Sunday, 6 September 2020

मा कश्चित दुःख भागभवेत

मा कश्चित दुःख भागभवेत 

# # # # # 

झोप डोळ्यात दाटते तेव्हा वर्तमानाचे कढ मनात दाटून यायला लागतात. चांगल्या-वाईट, कठीण- मृदू, आंबट - गोड आठवणीत मन रमून जायला होतं. खिडकीबाहेरची चंद्रकोर ह्या साऱ्या सुख - दुःखांवर चांदण्याची सारखीच  पखरण करते, तेव्हा ह्या सगळ्या भवसंसाराचं फोलपण अंगावर धावून येतं.  एका कुशीवर वळताना एरवी शांत झालेलं मन विचारांत धावायला लागतं तेव्हा कुठे आतल्या असण्याची जाणीव सुस्पष्ट होत जाते. अपार दुःखाच्या घड्यांमध्ये मनाचं गुरफटून जाणं पण सवयीचं होत जातं. आपसूक दुःखाशी असणं सोयीचं होतं. सुखाची चटक सगळ्यांनाच असते. पण दुःखाची चटक एकदा लागली की की त्यातून सुटणं कर्मकठीण. दुःखाचं वलयांकित होत जाणं. (©अधोरेखित )

मुळातच तरबेज दुःखाला उसन्या मायेची पखरण करून आंजारल- गोंजरलं की ते मनातून अंगांगात वाहायला लागतं. दुःखाची कविता करून चारचौघात मांडली तरी लोक त्यातून सुख शोधतात. जग सुख साजरं करतं, पण एकदा दुःख साजरं केलं की त्याचीही आसक्ती होते. हे एक अमुक दुःख, हे एक तमुक, ते दुःख राजसी, तर हे अबोध दुःख. काहीएक दुःखाचा बोध होत नाही. ज्यांचा होतो ती दुःखे सावकाश एका कुपीत बंद करून वर नाव लिहून आत जपून ठेवली जातात. सोयीस्करपणे बाहेर काढून अंगाशी माखायला. दुःखच नसेल तर माणसं जोडली कशी जातील? दुःखाने माणसं जोडली जातात. समदुःखी. समसुखी माणसे जोडली जात नाहीत. ईर्ष्याच असते. त्यासाठी या सुवर्णवर्खी कुप्यांतलं दुःख काढून त्याचा शिडकाव केला की मैत्र वाढतं. (©अधोरेखित )

ह्या असल्या विचारांच्या गाड्या जोडत जोडत झोप गडद होत जाते. सरते शेवटी मग भावना बोथट होत जातात तेव्हा आतली एक एक निरगाठ सुटत जाते आणि श्वास मोकळे होत जातात. शेवटी दुःखाचे सोहळे रंगवून झाले  आणि नव्या दुःखाची उजळणी झाली की मग मन झोपायला मोकळं. उद्याच्या निर्धारावर मनाला अलगद मोकळं सोडलं की सगळा ब्रम्हानंदच.

# # # # #

 


No comments:

Post a Comment

संधिप्रकाश

 # # # # # संध्यासमयीची स्तब्ध झाकोळ पसरत जाते तेव्हा अणकुचीदार होत जातात  अवैध भावनांचे कोपरे पूर्वेकडच्या अंधारात  बीभत्स संधिप्रकाश पश्चि...