Sunday, 24 June 2018

अदालजची बारव आणि राणी रुडाबाई

# # #

गुजरात.

अहमदाबाद शहरापासून गांधीनगरच्या दिशेने साधारण अठरा किलोमीटर गेलं, की एक अदालज नावाचं एक खेडं लागतं. एरवी अत्यंत साध्या व शांत वाटणाऱ्या खेड्यात एक खूप सुरस कहाणी दडलेली आहे. अगदी ऐतिहासिक. एक अत्यंत सुंदर बारव तेथे घडलेल्या रोमांचकारी घटनेची साक्ष देत पंधराव्या  शतकापासून वसलेली आहे. रेखीव बांधकाम असलेल्या या विहिरीची दंतकथा तितकीच गूढ आणि नाट्यमय आहे.

# # #

उत्तर गुजरात आणि राजस्थान हे पाण्याचे दुर्भिक्ष असलेले प्रदेश. जलस्रोतांचे महत्व जाणून तेथील राज्यकर्त्यांनी ठीकठिकाणी विहिरींची निर्मिती केली. या विहिरींची निर्मिती करताना स्थापत्य शास्त्राचा आविष्कार केला गेला. कारण पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या अशा प्रदेशांत विहीरीचे महत्त्व जणू एखाद्या देवालायाप्रमाणे नसते तरच नवल. म्हणून शक्यतो अशा विहिरींजवळ मंदिरेही आढळतात.

विहिरीला गुजरातीत वाव असे म्हणतात. "अदालज नी वाव" म्हणजे अदालज ची विहीर. तर या विहिरीच्या निर्मितीची कथा सुरु होते पंधराव्या शतकात. सुमारे इ. स. १४९८. पूर्वी हा प्रदेश दंडाई देश म्हणून ओळखला जायचा. येथील वाघेला कुळातील राज्यकर्ता राणा वीर सिंग याने ही विहीर बांधायला घेतली. पूर्वी हा प्रदेश केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असे. त्यामुळे जर एखाद्या वर्षी पाऊस कमी पडला, तर पाण्यावाचून लोकांचे हाल होत असत. यावर कायमचा उपाय म्हणून राजाने भल्यामोठ्या पाच मजली खोल व लांबरुंद विहिरीचे बांधकाम सुरु केले.

बांधकाम सुरु असताना बाजूच्या प्रदेशात राज्य करणाऱ्या मोहंमद बेगडा याने या प्रदेशावर हल्ला केला. केवळ सत्तेच्या संघर्षासाठी झालेल्या या युद्धात राणा वीर सिंग धारातीर्थी पडला. दंडाई देशाची सत्ता हाती येताच मोहम्मद बेगडा याने राणा वीर सिंग याची विधवा पत्नी राणी रुडाबाईच्या सौंदर्याविषयी ऐकले. राणी रुडाबाईचे दर्शन होताच तो तिच्या मोहात पडला. राणा वीर सिंगाच्या चितेवर सती जाण्यापासून त्याने तिला रोखले.

मोहम्मद बेगडा याने राणीला लग्नासाठी मागणी घातली. स्वाभिमानी राणीने त्याच्यासमोर एक अट ठेवली. जर अपूर्ण राहिलेल्या अदा लज च्या विहिरीचे काम बेगडा ने पूर्ण केले, तरच ती त्याच्याशी निकाह करेल. राणीच्या सौंदर्यावर भाळलेल्या बेगडा ने विहिरीचे बांधकाम करून एक अत्यंत सुंदर विहीर राणीला भेट दिली. पाच मजली पायऱ्यांची असलेल्या या विहिरीवर अत्यंत सुरेख शिल्पकला साकारली गेली होती. विहिरीच्या आवारात प्रवेश करण्यासाठी दोन प्रवेश द्वारे, प्रवेशद्वारावर कोरलेले पानाफुलांचे नक्षीदार आकार, प्रत्येक प्रवेशद्वारासमोर कोरीवकाम करून सुशोभित केलेल्या खिडक्या, हत्ती, फुले, ई. आकारांच्या दगडी पट्ट्या या सर्व बाबी विहिरीच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या होत्या. विहिरीच्या भिंतींवर जलकुंभ, कल्पवृक्ष यांच्या आकृत्या कोरलेल्या होत्या. हिंदू देवी-देवतांच्या मूर्त्याही यावर कोरण्यात आल्या होत्या.

ही विहीर राणीला भेट करून बेगडा ने तिला तिच्या वचनाची आठवण करून दिली. विहिरीची पूजा होताच आपण विवाह करू असे राणीने सांगितले. वाजत गाजत, संत महात्म्यांच्या सान्निध्यात या विहिरीची यथासांग पूजा करण्यात आली. राणा वीर सिंगाचे स्वप्न राणीमार्फत पूर्ण झाले.

परंतु विवाहाच्या आधीच स्वाभिमानी असलेल्या राणीने याच विहिरीत झोकून देऊन जीव दिला. तिच्या मनात जी इच्छा होती ती तिने पूर्ण केली, शिवाय तिला नको असलेल्या बेगडाच्या संबंधातूनही सुटका करून घेतली. तर अशी आहे राणी रुडाबाई आणि अदालज च्या विहिरीची कहाणी.

# # #

Thursday, 1 March 2018

एक स्मरणीय ओला राईड

# # #

    "हा, दो मिनिट रुकीये भैया, मै ATM से पैसे लेके आता हू." मी हे म्हटलं आणि माझा ओला कॅब मधील को - प्यासेंजर ही तितक्यात म्हणाला, "चलो अच्छा है, मुझे भी पैसे निकालनेही थे." वास्तविक हा को - प्यासेंजर म्हणजे एरो डिपार्टमेंट चा बहुधा जनरल सेक्रेटरी असावा. त्याला मी आधीही कुठेतरी पाहिल्याचं आठवत होतं.
"ठीक है सरजी" ओला चालक म्हणाला आणि गाडी बाजूला घेतली. 

    पैसे वगैरे काढून आम्ही गाडीत येऊन बसलो. ओला चा ड्रायवर बराच वेळ आम्हा दोघांकडेही आळीपाळीने पाहत होता. दिसायला साधारण विशीतला. पण वागण्या बोलण्यात अगदी अदब. अधून मधून काही अवघडलेले इंग्रजी शब्द. त्याचं त्याच्या लाईफ चं फ्रस्ट्रेशन तो सांगत होता. अमुक इतक्या राईड करायच्या कि मग इंसेटीव मिळतो. ओलावाले हरामखोर आहेत वगैरे. मधून मधून विषय त्याच्या कौटुंबिक ताण तणावाकडे. को - प्यासेंजर सुदैवाने दाक्षिणात्य असल्याने भाषिक अज्ञान त्याच्या पथ्यावर पडले होते. तो निवांत कानात इयरफोन घालून गाणी वगैरे ऐकत खिडकीतून बाहेर पाहत होता. 

    मी ड्रायवर च्या शेजारी बसल्याने आणि त्यादिवशी पवईहून गोरेगाव ला जायच्या रस्त्यावर भयानक ट्राफिक असल्याने तो अगदी हक्काने मला सगळं सांगत होता. माझी गोरेगाव ला मिटिंग होती आणि एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीचे National Manager यांना मी माझ्या संशोधनासंदर्भात भेटणार होतो. वाटेवर फोन सुरु होते. आणखीही बरेच लोक त्या मिटिंग मध्ये मला प्रत्यक्ष भेटणार होते जे आजवर फक्त इमेल किंवा फोन वरून बोललेले आहेत.

    माझी उडालेली एकंदरीत धांदल पाहता त्याने मग मी काय करतो वगैरे विचारले. मी काय करतो हे त्याला समजेल असं सोपं करून सांगितलं. आणि त्याला ते समजलं. मलाही त्याचा आनंद झाला. शेवटी  बोलता सहज तो म्हणाला, "मेरेको आपको Thank you बोलनेका है." "क्यू?" मी विचारलं. "आप इतना काम कर रहे है, टेन्शन पाल रहे है, देश का फ्युचर एकदम सही बनेगा ऐसा हि काम करे तो. मै आपको काम के लिये बेस्ट लक बोलता है." 

    एवढ्यात माझं ठिकाण आलं, ट्राफिक च्या घोळामुळे मला पटकन पैसे देऊन उतरावं लागलं. "Thank you भैया" हे इतकंच त्या संक्षिप्त वेळेत मी बोलू शकलो. पण मनातल्या मनात मी त्याला किती काही बोलून गेलो. "देश का फ्युचर हम सभी को मिलकर बनाना है. हि सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे. आणि त्याला मी हेही सांगायला हवं होतं, कि देशासाठी तू देखील तितकाच मूल्यवान आहेस जितका मी. एकमेकांच्या सहकार्याने हे सगळं आलबेल सुरु आहे. अर्थात हे सगळं वेळ टाळून गेल्यावर. 

