत्यात उतरवण्याची जिद्द असावी तर अशी.

# # # # #

यावेळी स्नेहलता ताईने एक नवीन संकल्पना मांडली. (स्नेहलता ही श्री ची मावसबहीण. Zeal कॉलेज मध्ये Maths ची Faculty म्हणून काम करते. नुकतीच ती लंडन येथे Leadership Quality वरचा एक २१ दिवसांचा course करून आली.) तर तिच्या संकल्पनेनुसार श्री ने तिथे जमलेल्या प्रत्येकाच्या २ चांगल्या Qualities सगळ्यांना सांगायच्या अन  शेवटी मग सगळ्यांनी श्री च्या दोन चांगल्या अन दोन वाईट qualities सांगायच्या असं ठरलं.

त्यानुसार मला माझ्याबद्दल दोन चांगले शब्द ऐकायला मिळाले.

श्री ने सांगितलं की मला कोणत्याही परिस्थितीचं फार लवकर आकलन होतं (म्हणे!), आणि माझ्यातली ऋजुता. आणि दुसरी quality म्हणजे सगळ्यांचं मत नीट ऐकून घेऊन मग कृती करण्याचा स्वभाव. ह्या दोन qualities चांगल्या आहेत. आजकाल स्वतः बद्दल हे एवढं कौतुक फुकटात कुठे ऐकायला मिळतं?

पण कल्पना छान होती. श्री ला एकच वाईट quality बद्दल feedback मिळाला. म्हणजे तू सर्वाना समजेल अश्या भाषेत लिहित जा. त्याचं लेखन हे फार बोजड असतं असं सगळ्यांचं म्हणणं. त्याने त्यावर योग्य तो follow up घेईन असं सांगितलं.

# # # # #

र असा हा वाढदिवस म्हणजे आपल्या जाणीवा आणखी एका वर्षाने समृद्ध करण्याचा दिवस, ही संकल्पना मला तर फारच पटली. रूटीन पद्धतीने फक्त केक, खाणे, आणि टाईमपास गप्पा यासाठी वर्षभरातले इतर ३६४ दिवस आहेतच की. पण वाढदिवसानिमित्त का होईना ,एकमेकांशी "संवाद" साधून एकमेकांच्या जगणं share करणं ही भावनाच किती छान आहे. आणि असा हा खऱ्याखुऱ्या अर्थाने साजरा होणारा श्रीचा "वाढ"दिवस म्हणजे ९ ऑक्टोबर माझ्यासाठी तरी एक पर्वणीच असते.

# # # # #

5 comments:

 1. पुष्कर आता यावर मी धन्यवाद म्हणणं म्हणजे औपचारिकतेची परिसीमा होईल. पण खुप छान वाटले. शब्दातीत !

  ReplyDelete
  Replies
  1. शब्दातीत तरीही शब्दबद्ध!!! वा वा!
   आणि धन्यवाद खरंतर तुझे.
   हे असे क्षण आम्हाला दिल्याबद्दल.

   Delete
 2. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 3. तुमची काव्यमय संध्याकाळ आवडून गेली.

  ReplyDelete
  Replies
  1. प्रतिक्रियेसाठी धन्यवाद नितीन. आणि ब्लॉगवर स्वागत.

   Delete

संधिप्रकाश

 # # # # # संध्यासमयीची स्तब्ध झाकोळ पसरत जाते तेव्हा अणकुचीदार होत जातात  अवैध भावनांचे कोपरे पूर्वेकडच्या अंधारात  बीभत्स संधिप्रकाश पश्चि...