Sunday 23 November 2014

डॉ. प्रकाश बाबा आमटे...



     

   
    

      मास्लोव ने सर्वप्रथम मानवी गरजांची यादी तयार केली. त्यात हवा, पाणी, आणि अन्न या गरजा अगदी प्राथमिक आहेत. त्यानंतर येते ती सुरक्षितता. सुरक्षिततेची गरज भागली, कि मग माणसाला सामाजिक आयुष्याची गरज असते. त्यानंतर स्वाभिमान, त्यानंतर स्व – निश्चितता. आणि सर्वात शेवटी स्पिरिचुअल, म्हणजे आत्मिक ज्ञान.

    सामान्य म्हणजे तुमच्या आमच्या सारखे लोक, पहिल्या तीन पातळ्यांवरच जगणारे. काही कळत तर काही नकळत. आणि कळून तरी काय उपयोग? अगदी प्रत्येकाचं अर्धं आयुष्य पहिल्या तीन पातळ्यांवरच संपून जाणारं.

    अगदी लहानपणापासूनचा प्रश्न. मोठं झाल्यावर कोण व्हायचं तुला? अर्थात डॉक्टर, इंजिनियर आणि हल्ली हल्ली एरोनोटिकल इंजिनियर, कार्डीओलोजीस्ट, एम्बेडेड सिस्टमस स्पेशालीस्ट... 

     स्वप्नही अगदी कॉम्प्लेक्स.

     ही माझी पिढी.

     आणि या सगळ्या कॉम्प्लेक्स स्वप्नांचं फ्युचर काय? हवा, अन्न, पाणी, निवारा आणि सुरक्षितता. मास्लोव ने दर्शवलेल्या -

     पहिल्या – तीन - पातळ्या. एक माणूस म्हणून आपल्याला त्याच्या वरही पोहोचता येतं याचा विचार आजही जरासा अप्रचलित.

     आणि हे सगळं ज्यांना कळतंय (अगदी माझ्यासकट), त्यांचा त्यावर एक चतुर शेरा. सिस्टमच अशी आहे तर आपण तरी काय करणार ना?

# # # # #

     डॉ. प्रकाश बाबा आमटे.

     वडिलांनी पाहिलेलं स्वप्न स्वतःच आयुष्यं बनवून ते जगणारी मुलं असू शकतात कुठे? त्यासाठी आपलं वैयक्तिक आयुष्य पणाला लागलं तरी? एका व्यापक अर्थाने चांगल्या भविष्यकाळासाठी स्वतःच सुखासीन भविष्य बाजूला ठेवू शकतं कोणी? व्यक्तिगत स्थैर्य शोधण्याच्या अनादी मानवी इच्छेला कुणी इतकं रीप्रेस करू शकतं?

     जेव्हा थंडीने काकडणारं उघडं नागडं पोर पाहून स्वतःच्या कपडे घालण्याची लाज वाटायला लागते तेव्हा मास्लोव ने सांगितलेल्या गरजांच्या तक्त्यात आपण सर्वोच्च पातळीवर राहून आपण शोधत असतो. शोधत असतो मानवी जीवनाचा अर्थ आणि त्याच्या संदर्भात आपली भूमिका. सेल्फ क्रायसिस म्हणजे शेवटी काय?

     शेवटी मनातल्या अगणित सुट्या दोऱ्यांची एकत्र गाठ मारणारा हा सिनेमा. माणूस म्हणून आपली ओळख काय, जगण्यासाठी लागणारं धैर्य कसं मिळवावं, आणि संपूर्ण समाजाच्या तुलनेत आपलं स्थान काय हे समजणं म्हणजे मोठं होणं.

     सफरचंद कधी डोक्यावर पडतंय याची वाट पाहणारी माझी पिढी. आपापल्या करियर मध्ये एक फार चांगलं काहीतरी होणार आहे अशी आशा मनात बाळगून असलेली. पर्सिवरन्स ठेवला तर सगळं काही शक्य आहे, नाही का?

# # # # #



Sunday 31 August 2014

चांदवा




# # # # #

खरंच. पावसाचा आवाज कागदावर कसा लिहायचा?

     तरीही धो धो धो पडणारा पाउस कानात साठला की मग तो मनातून वाहायला लागतो. मनाचे हजारो कप्पे. दरवेळी नवीन दार उघडं आहेच. अजून माझंच असून मलाही त्यांची पुरती मोजदाद नाही. कधी कोणती खोली उघडेल आणि पडद्यामागून पडदे बाजूला सरत काय समोर येईल याचा अंदाज कुणी कसा लावावा? नक्कीच मनाचही काही सनातन संचित आपल्या पूर्वजांकडून आपल्यात उतरत असलं पाहिजे. काही अमूर्त आठवणी... काळवेळेपलीकडच्या. काही प्रसंग आणि कधी कधी काही व्यक्तीही.

     सुरुवातीच्या अगदी अपरिचित व्यक्ती प्रत्येक भेटीनंतर वेगळ्या वेगळ्या वाटत गेल्या. परिस्थितीनुसार त्यांच्या चेहऱ्याला अगणित संदर्भ. पुस्तक वाचता वाचता कंटाळून मध्येच एखादा बुकमार्क टाकून पुस्तक ठेवून द्यावं. पुढच्या वेळी निराळंच पान उघडून पुन्हा नवा बुकमार्क. प्रत्येकच चेहेरा असा बुकमार्क ने भरलेलाय. प्रत्येकाचा वेगळा संदर्भ... कुणाकडून काय घेणारेस अन किती? बघ ते. पुन्हा एका चेहऱ्यावर दिलासा देणारं स्मित उमटलं अन त्यापाठोपाठ कित्तीतरी नवीन कोडी... क्या ब्बात है जनाब.

# # # # #

     दुपारच्या जेवणानंतर आलेली झिंग उतरवायला चहाचा डोस उपयोगी असतो. त्यातून इथले इराणी चहावाले चहा बनवण्यात मातब्बर. रस्त्यातन चालता चालता नुसत्या वासाने चहाची तलब झाली नाही असं शक्य नाही. एकीकडे मलईदार दूध खळाखळा उकळत असताना दुसरीकडे चहाचं “डिकाशन” (Decoction) एका तोटी वाल्या टाकीत ओतलं जातंय... चाय ची ऑर्डर दिल्या दिल्या पळीने दूध आणि वरची थोडी मलई कपात आणि मग त्यावर “डिकाशन”. बाजूला वरखाली करून मिसळायला दुसरा कप. आणि असा चहा दोन मिनिटात हजर. पहिल्याच “सिप” मध्ये ताजेतवाने.

     तमातून ज्योतीकडे नेणारं कलियुगातल अमृत काय असेल तर हे.

# # # # #

कोक-ओ-वां

# # # कोक-ओ-वां (Coq-au-vin) चा शब्दशः अर्थ होतो वाईन मध्ये शिजवलेला कोंबडा. फ्रेंच लोक त्यांच्या चीझ, वाईन, ब्रेड, चिकन, बीफ आणि पोर्क यांच...