    मी फोन च्या स्क्रीन वर पाहिलं, ड्रायव्हर साठी चं रेटिंग द्यायचं होतं. आपसूक मी पाच चांदण्या निवडल्या आणि स्क्रीन ऑफ करून खिशात टाकला.

# # # 

Sunday, 26 November 2017

पडद्यांमागे लपवलेलं ऊन

# # #

थंडीच्या दिवसांतली टळटळीत दुपार. अंगावर येणारी.

पडद्यांमागील लपवलेल्या खिडक्यांतून नकोसे वाटणारे कवडसे आत येतात. अंधाराला भोके पाडीत सगळ्या खोल्यांतून, जिन्यांतून, सगळा उजेड उजेड करून टाकणारे कवडसे. चिटपाखरू ही फिरकत नाही असल्या शांत वातावरणात ही उतरती दुपार सगळं असह्य करून टाकते. कमालीचं आखडलेल शरीर आणि त्यातून रविवार. खिडकीच्या सज्जाच्या आडोशाने बसलेली कबुतरं अव्याहतपणे घुमत राहतात. बाकी सगळं नेहेमीचं.

मी घरात शिरू पाहतो. बागेतल्या सगळ्या झाडांवर हे असं पांघरूण कोणी घातलं? हे असं झाडांखालून वाकून वाकून हळूहळू जायचं म्हणजे भयानक. अंगणातला समोरचा रस्ता दिसत नाही इतका दाट काळोख या पांघरुणाने केलेला. जपून जायला हवं. मी वर पहातो. मिट्ट काळोखातही झाडांच्या फांद्या आड लपलेले सुतारपक्षी माझ्याकडे डोळे वटारून एकटक पाहतात. न राहवून मी पुढे सरकतो.

सूर्य मावळताना दारातून एखाद दुसऱ्या कुत्र्याचं कर्कश्य भेसूर भुंकणं कानावर पडतं. भुंकण नेहेमीचं वाटत नाही. मी हातातली काही बिस्किटे त्याच्या दिशेने फेकतो.तर ते कुत्रं नुसतं हुंगून पुढे जातं. आज हे काय झालंय घराला काही कळत नाही. मी उदासवाणा होऊन झोक्यावर बसून राहतो. दिवसभर फुलून आता सुकत जाणाऱ्या मोगऱ्याचा वास यावेळी अपशकुनी वाटायला लागतो. कुठूनही कसलाही आवाज नाही. एखाद दुसरं वाहन सोडल्यास रस्ताही एकदम शांत.

गुंगीत माझे डोळे हलकेसे उघडतात. जाणीवा आणखी थोड्या सूक्ष्म होतात तसतसं ह्या अर्धवट झोपेच्या अवस्थेत शरीर हलकं वाटायला लागतं. हळूहळू डोक्यात विचारांच्या फांद्या फुटत जातात. मी खूप थांबवायचा प्रयत्न करतो. अजून जास्त गुंगीत जाण्याचा प्रयत्न करतो. काहीच फरक पडत नाही. हळूहळू भान येतच राहतं. मी कसल्यातरी विचारात होतो. मला कशाची काळजी वाटत होती? आता काहीच आठवत नाही. थकून शेवटी मी तो निरर्थक शोध सोडून देतो. रात्रभर ऐकलेल्या गाण्याच्या ओळी मात्र इनव्होलंटरिली डोक्यात रिपीट होत राहतात "जान उधेडूं, रूह दिसेना, दोष कटेना औषधीयां दे जा रे... बिन दर्शन कैसे तरीये... बैना बैना... तुम सुनो हमारी बैना..." अन मग त्यामागून गाण्याचं संगीत. अशक्य. त्यात वाजलेल्या एकूण एक बीटसह. नाही. प्लीज. त्रासून मी डोक्यावरचं पांघरूण अजून घट्ट करतो. तसं जागे होत जाण्याची जाणीव अजून प्रखर होत जाते.

पांघरूण झटकून मी उठून बसतो. रात्र आधीच झालीये. पडद्यांमागे लपवलेल्या खिडक्यांमधून रातकिड्यांचा आवाज येतो. सभोवताली सगळं अस्ताव्यस्त. टेबलवर सकाळी सांडलेली कॉफी, नाश्त्याचे उष्टे डबे, खुर्चीवर दोन दिवसांपासून पडलेले tracks... असह्य वास नाकात शिरतो. सगळं तसंच मागं टाकून मी बेसिनचा नळ सोडून चेहऱ्यावर पाणी मारत राहतो. निरुपयोगी. अंगावर आलेला मक्ख जडपणा काही जाता जात नाही. त्या पाण्याच्या धारेत मात्र दुपार हळूहळू विरघळून वाहून जाते...

# # #

Friday, 11 August 2017

बाई रिटायर होतात तेव्हा...

# # #

     शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का? असं वाटायचे दिवस हळूहळू मागे पडत गेले आणि भोलानाथाला विचारायचे प्रश्नही बदलले. भोलानाथ, ऑफिस मध्ये  मिळेल का रे अप्रेजल? बॉसच्या पोटात कळ येऊन दुखेल का रे ढोपर? इत्यादी.

     पण काही का असेना, आयुष्य कितीही बदललं, तरी शाळा नावाचा एक कोपरा मात्र मनात सतत कुठेतरी जिवंत राहिला. सगळेच वर्गमित्र आज भेटत नसले, तरी सगळ्या गमतीजमती आणि ती शाळेची फेज कुठेतरी मनात घर करून राहिलीच.

     आणि अचानक बातमी आली की आमच्या प्राथमिक च्या बाई रिटायर होतायेत. शेड्युल मुले कार्यक्रमाला जाता आलं नाही, तरी मी त्यांना पत्रं लिहून पाठवलं. पत्र वाचून त्यांना फार आनंद झाला.

     हे पत्र त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात सर्वांसमोर वाचलं गेलं.

# # #

पुष्कर प्रकाश कांबळे
अनुश्रेय, ६९, वामन नगर,
जुळे सोलापूर, सोलापूर – ४१३००४
मो. क्र. ८४ ६६ ०६४ ५९५

प्रिय बाई,
सर्वात आधी मी बाईंची दिलगिरी व्यक्त करतो की मला सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला हजर राहता आलेलं नाही. अंजुमने साधारण दहा दिवस आधी मला मेसेज केला, अरे आपल्या सुर्वे बाई रिटायर होतायेत की रे. मी म्हटलं, हो का? त्यांना माझ्याकडून आयुष्याच्या नवीन पर्वासाठी शुभेच्छा सांग. ती म्हणाली, शुभेच्छा कसल्या सांग? तुला यायचंय. येशील का? यायचं अगदी मनात होतं पण नेमकी माझी १४ ला एक रीविव मिटिंग आली आणि ऑफिसच्या धावपळीत मी काही येऊ शकलो नाही, पण तुमची आठवण मात्र दिवसभर सतत येत राहिली.

      जून चे दिवस आठवले. नवीन पुस्तके, वह्या, त्यात गृहपाठाच्या वेगळ्या, वर्गपाठाच्या वेगळ्या, त्यांना घातलेली तपकिरी कव्हरं, वर लावलेले स्टीकर, त्यावर चांगलं अक्षर काढायचं असं ठरवून धाकधुकीत लिहिलेलं स्वतःच नाव, भरलेलं पहिलं दप्तर, ते पाठीला लावून संध्याकाळी केलेली रंगीत तालीम, आणि केवढं जड आहे बाई! झेपेल का रे? अशी मम्मीची प्रेमळ काळजी, सकाळी उठून अंघोळ करून पाडलेला भांग, गणवेश आणि स्कूल बस/रिक्षा मधून वारूळवाडीला पोहोचून धावत पळत गाठलेली शाळेची प्रार्थनेची वेळ, घंटा, मधली सुट्टी... सगळं काही डोळ्यासमोरून तरळून गेलं.

      त्या सगळ्यात सर्वात जास्त आठवण आली ती तुमची. एक प्रेमळ शिक्षिका म्हणून तुम्ही आम्हा मुलांमध्ये फेमस होतात. बाकीच्या शिक्षिका खूप रागावतात असा समज होता. तुम्ही पाठ करून घेतलेले पाढे, गणितं, अधून मधून खाल्लेला मार, सगळं आठवलं. एकदा तुम्ही गृहपाठ दिला होतात. त्यात सुईतल्या “सु” ला ह्रस्व उकार की दीर्घ यावरून माझं आणि मम्मीच घरी कडाक्याचं भांडण झालं होतं. मी फळ्यावरून उतरवून घेताना चुकून दुसरा उकार घेतला होता आणि मम्मी मला पहिला उकार द्यायला लावत होती. नाही ग मम्मी, आमच्या बाईंनी दुसराच शिकवला आहे. तुझ्या काळात वेगळा देत असतील. हे माझं स्पष्ट मत होतं आणि मी त्यासाठी रडून भरपूर त्रागाही केला, आणि वैतागून त्या माउलीने बर बाबा, दे दुसरा उकार म्हटलं होतं. आणि अर्थात दुसऱ्या दिवशी वर्गात येऊन माझ्या वहीवर लाल फुली उमटली होती. तेव्हा मला कळलेलं, अच्छा, म्हणजे मम्मीलाही शाळेत शिकवलेलं येतं. तिचीही याकामात मदत घ्यायला हरकत नाही. सांगायचा मुद्दा हाच की तुमच्यावर आम्हा विद्यार्थ्यांचा पालकांपेक्षाही प्रगाढ विश्वास होता. आणि एक भीतीयुक्त आदरही.

      भीतीचं थोडक्यात सांगायचं म्हणजे एक प्रसंग आठवतो. अजूनही मला ते आठवून कधी कधी मी किती वाईट आहे अशी भावना येते. वर्गात आठवड्यातून एका दिवशी, बहुतेक शनिवारी, अवांतर वाचनाचा तास असे. त्यावेळी गोष्टींची छोटी छोटी पुस्तके मिळत. ती वाचून सोमवारी परत करायची असत. तेव्हा “धाडसी राजपुत्र आणि समुद्रकन्या” हे एक पुस्तक मला मिळालं. मी घरी नेऊन मोठ्या आनंदाने ते वाचून काढलं, त्यात समरकंद देशाच्या एका राजपुत्राला एका समुद्रकन्येशी लग्न करायचं असतं, पण त्याला भूल देऊन दुष्ट लावी राणी पोपट बनवून टाकते आणि पिंजऱ्यात डांबते, शेवटी त्याच नगरातला एक जादुगार राजपुत्राची मदत करतो आणि त्याला समुद्रकन्येशी भेटवतो, आणि त्यांचं लग्न होतं अशी ती मोठी सुरस गोष्ट होती. पण झालं असं, की ते पुस्तक रविवारच्या आवरा-आवरीत कुठे गेलं मलाही कळलं नाही. थेट सोमवारी शाळेला निघायचं तेव्हा आठवलं. पोटात धस्स झालं. बापरे! पुस्तक काही केल्या सापडेना. माझा धीर सुटत चालला. मम्मी म्हणाली जा मी शोधून ठेवते. मी घाबरत घाबरत शाळेत पोहोचलो. त्यादिवशी काही बाईनी विचारलं नाही, आणि पुस्तकही घरी सापडलं नाही. बहुतेक पुढच्या शनिवारी बाईनी विचारलं, तेव्हा मी सांगितलं पुस्तक नाहीये. बाईनी काही फार रागावल नाही. शेवटी बऱ्याच वर्षांनी ते पुस्तक घर शिफ्टिंग करताना आजीला आणि मला एका सुटकेस मध्ये सापडलं. ते पाहून माझ्या चेहऱ्यावर हसू का उमटलं ते आजीला काही कळलं नाही.

      मित्र – मैत्रिणींसोबत मधल्या सुटीत डबा खाणे हाही एक विरंगुळ्याचा विषय. अमित, मयूर, अविनाश, मुज्जमील, अंजुम, काजल, वृषाली, शुभांगी अजूनही नावं आठवली तरी ते छोटे छोटे चिमुरडे चेहरेच समोर येतात. रोज मधल्या सुट्टीत शिवणापाणीच्या खेळाचं तर आम्ही पेटंटच घेतलं होतं. याशिवायही लपाछापी इ अनेक खेळ मधल्या सुट्टीत आम्ही खेळत असू.

      कारगिल चं युद्ध तेव्हा सुरु होतं. त्यावेळी निधी गोळा करायला शाळेने प्रभातफेरी काढली होती. अन नेमका प्रभात फेरीच्या दिवशी पाउस आला होता. निधी गोळा करत इकडे तिकडे पळताना मजा आली होती.

      शाळेव्यतिरिक्तही तुमचं सर्वांशी मिळून मिसळून वागणं. तुम्ही एकदा एका रविवारी माझ्या घरी आला होतात. दातांची डॉक्टर असलेल्या माझ्या सुगरण आईला आंब्याचं लोणचं कसं करायचं ते येत नसे. आणि मला आंब्याचं लोणचं प्रचंड आवडायचं. ते शिकण्यासाठी खास तिने तुम्हाला आमंत्रण दिलं होतं. फोडलेले आंब्याचे तुकडे खात मी बसलो होतो. तुम्हाला पाहून मी आतल्या घरात धूम ठोकली. नंतर बऱ्याच वेळाने लोणचं झालं हे मला त्या खमंग वासावरून कळलं. मी बाहेर आलो. तुम्ही मम्मीला सांगत होतात, हम्म. झालं. आता हा तळलेला मसाला थंड झाला, की मग कैरीच्या फोडींवर घालायचा. आणि थोडं तेल गरम करून, थंड करून मग वरून ओतायचं आणि कापडाने बरणीचं तोंड बांधून घ्यायचं. मम्मी तुम्हाला सोडवायला गेली तोपर्यंत मी चाखुन पाहिलं. त्या लोणच्याचा वास आणि चव कुणी आजही दिली तर मी ओळखून दाखवेन की बाईंनी बनवलंय.

      तुमची आणखी एक खूप जवळची आठवण म्हणजे जेव्हा मम्मी मंचरला ऍडमिट होती, तेव्हा सहामाहीचे पेपरही झाले नव्हते, मी परीक्षेलाही बसू शकत नव्हतो कारण त्या सगळ्या अस्थिर काळात माझा अभ्यासही झालेला नव्हता. मी फक्त घाबरलेली आणि धावपळ करणारी माणसे माझ्या अवती भोवती पाहत होतो. भोवताली जे काही सुरु आहे, ते फक्त पाहत राहणं माझ्या हातात होतं. फारसं काही कळत नव्हतंच पण जे काही चालू आहे ते तितकसं चांगलं नाही हे कळत होतं. आजी आणि मी हॉस्पिटल मध्ये बसलो होतो. माझा नुकताच जन्मलेला भाऊ एका छोट्याश्या काचेच्या पेटीत झोपला होता. त्याच्या श्वासागणिक वरखाली होणाऱ्या इवल्याश्या छातीकडे मी पाहत होतो. त्याच्या नवजात अंगावरचे पांढरे पापुद्रेही अजून तसेच होते. वरती बल्ब जळत होता. कुणीतरी माझ्या हातात सहामाहीच्या सराव प्रश्नपत्रिका आणून ठेवल्या. घे पुष्कर. तुला वेळ मिळणार नाही. अधून-मधून वाचत जा, आणि याची तयारी कर. तुझा अभ्यास बुडू नये म्हणून सुर्वे बाईनी नारायणगावहून पाठवलेत. मी त्या तंग वातावरणात कसेतरी एक दोन प्रश्न वाचले आणि घडी घालून आजीला दिले. त्यात जंगलात एकटाच राहणाऱ्या, झाडांवरून उड्या  मारणाऱ्या एका स्वच्छंदी आणि आनंदी मुलाच्या धड्यावरचे प्रश्न होते. चणिया त्याचं नाव. मलाही त्यावेळी चणियासारखं कुठेतरी लांब जंगलात निघून जावं आणि स्वच्छंदी राहावं असं वाटलं होतं. त्यानंतर ते पेपर वाचण्याची वेळ नंतर कधी आलीच नाही. जे काही होईल ते होवो पण माझा अभ्यास बुडू न देण्याची तुमची तळमळ माझ्यापर्यंत पोहोचली. एक शिक्षिका म्हणून जे काही करता येत होतं ते तुम्ही केलंत. आपल्या कामाशी कशी निष्ठा ठेवावी धडा तुम्ही मला आपल्या वर्तनातून घालून दिलात. तेव्हा अर्थातच हे सगळं कळालही नाही पण जसं जसं आठवत गेलं, तसतसं, मला माझ्यासोबत घडलेल्या घटनांचे अर्थ कळत गेले.

      आणि आज म्हणूनच तुमची सेवानिवृत्ती ही माझ्यासारख्या तुमच्या हातून घडलेल्या हजारो विद्यार्थ्यांसाठी विशेष आहे. शिक्षक मुलांना घडवतो, त्यांच्या अंतरंगात प्रवेश करतो, नीतीमूल्यांचे धडे देतो, माणसांपासून चांगला माणूस कसं बनायचं हेही शिकवतो. हे सगळ्यांना माहीत आहेच. त्यात नवं असं काहीच नाही. पण माझ्यासारख्या कित्येक विद्यार्थ्यांच्या हृदयात तुमच्याशी निगडीत अश्या व्यक्त – अव्यक्त अनेक आठवणी आहेत. मी फक्त आज त्या व्यक्त केल्या. अश्या आठवणींचा आणि संस्कारांचा अमूल्य ठेवा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हृदयातून कायम जपलेला असतो. म्हणूनच हे पत्र लिहिताना कुणीतरी विचारलं, कुणाला लिहितोयस रे? मी म्हटलं, अरे आमच्या प्राथमिकच्या बाई. हे म्हणताना जे काही वाटलं, तो आपुलकीचा अनुभव नेमका शब्दात पकडण कठीण. सेवेमधून शिक्षक निवृत्त होतात पण अजूनतरी कुणालाही ह्या स्मृतींच्या आणि आपुलकीच्या बंधातून निवृत्त होता आलेलं नाही आणि होता येणारही नाही. एक कर्मनिष्ठ आणि प्रेमळ शिक्षिका म्हणून तुमचं माझ्या हृदयात नेहमी उंच स्थान राहील.

तुमच्या आयुष्यात येणाऱ्या ह्या नवीन पर्वास माझ्याकडून अनेक शुभेच्छा. तुमचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू द्यात.

आपला विद्यार्थी
पुष्कर प्रकाश कांबळे


# # #

Thursday, 6 July 2017

जुईच्या फुलांचा धबधबा

# # #
तुम्हाला जर कुणी सांगितलं, की जुईच्या फुलांचा धबधबा ह्या जगात अस्तित्वात आहे, तर?


हैदराबाद पासून साधारण एकशेऐंशी किलोमीटर च्या अंतरावर हा धबधबा आहे. मल्लेला तीर्थम असं त्या ठिकाणचं नाव. मल्लेला तीर्थम ह्या तेलुगु शब्दाचा चा अर्थ जुईच्या फुलांचा वर्षाव असा होतो. जुईच्या फुलांचा वर्षाव एवढ्याचसाठी, की या धबधब्यातून पडणारं पाणी हे संथ तुषारांच्या स्वरुपात पडतं, जणू काही फुलांचा पाऊसच. धबधब्याची नैसर्गिक रचनाच अशी आहे कि वरतून पडणारा प्रवाह हा विखुरला जाऊन अगदी झारीतून पडणाऱ्या पाण्यासारखा पडतो. खाली दगडांचीही पायऱ्यांसारखी रचना हि नैसर्गिकरित्या झालेली आहे. त्यामुळे त्या दगडी पायऱ्यांवर थाटात बसून अगदी आरामात आपण धबधब्याची मजा लुटू शकतो.# # #


Picture Courtesy - Sulekha.com

     हैदराबादपासून विमानतळाकडे जाणारा रस्ता धरला, तर आपण सरळ श्रीशैलम हायवेला लागतो. श्रीशैलम हायवेच मुळात प्रवासासाठी एक सुंदर ठिकाण आहे. दुतर्फा झाडी, मधून मधून दिसणारी भाताची खाचरं, दूरवर दिसणाऱ्या नल्लमाला पर्वतराजी, चरायला आलेले शेळ्या-मेंढ्याचे कळप, सगळंच अगदी निसर्गरम्य म्हणतात त्याप्रमाणे. तर या श्रीशैलम हायवेवर साधारण दीडएकशे किलोमीटर सरळ गेल्यावर मल्लापूर नावाचं एक खेडं आहे. खेडं तरी कसलं, एक दीडदोनशे उंबऱ्याची वस्ती. तिथून ह्या धबधब्याला जायला डावीकडे एक फाटा आहे. सगळा कच्चा रस्ता. पावसाळ्यात जायचं म्हटलं तर खाचखळगे भारी. तसंही इथे पोहोचायला जास्त बसेस वगैरे नाहीतच. सगळा खाजगी गाड्यांचा प्रदेश. म्हणून काही खायचं वगैरे असेल तर सगळा जामानिमा अर्थात मल्लापूर मध्ये बांधायचा. ह्या फाट्यापासून आठेक किलो मीटर अंतर सावकाशपणे शेता-शेतातून कापल्या नंतर मल्लेला तीर्थं ची पाटी दिसते. इथे गाड्यांसाठी मोठा पार्किंग एरिया बनवला आहे. तिथे गाडी पार्क करून आपण धबधब्याकडे जाऊ शकतो. धबधब्याकडे जायचं म्हणजे पाचेकशे पायऱ्या उतरून खाली छोट्या दरीत जावं लागतं. बाप रे! पाचशे पायऱ्या? असा विचार आला तरी पण हा सगळ परिसर म्हणजे पूर्वीच्या दंडकारण्याचा. त्यामुळे दाट जंगल पाहत पाहत आपण ह्या पायऱ्या कधी उतरून जातो तेही कळत नाही. सभोवतालच्या भरगच्च दंडकारण्यात अगदी संथपणे रिमझिमणारा हा धबधबा. कड्याकपारी मधून माकडे उड्या मारत असतात. आणि ह्या पाचशे पायऱ्याही अगदी नागमोडी वळणाच्या आणि सुंदर पद्धतीने बांधल्या आहेत. पायऱ्यावरून समोर जंगलाचं दिसणारं दृश्य अगदी विहंगम दिसतं.
दरीत उतरलो कि समोर झुळूझुळू वाहणारा ओढा दिसतो. सततच्या प्रवाहामुळे यातले दगड अगदी गुळगुळीत झालेले आहेत. इथून हळूहळू आणखी थोडं जंगलात गेलं कि समोर धबधबा दिसतो. रिमझिम पडणारा धबधबा आणि त्याखाली असणारा पाण्याचा डोह. सगळंच अगदी चित्रातल्या प्रमाणे. धबधब्याखाली थांबलं कि समोर डोहाच्या कडेने हारीनं उभारलेली झाडे दिसतात. अगदी प्राचीन काळापासून तिथे असल्यासारखी. उंचीपुरी आणि भरभक्कम. असं वाटत दंडकारण्यात सगळ्या ऋषी मुनींनी ह्या असल्याच झाडांखाली बसून तपश्चर्या केल्या असाव्यात. खूप शांत वातावरण आणि धबधब्याचे पार्श्व संगीत. सगळंच कसं मंत्रमुग्ध करून सोडणारं. धबधब्याखाली बसून तुषार अंगावर झेलणं म्हणजे अक्षरशः स्वर्ग. थेंबांची दाटी कमी जास्त होत राहते. कधी प्रवाह मध्ये वाढतो, कधी कमी होतो. त्यातही एक लय आहे. हे ज्याने त्याने आपापलं अनुभवायला हवं. असं वाटतं कि त्या जालाप्रपातापासून कधी अलग होऊच नये. वाटत ह्या प्राचीन दंडकारण्यात आपलाही कालत्रयातीत असणारा  स्व त्या धबधब्यात गोठवून घ्यावा. कधी त्या अद्भुत धारेपासून वेगळं होऊच नये. आपणही एक धार बनून बरसत राहावं असं वाटतं.
दगडावरून जाता-येता बरीच काळजी घ्यावी लागते. जागोजागी वाढलेल्या शेवाळामुळे दगड अगदीच निसरडे होतात. त्यातून पायबिय घसरला तर थेट दगडांवर पडण्याची भीती. मुळातच सुंदर असणाऱ्या या ठिकाणी दाट वाढलेल्या झाडीमुळे अजून सुंदरता आली आहे. सगळं कसं एकदम वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, म्हटल्यासारखं...

शेवटी काय माणूस आणि निसर्ग यांचं नातं शब्दात मांडण्यासारखं नाहीच. नव्हे तो सांगण्या-ऐकण्याचा विषयच मुळात नाही. तो आहे एक शब्दातीत अनुभव. ज्याने त्याने घ्यावा आणि मनाच्या कुठल्याश्या कप्प्यात साठवून ठेवावा. पुढे मागे अनुभवांची उजळणी करताना ह्या सगळ्या आठवणी काळजात घर करून जातात.


तर मुद्दाम पावसाळ्यातल्या एखाद्या दिवशी जावं असं हे ठिकाण. 

# # #

Thursday, 29 September 2016

माझ्या अपरोक्ष मी

# # #

ते म्हणतात
तू असा तू तसा 

कुणी म्हणतं 
तू असा तू तसा

या माझ्याबद्दलच्या वाटण्याबद्दलची
दखलपात्रता माझ्या लेखी शून्य आहे
सध्या

आधी मीही भांडायचो स्वतःशी
आपण चांगले तर जग चांगले 
या भामक समजुतीमुळे
पण शेवटी स्वतःला दाखवलेल्या स्वप्नांचे रंग
सत्यात रंगवायला जायची वाट 
माणसांमधून जाते
हे कळायला थोडासा उशीरच झाला

माणसं म्हटली की
माणूसपण आलंच की अर्थात
हजारो हेवे दावे
हजारो ईर्ष्या
हजारो आकस
हजारो न्यूनगंड 
सगळ्यांनाच थोडी हाताळता येतात?

पण शेवटी माणसांना माफ केलं 
माणसंच ती 
परिस्थितीनुरूप वागायचीच 

पण आज 
माझी हजारो प्रतिबिंब 
हजारो आरशात 
जसं एकाच चंद्राचं बिंब
नदीत, तळ्यात, विहिरीत, डबक्यात, गटारीत 
कितीक संदर्भ समष्टी समवेत
माझ्या एका असण्याचे

काही जितके चांगले असायचे
काही तितकेच वाईट
थोडाफार इकडचा तिकडचा फरक
शेवटी काय चालायचंच


म्हणूनच माझ्याबद्दलच्या वाटण्याबद्दलची
दखलपात्रता माझ्या लेखी शून्य आहे
सध्या

(पुष्कर कांबळे)

# # #


Thursday, 11 August 2016

कललेल्या उन्हाच्या आठवणी...

# # #

www.roserambles.org


    कुंद झालेल्या पावसाळी वातावरणानंतर पडलेल्या स्वच्छ उन्हाचा रंग कोणता? गेले दोन चार पावसाळे मला ह्या कललेल्या उन्हाचा मोह पडला आहे. मे - जून चं कडक ऊन वेगळं, पण हे ऑगस्ट सप्टेंबर च थोडंस हळुवारलेलं, झुकलेलं ऊन मला भलतंच आवडतं. असं वाटतं की, उन्हाचंही वय होऊन त्यात उतारवयाचा एक मऊसूतपणा आला आहे. दिवसच्या दिवस मग असे कोवळ्या उन्हाशी सलगी करत लागिरे होत जातात. आणि मग हळूहळू जाणवतं, कि रात्र आता सातच्या सुमारास होऊ लागली आहे. पूर्वी सहाच्या दरम्यान पडणाऱ्या कडक उन्हाची झळ मग कमी होत जाते. 

     अशा एखाद्या स्तब्ध, सावळ्या संध्याकाळी मी शांत निर्जन रस्त्याकडे पाहत गॅलरीत थांबतो. समोर रेशमी लालसर आकाशातून डोकावणारं पुरातन झळाळतं ऊन, आणि हातात वाफाळता कॉफीचा कप. दिवसभराचा  शीण त्या कॉफी च्या प्रत्येक घोटासोबत आणि खमंग सुगंधासमवेत कमी होत जात आहे. दूरवरून पढल्या जाणाऱ्या दुआ चे त्रोटक आवाज कानावर येतात... "ऐ अल्लाह, हमारी तौबा कुबूल फर्मा, और हमारे गुनाहों को माफ फर्मा दे... ऐ अल्लाह, जो गुनाह जानकर किये है उन्हे भी माफ फर्मा, अंजान मे हुए है उन्हे भी माफ फर्मा...हमें हर काम में उनके बतायें हुए तरिके पे चलने कि तौफिक अता फर्मा...  ऐ अल्लाह मौत तक मेरे ईमान की हिफाजत फर्मा... ऐ अल्लाह हमारी बीमारियो को शिफा दे, मेरे हाल पे रेहम कर, मुझे अमानो - अमान में  रख. मेरी रिझाकत मे बरकत दे... ऐ अल्लाह इस दुआ को जिन्होने शय किया उन्हे, उनके आल -औलाद और वालीदीन को जन्नत मे बुलंद दर्जा अता फर्मा..." ऐकत ऐकत मीही शांत होत जातो... "मौत तक मेरे ईमान की हिफाजत फर्मा..." मनुष्याच्या पतनशील स्वभावाचे किती सूक्ष्म निरीक्षण करून हे लिहिलं गेलं असेल याचा मी विचार करत राहतो. "बीमारियो को शीफा..." ज्या गोष्टी आपल्या आवाक्यात नाहीत त्या सगळ्या गोष्टींची देवाकडे याचना केली जाते. मी नेहमी ह्या दुआ ऐकून विचारात पडतो... शेवटी जगण्यासाठी लागणाऱ्या या सगळ्या साध्या गोष्टी पण आपला त्यावर काहीही कंट्रोल नाही. गरीब असो व श्रीमंत... दुआ सगळ्यांसाठी सारखीच लागू पडते... दुआ चं हे सार्वजनिक, सार्वकालिक असणंही किती काही शिकवून जातं .... 

     वातावरण मग शांत होत जातं. पक्षी किलबिल करत बाजूच्या झाडांवरती गोळा होतात. आणि उजेड कमी होत जाऊन मग झाडांच्याही नुसत्याच मग आउटलाईन्स दिसत राहतात. मी ट्रॅक्स आणि रनिंग शूज घालून सायकल वर टांग टाकून निघतो. रस्त्यात ही भली मोठी माणसांची गर्दी... वाट काढत मग तळ्याकाठी पोहोचतो. सायकल उभी करून सभोवतालच्या सुसह्य अंधाराची व्याप्ती मनात सामावत पळायला सुरुवात करतो. एक - एक - दोन - दोन. पाय, श्वास आणि उच्छवास यांची एक लय आपोआप तयार झाली की मन ऑटो-पायलट मोड मध्ये जातं. त्यात एन्डॉर्फिन्स मुळे एक हाय मिळाली की, त्या धुंदीत दोनाचे चार राउंड झाले तरी कळत नाही. मन-शरीर एक ऊर्जा होऊन जातं.

    परतीच्या वाटेवर मग लकी हॉटेलात चहासाठी थांबणं. रात्री आठ वाजताही चहा प्यायला भरभरून पब्लिक हजर. त्यांची संभाषणे कानावर येत राहतात. "क्या करें ? मारे पोट्टेकु ? ऐसा नई करना ना जी, हाथां-पावांपर मारना, पीठ पे मारना, सिर पे नई मारना जी ..." कुणी विशीतला त्रस्त बाप दुसऱ्या बापाला आपल्या कार्ट्यांबाबतचे फ्रस्ट्रेशन्स सांगत असतो. कुणी आपले कामावर बॉस सोबत झालेले "लफडे" दुसऱ्याला सांगत असतो... "नेनु चेप्प्यानु... रे पोट्टोडा, ओका झापड इस्ते पापड अयिपोताव रा... हावलेगाडू..." (मराठी भाषांतर - मी म्हणालो, अरे बुटक्या, एक झापड मारली तर पापड होशील की रे... येडछाप कुठला..." ) कुणी कॉलेज स्टुडंट दुसऱ्याला सांगत असतो, "डूड, आय हेट दिस वेदर. आय डोन्ट लाईक इट व्हेन इट्स कॉन्स्टंटली रेनींग..." दुसरा "डूड" ही तेव्हढ्यापुरता वर पाहतो, "या.. मी नीदर.." एवढच करून परत मोबाईल मध्ये गुंतून जातो. कुणी पांढऱ्यास्वच्छ झब्बा-कुर्त्यातला, दाढीवाला, शांत-समाधानी बाप सांगत असतो, "परसोच गल्फ मे दामाद के यहा जाके आया.. अलहमदुलिल्लाह सब खैरीयत बरकत है..." आपल्यालाही ऐकून मग बरं वाटतं... सरतेशेवटी चहा आणि दोन उस्मानिया संपले की ठरल्याप्रमाणे वेटर पैसे घ्यायला येतो. उस्मानिया हे इथे मिळणाऱ्या नान कटाईचं नाव आहे. 

     
श्रावणातल्या अश्या मंतरलेल्या दिवसांची ओढ सांगायची म्हटली तर बरंच काही सांगता येईल. आल्हाददायक दिवस आणि गंधाली बनून येणाऱ्या रात्री यांची लागीर भलतीच दाट होत जाते. असं वाटतं की या सगळ्या आठवणी गोळा कराव्यात आणि त्यांना नाव देऊन एका कुपीत बंद करून जपून ठेवाव्यात. न जाणो, या अस्तित्वावर पसरलेल्या आयुष्य नावाच्या संकल्पनेला समृद्ध करायला कधीकाळी त्या कमी येतील... 

Thursday, 4 August 2016

...कायो तथा याति विनास भावम |

# # #

     रात्रीचा एक वाजला होता. खिडकीच्या बाहेर भयाण शांतता.

     माझी बोटं की बोर्ड वर टक - टक करत होती. मी त्या गूढ शांततेत वाचायला काही इंटरेस्टिंग मिळतंय का ते आंतरजालावर (Internet) वर शोधत होतो. मला झेन को-आन्स (Koan) वाचायला आवडतात. को - आन्स म्हणजे जपानी बुद्धिझम मधील छोटीशी गोष्टवजा कोडी किंवा कोडीवजा गोष्ट, जी वरवर अर्थहीन वाटतात पण त्यावर चिंतन केल्यास, त्या कोड्याशी एकरूप झाल्यास, त्यातलं मर्म, central principle झेन चा अभ्यासक अनुभूत करू शकतो. ते इतरांना समजावून सांगता येईलच याची No Guarantee. तसं ही "झेन" हा तत्वज्ञानाचा, तात्त्विक चर्चा करून निष्कर्ष काढण्याचा विषय नाहीच. मुळातच तो intellect पासून चार हात लांब असणारा विषय आहे, केवळ आणि केवळ अनुभूती यावर आधारित अशी ही जीवन पद्धती आहे.

     मुळातच झेन मनुष्याला तात्त्विक चिंतनातून बाहेर पडून अनुभूतीच्या जगात घेऊन जाते. आणि ते तसंच असायला हवं. आजकाल नुसती धर्मावर चर्चा सुरु आहे. धर्माचा सराव कोणी करत नाही. झेन हा आजच्या काळातला सर्वात लागू पडणारा धर्म आहे.

     तर हे को - आन्स वर्षानुवर्षे झेन मास्टर्स कडून त्यांच्या शिष्यांना एखादं principle खरंच समजलं आहे का, याची खातरजमा करण्यासाठी सांगितले जायचे. जेव्ह्या त्या को - आन मधील आणि तुमच्यातील द्वित्व संपेल, तेव्हा उत्तर तुमच्या हातात असेल. म्हणजे मलाही त्यातलं फारसं कळतं, अशातला भाग नाहीच. पण एक कुतूहलापोटी म्हणा, किंवा घरच्या  वातावरणामुळे म्हणा, मला या विषयात रस आहे.

     उदाहरणादाखल एखादं कोआन सांगायचं झालं तर मला हे नक्कीच आवडेल -

     झेन मास्टर विचारतात, "एका हाताच्या टाळीचा कसला आवाज होतो?" (The sound of one hand clapping)

     आता "डोक्याने" विचार केल्यास असं वाटेल, की एका हाताने कशी टाळी वाजेल? विचारणारा बहुधा हुकलेला असावा. पण जर या कोआनशी एकरूप झाल्यास हळू हळू असं लक्षात येईल, की एका हाताची टाळी, आणि तिचा आवाज याचा संबंध "एका हाताची टाळी" या उक्तीशी आहे. "एका हाताची टाळी" याचा आवाज "एका हाताची टाळी" असाच होतो. एका हाताची टाळी हे केवळ एक लेबल झालं. वस्तुतः तिथे हातही नाही आणि टाळीही. एक हात आणि टाळी या तुमच्या डोक्यातल्या कल्पना आहेत. आणि तुम्ही पूर्वानुभवाच्या आधारावर आणि संस्कारांमुळे गोंधळून जाऊन या पेचात अडकत आहात. ही सगळी साब्जेक्टीव्हीटी ची गम्मत आहे. ओब्जेक्टीव रियालिटी चा विचार केल्यास काहीच तसं खरं अस्तित्वात नाही हे लक्षात येतं.

     अजून एक म्हणजे "everybody is nobody" म्हणजे "प्रत्येकजण कुणीही नाही" हेही एक असंच कोडं आहे. वर्षानुवर्षे केलेल्या ध्यानामुळे मेंदूमधील काळ-ठिकाण (Time-Space) चं भान ठेवणारा भाग हा हळूहळू लहान होत जातो. कारण शून्यावस्थेत काळ-वेळ-अंतर-ठिकाण या सगळ्यापासून माणूस दूर असतो. सततच्या सरावाने मग काळ-वेळ-अंतर-ठिकाण यामुळे भासमान होत असलेली "मी" ची कल्पना हळूहळू धूसर होत जाते. यालाच "स्व-नाश" (Self Destruction) असं म्हणतात. म्हणजे "मी" हा जो काही भास आहे तो एकदा नाहीसा झाला कि मग, या "मी" शी जोडल्या गेलेल्या सर्व गोष्टी निरर्थक होतात. माझं सुख, माझं दुख. सर्व नाश पावून मन एका समान (Equanimous) पातळीवर स्थिर होतं. म्हणजे "मी" हा "मी" नाहीच, हे एकदा प्रतीत झालं, कि, कुणीच कुणी नाही हेही लक्षात येतं, "मी" आणि "जग" यातील फरक संपून जातो आणि माणूस स्वतः व भोवताल (self and surrounding) मधील फरक केवळ एक भास आहे हे लक्षात घेतो, आणि "हे विश्वचि
माझे घर" ही उक्ती सार्थ होते. Everything is it's non - self - म्हणजे कोणतीही गोष्ट ती स्वतः नसते. हे लक्षात येतं. म्हणजे हे -  कोणीच कोणी नाही. (Everybody is nobody)

अगदी याच कल्पनेवर एक मूळ पाली वाक्य येतं ते म्हणजे पुप्फ-पूजा मध्ये (पुष्प-पूजा) "पुप्फे मिलायाती यथा इदं मी, कायो तथा याती विनासभावं |" स्व या कल्पनेच्या नाशाला "विनास" म्हटलं गेलं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे ही फुले एकदिवस वाळून जातात, त्याप्रमाणे माझ्या शरीरात हा विनासभाव येऊ दे... अशी ती प्रार्थना आहे.

# # # 

Thursday, 14 July 2016

हैदराबाद - इट स्ट्रीट आणि मी.

     "वीकएंड " म्हणजे काय हे फक्त सेकण्ड आणि फोर्थ सॅटरडे-सन्डे सुट्टी असलेल्या लोकांना विचारा. पाच दिवसीय आठवडा असल्याने कामाचा लोड जाणवत नाहीच शिवाय आपण सॅटर्डे कसाही "वेस्ट" केला तरी त्याची करेक्टिव्ह ऍक्शन म्हणून आणखी एक "सोन्यासारखा संडे" मिळतो. शिवाय माझ्यासारख्या बॅचलर लोकांना बरीच कामंही असतात. सुज्ञ बॅचलर वाचकांना ते लक्षात येईलच. जसं की आठवडाभराचे कपडे धुणे, वाळवणे, कपड्यांना इस्त्री करणे, रूम आवरून ती राहण्यायोग्य बनवणे, त्यातल्या त्यात किचन आवरणे म्हणजे एक मोठा उद्योग! टेबल, खुर्च्या पुसून त्यावरची पुरातन धूळ साफ करणे, पुस्तकांचे रॅक आवरून ठेवणे, न्यूज पेपर्स नीट एकावर एक रचून ठेवणे, गठ्ठा कप्प्यात मावेना झाला, की तोच रद्दीवाल्याकडे नेऊन वजनात फसवणूक करून घेणे आणि कमीच पैसे मिळाल्याचे दुःख करणे, आरसे पुसून "हे इतकं क्लीअर दिसतं?" असे आश्चर्य व्यक्त करणे, टूथपेस्ट च्या ट्यूब वर दया येऊन ती नवीन आणणे, बेडशीट्स, पिलो कव्हर्स यांचे नैसर्गिक रंग जाऊन तिथे वेगळे रंग आले की ते बदलणे, आणि थोडंसं छान वाटावं म्हणून उदबत्ती लावणे आणि हे सगळं कमी म्हणून की काय - अंघोळ करणे - नाश्ता करणे - जेवण करणे - झोपणे - इ.इ. 

     तर असा हा वीकेंड या सगळ्या धांदलीत कसा निघून जातो ते कळत नाही. म्हणून लॉन्ग वीकेंड ला जरा कुठे बाहेर फिरण्याचे प्लॅन्स बनवता येतात. आणि मी ते करतो. अर्थात रूममेट्स-कम - कलिग्स सोबत.


# # # # #


     आता निघू मग निघू करत करत शेवटी बारा वाजलेच निघायला घरातून. बरेच दिवस झाले काही शॉपिंग केलं नाही, असा सम्यक आणि मयूरचं म्हणणं पडलं. त्यामुळे मग "इट स्ट्रीट" चा प्लॅन आपसूक डीले झाला. सुमारे दीड ते चार अक्खा हैदराबाद सेंट्रल मॉल पालथा घातल्यावर मयूरला त्याचे मनपसंत दोन शर्ट्स आणि एक पॅन्ट मिळाली. मला घ्यायची होती एक चिनो, पण रंग, साईझ, कम्फर्ट, आणि किंमत या चार गोष्टी कुठल्याच आयटम मध्ये जुळून येईनात. अगदी दोन फ्लोअर पालथे घातले तरीही. मग शेवटी कंटाळून मी तो नाद सोडला आणि एकट्यानेच फूड लाउंज कडे धाव घेतली.

     "इटालियन बी एम टी" असं नाव असलेलं सॅन्डविच मी ऑर्डर केलं. त्यात स्लाइस्ड लॅम्ब सलामी, पेपेरोनी आणि हॅम हे सगळं स्टफ्ड होतं. टेस्ट बऱ्यापैकी छान होती. ऑलिव्स, आणि यालापेनो यांचा एक वेगळाच फ्लेवर जाणवत होता. हे एवढं मोठं सॅन्डविच संपलं तरी या दोघांचा काहीच पत्ता नाही म्हटल्यावर मी बाजूच्याच होम डेकोर शॉप मध्ये घुसलो. तऱ्हेतऱ्हेचे दिवे, धूपदाण्या, बरण्या आणि पॉट्स पाहून फार छान वाटलं. तेवढ्यात मयूर चा फोन. अरे आम्ही आलोय. चल काहीतरी खाऊ. शेवटी हो नाही करता करता एक व्हॅनिला सॅन्डविच झालंच. शेवटी शॉपिंग आटोपून "इट स्ट्रीट" गाठायला साडेपाच सहा वाजले. पण एकदा इट स्ट्रीट वर पोहोचलो आणि हुश्श झालं. समोरचं दृश्य अगदीच विहंगम होतं. 

# # # # #     "इट स्ट्रीट"... खाणं, पिणं आणि समोर पसरलेला हुसेन सागर. संध्याकाळच्या वेळी इथे आलो, तर शांत थंडगार वारा, गच्च दाटून आलेलं आभाळ आणि समोर पसरलेलं निळंशार पाणी...  भोवतालची गर्दीही मग हळूहळू मनातून नाहीशी व्हायला लागते.  तळ्याच्या काठावरून अखंड वाहणारा "नेकलेस रोड" आणि जगाला शांतीचा संदेश देणारी गौतम बुद्धांची महाकाय मूर्ती. आणि आता रीसेंटली उभारलेला भारताचा ध्वज. हा भारताचा सर्वात मोठा ध्वज हैदराबाद मध्ये उभारला गेला आहे. तर शांतपणे वाऱ्यावर लहरणारा भारताचा झेंडा. हळूहळू मनातून सगळे कोलाहल निघून जातात. भोवतालची गर्दीही मग सावकाश काढता पाय घेऊ लागते आणि मग जसा काळोख दाटेल, तसं पाणीही अधिक शांत होऊ लागतं आणि त्यासोबत आपलं मनही. ह्या एवढ्या मोठ्या तळ्यात कारंजी उडू लागतात. आणि वारं आणखीनच थंड.... 
     हातातल्या चहाच्या कपातून निघणाऱ्या वाफा. चहाचा गंध नाकात भिनतो. हातातला वाफाळता चहाचा कप जसा जसा रिकामा होऊ लागतो तसतसा संध्याकाळी ला रंग चढत जातो. आभाळ वेगवेगळ्या रंगानी उजळून जातं आणि समोरचं पाणी मग हळूहळू काळोख पिऊ लागतं. खरंच काहीवेळापूर्वी इथं फार गजबज होतं नाही? आता सगळं काळ्याकुट्ट अंधारात बुडून जातं. पाण्याच्या ठिकाणी आता फक्त एक अज्ञात काळोख. दूरवरचे दिवे पाण्यात चमकताना दिसतात. लाटांवर हलणारी चमचम. दूरवर क्रूझ दिसते. त्यावर चाललेला कोलाहल दिसतो, अस्फुट ऐकूही येतो. नेकलेस रोड अखंड... ही इतकी माणसं राहतात या शहरात? 

# # # # #

     सो, एकूण ही आजची आउटिंग बऱ्यापैकी चांगली झाली. आणि आणखी एक वीकेंड सत्कारणी लागल्याच्या फीलिंग सोबत मी घरी आलो. 

 # # # # #


Tuesday, 29 March 2016

नाईट शिफ्ट आणि मी वगैरे.

# # #

बेंगलोर च्या दोन - दोन खेपा आणि त्यातही शेवटची खेप बेंगलोर टू हैदराबाद व्हाया सोलापूर अशी झाल्याने अतिप्रचंड अशा स्वरूपाचा थकवा  होताच. त्यातून ऑफीस मध्ये पाउल टाकल्या टाकल्याच नितीन सरांचा हसरा चेहरा दिसला. सकाळी सकाळी हे एव्हडं मोठं स्मितहास्य आणि वरतून विचारपूस झाल्याने मला गडबडीची शंका आलीच होती. नतीजा - तीन दिवसांसाठी(रात्रींसाठी) नाईट शिफ्ट ची ऑर्डर! 

तसं मला नाईट शिफ्ट मनापासून आवडते. निद्रादेवीचा माझ्यावर अदरवाईजही कोपच असतो. त्यामुळे त्या वेळात काही काम झालंच तर वेळ सत्कारणी लागल्याची ख़ुशी. दुसऱ्या दिवशी नाही म्हटल तरी जरासा त्रास होतो, पण त्या त्रासापुढे ऑफिस मध्ये रात्री मिळणारी शांतता आणि बऱ्यापैकी एकांत हे नेहेमीच चांगले वाटतात.

# # #

सकाळी रूम वर आल्या आल्याच एक थंडगार हवेची एक मंद झुळूक आली. हैदराबादच्या भर मार्च महिन्यात ही अशी थंड सकाळ बरीच दुर्मिळ. कदाचित रूममेटने रात्रभर चालू ठेवलेल्या आणि अजूनही चालूच असलेल्या डेझर्ट कूलर चा हा परिणाम असावा.अगदी दहा वाजेपर्यंत बिनधास्त ताणून दिल्यानंतर चहाची आठवण झाली.

इंडक्शन वर पाणी आणि चहा उकळून झाल्यावर साखर संपल्याचा साक्षात्कार झाला. पातेलं झाकून सुटे पैसे वगैरे घेऊन निघालो. दुकानात गेलो. बऱ्याच दिवसांतून आल्याने दुकानदाराची नेहेमीची विचारपूस. क्या साब, दिखते नई आजकल? कायको? गांव को गये थे? लगा च मेरेको. ऐसा क्या? लगातार छुट्टीया आयी समझो, नही? हम्म सही है. और ब्रेकफास्ट किये, नही किये? ब्रेड नक्को? सिरफ शुगर? अय्यो... शुगर तो हो गया. कायके वास्ते लेरे? चाय के वास्ते? हम्म जर्रा बचा है डब्बे मे. अभी के लिये बस हो जाइंगा. असं करत त्याने अगदी छोटीशी पुडकी बांधून दिली. हा अगदी मी हैदराबाद मध्ये राहायला आलो तेव्हापासूनचा आमचा दुकानदार. घराबाहेरच्या छोट्याश्या पडवीत उघडलेलं दुकान आणि दुकानात बसलेला तो, त्याची गालांवर छोटेसे हळदीचे पट्टे  उमटवलेली त्याची बायको आणि कधी -मधी दिसणारा त्यांचा  'पोट्टा'.

# # #हा वगैरे घेऊन झाल्यानंतर reflexes थोडे strong झाले. आणि झोप पूर्णपणे दूर झाली. आणि मी गेल्या दोन आठवड्यांत घडलेल्या घटनांचा विचार करू लागलो. अचानक बेंगलोर चा प्रोजेक्ट मिळणं, मी त्यासाठी बेंगलोर ला दोनदा जाणं, तिथून सोलापूर ला घरी, सोलापूर हून कोल्हापूर ला भावाला भेटायला जाणं, म्हणजे या दोन आठवड्यात माझा जवळपास तीन हजार किलोमीटरचा प्रवास झाला. प्रवासात माणूस अंतर्मुखी होतो. याला कारण असं की प्रवासात काही करायचं नसतं. लोक कादंबऱ्या वाचतात, news papers वाचतात, मोबाईल वर गेम्स खेळतात आणि सगळं करून झालं की झोपतात. माझं याच्या अगदी विरुद्ध मत आहे. प्रवासात तुम्ही स्वतःच्या अगदी जवळ असता, स्वतःसाठी काळजी करत असता आणि इतर गोष्टींपेक्षा तुम्ही स्वतःचा जास्त विचार करता. त्यामुळे ध्यानासाठी प्रवास हा ही एक उत्तम avenue ठरू शकतो.

प्रवासात आपण एका ठिकाणाहून निघून दुसऱ्या ठिकाणी पोहोचतो. पण technically, आपण स्वतः काहीच करत नाही. कुणीतरी आपल्याला पैशांच्या मोबदल्यात कुठेतरी घेऊन जातं. आयुष्याचंही असं च नाही का? आपण नेहमी एखाद्या प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात प्रवास करतो, आणि त्यात आपली फारशी भूमिका नसते. परिस्थिती आणि इतर लोक आपल्याला एका प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात घेऊन जातात. आपण फक्तं सुरुवात करतो, आणि एका वेगळ्या अवस्थेत, वेगळ्या ठिकाणी जाऊन पोहोचतो, ज्याची आपल्याला कसलीही कल्पना नसते. 

# # #

अचानक दार वाजलं तसं मी उठून बाहेर गेलो.

पाहिलं तर पाणी वाला. रिकामे बबल्स त्याला देऊन भरलेले घेतले, हिशोब करून तो निघून गेला,
तोपर्यंत चांगले पाचेक वाजलेच होते. परत एकदा दूध आणून मी चहाचं पातेलं इंडक्शन वर ठेवलं.

# # #

Monday, 31 August 2015

दादांतर्फे एम. टेक. कम्प्लिशनचं गिफ्ट

     
     “पण इंजिनियर झालात त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन! या घरातील पहिले इंजिनियर झाला आहात त्याबद्दल आपल्याला माझ्यातर्फे ही भेट” असं म्हणून दादांनी एक छोटी डबी अन एक गुलाबांचा बुके माझ्यासमोर धरला. लालबुंद नक्षीदार डबीवर लिहिलं होतं, “पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स” त्यांनी ती डबी उघडली, अन आत सोन्याची अंगठी, अन त्या अंगठीत चमकणारा एक खडा!” माझ्यासाठी हा एक अनपेक्षित धक्का होता. आजोबांकडून हे इतकं मौल्यवान गिफ्ट मिळावं, या योग्यतेचे आपण आहोत का, असा प्रश्न पडला. पण दादांनी एवढ्या प्रेमाने समोर धरलीये म्हटल्यावर मला नाहीही म्हणता येईना. उजव्या हाताची तर्जनी पुढे केली. दादांनी त्यावर अंगठी चढवली. मला खूपच विशेष कुणीतरी झाल्यासारखं वाटलं उगाच.

दादांनी दिलेला गुलाबांचा बुके आणि अंगठी

अंगठी घालताना दादा
     मला दहावी झाल्या-झाल्यानंतरचे दिवस आठवले. दादांनी मला विचारलं होतं, काय व्हायचं आता तुला? मी म्हटलं होतं, इंजिनियर. अर्थात त्यामागं फार मोठी इंजिनियरच होण्याची इच्छा होती, किंवा अगदी लहानपणापासूनचं स्वप्नं, असं काही नव्हतं. दोनच पर्याय समोर होते. डॉक्टर किंवा इंजिनियर. त्यातही इंजिनियरिंग मध्ये लवकर कमावतं होता येईल हाही एक धोपटमार्ग विचार होताच. म्हणून इंजिनियरिंग प्रवेश परीक्षेची तयारी मी सुरु केली.

     “अरे बापरे!! हितकाली पुस्तकं... वाचून होतील कारे दोन वर्षात?” जाडजूड पुस्तकांचा ढीग पाहून दादा म्हणाले होते. काकाचं त्यावर उत्तर, “ वाचावंच लागणार आहे त्याला. जर आयआयटी पाहिजे असेल तर इतकं करावंच लागणार आहे” काकांचा माझ्या अभ्यासातला किंवा एकंदरीत शैक्षणिक गोष्टीमधला सहभाग मला नेहेमीच थक्क करून सोडी. अगदी घटक चाचणीचे पेपर असोत, किंवा कसलीही पालक मीटिंग असो. काका अगदी सावलीसारखे माझ्या पाठीशी होते, आणि अजूनही आहेत. हेच एक कारण आहे कि मी इथपर्यंत पोहोचू शकलो. काका नेहेमीच अगदी दीपगृहासारखे माझ्या सोबत आहेत.

# # #

     माझं आणखी एक सगळ्यात मोठं प्रेरणा स्थान म्हणजे बाई. माझी सत्तरीतली आजी. “गृहकृत्यदक्ष” या शब्दाचा अर्थ तिच्याकडे पाहून कळतो.

     बाई. दुध. आलेss. बाई, माझ्या शर्टचं बटन तुटलंय, तेवढं लावून दे ग, वाढा ओ जेवायला, हम्म, आले दोन मिनिटं, बई, भांड्यांचा साबण संपलाय ओ, तेव्हड काडून देताव का? बई, कपड्याचं साबण... का ग, परवा तर दिला दिला होता ना, लगीच कसं संपलं? आई, आज ती माणसं येतील हं नळ बसवायला. बाई, नाश्ता. बाई, तो फोटोंचा अल्बम होता की ग, कुठला रे? अगं ते जुने फोटो? अं, ते दिवानच्या खालचा कप्पा उघड, तिथेच आहे बघ. बाई, नाहीये तिथं. होतं कि रे. थांब मी बघते. हं. हि काय? समोरचं दिसत नाही बघ तुला. बई, ज्वारीचं पीट संपलं कि ओ. आता बया, गिरणी लावायचीच राहिली की. जा रे. मी दळण काढून देते, तेव्हड गिरणीत ठेवून ये. अरे... तुझी कपडे कोणची धुवायची असतील तर दे बरं. ती बाई धुऊन तरी टाकील चट चट. मी काय म्हणते, हे शर्ट इस्त्रीला द्यावेत. देऊ का? हो. पोरी आल्या का शिकवणी वरून? जेवून घ्या ग पोरींनो. आंबा देऊ का कापून? सफरचंद ठेवलय बघ. देऊ का एखादं? आता बया... पाच वाजले कि. थांब, चहाला ठेवते. तू घेतोस ना? का रे घे कि थोडासा. आळस जाईल तेवढाच. आलीस का? खा थोडंस काहीतरी. अगं जेव की. आई... आले आले. अगं ते वेलाला मांडव केला मागं लाकडं रोवून...

     असंख्य अगणित कामं. आणि सगळं करून सवरून दुखून खुपून पुन्हा आनंदी राहणं. सगळ्यांना आनंदी ठेवण्यासाठी. तिला पाहून मग आपल्या वयाचा, जाणीवेचा, समज – उमजेचा, छोटेपणा, संकोचपणा जाणवत राहतो.

     सभोवताली माणसं असली, की तिला हुरूप चढतो. अगदी पटापट तिची कामं हातावेगळी होत जातात. जितकी जास्त माणसं, तितकं जास्त सुख. माणसांनी, लेकरा बाळांनी भरलेल्या घरात तिला काय करू आणि काय नको असं होऊन जातं. पण माणसांपैकी कुणीही गावी निघालं, कि तिचा जीव कासावीस होतो. बाई, परवा निघालो ग. परवा? आता बाई. का रे लगेच. तिचा चेहरा थोडासा पडतो. मग ती जाणाऱ्याला वाटे लावायला मग गूळ – शेंग दाण्याच्या पोळ्या, पुरणपोळ्या, असल्या कामात गुंतून जाते. निरोप देताना तर गळ्याखाली गिळलेला हुंदका स्पष्ट दिसतो. अगदी नजरेतून दिसेनासे होईपर्यंत तिचा हात हलत राहतो.

     मग सगळी माणसं, नातवंड जिकडच्या तिकडे गेली किंवा आसपास कुणी नसलं, की मग ती सावकाश विणकाम हातात घेते. लाल, निळ्या, हिरव्या, पांढऱ्या लोकरींचे तागे. रिकाम्या वेळेत अगदी अव्याहत सुरु असलेलं काम. कुणाला शाल, कुणाला मफलर, कुणाला टोपी, कुणाला मोजे, कुणाला स्वेटर, तर कधी टेबल क्लोथ, वगैरे. दुपारनंतर घरात अंगावर येणारं एकटेपण ती त्या दोन सुयांनी परतवून लावत असावी बहुदा. एका समान लयीत वरखाली होणाऱ्या सुया. टक टक टक सुयांवर सुयांचा एका सुरात होणारा आवाज. धागे आपसूक एका सुईवरून दुसऱ्या सुईवर जात राहतात. जादुई धागे. तिच्या माणसांशिवायची पोकळी, ते अवकाश ती त्या धाग्यातून गुंफून नष्ट करत जाते. पानं, फुलं, आकार घेत राहतात. दुपार नंतरच्या एकुटवाण्या जगात तिला त्या लोकरीच्या पाना - फुलांची साथ आहे.

     स्क्रीन लाईफ, जसं कि स्मार्टफोन्स, कॉम्प्यूटर च्या अभावामुळे म्हणा, किंवा आता इतक्या वर्षांची अंगवळणी पडलेली सवय असेल म्हणा, त्यामुळे स्थळ – काळाचं भान हे आमच्यापेक्षा बाई – दादांनाच चांगलं आहे असं म्हणता येईल. साडे आठ वाजता नाश्ता तयार म्हणजे तयार. दुपारी बाराच्या आत भाज्या तयार म्हणजे तयार. रोजचा कार्यक्रम अगदी ठरलेला. अगदी घड्याळाच्या काट्यांवर चालणारा. आमचं म्हणजे आज उठायला दहा वाजले, तर उद्या सातलाच उठून बसलो असं.
लहानपणीच्या तर कित्येक आठवणी. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तर शाळा नसतानाही सहा वाजता जाग यायची. नेहेमीची सवय. पण झोपेची तेव्हा वैतागवाडी नसायची. फोन्स, Laptops नसल्यामुळे रात्री नऊ – दहा पर्यंत सगळे चिडीचूप झोपी जायचे. त्यामुळे लवकर जागही यायची. तर उठल्यानंतर बाई सकाळी उठून अंगणात सडा वगैरे घालीत असे, त्यानंतर रांगोळी. त्यानंतर मग आम्हाला सगळ्यांना ग्लासभर दूध. दूध घेऊन झालं, की बाईचं ठरलेलं वाक्य – “वाघ झाला गड्या!”

     आता बाई आणि मी वेगवेगळ्या शहरांत राहत असून देखील कधी दूध वगैरे घेतलं, की रिकामा कप खाली टेकवताना याची आठवण येतेच – “वाघ झाला गड्या!” अन बाईचा खळखळून हसरा चेहरा.

एका निवांत क्षणी बाई

# # #

अदालजची बारव आणि राणी रुडाबाई

# # # गुजरात. अहमदाबाद शहरापासून गांधीनगरच्या दिशेने साधारण अठरा किलोमीटर गेलं, की एक अदालज नावाचं एक खेडं लागतं. एरवी अत्यंत साध्या व ...