Monday, 13 July 2020

ऑल आयडेंटिटीज आर इंपर्मनन्ट

# # # # #

 

विशीच्या सुरवातीलाच झेन ची ओळख झाल्यामुळे आणि त्याचं एक आकर्षण निर्माण झाल्यामुळे इंटरनेटवर मी बरंच झेन बद्दल वाचलंय, तसंच झेन च्या बऱ्याच फेमस व्यक्तींची पुस्तकं जसं की, शुंर्यु सुझुकी, थिच्च न्हात हान्ह, वाचलं आहे, आणि काही खूप सुंदर ब्लॉग्स - buddhaimonia वगैरे वाचले आहेत. 

 

शेवटी झेन म्हणजे आपलंच "ध्यान" तिकडे जपान मध्ये जाऊन "झेन" झालं, पण त्यात जे मूळ बुद्धिस्ट तत्त्व आहे, ते जापनीज लोकांनी जगवलं, संवर्धित केलं. झेन याचा अर्थ एकरूप होणे, यात अनेक प्रकार आहेत, झाझेन (बसून करायचं ध्यान, किन्हीन (दोन झाझेन च्या सेशन मध्ये चालत चालत करायचं ध्यान - mindful walking), ओरयोकी (जेवताना करायचं ध्यान - mindful eating) इत्यादी हे सगळे प्रकार झेन लाइफस्टाइल चा भाग आहेत. कोणे एके काळी मी हे सगळं डिलिजेंटली करायचो देखील (आणि आताही अधून मधून आठवेल तसं). 

 

हे सगळं वाचत असताना ह्या सगळ्यामागचा उद्देश काय आहे हा प्रश्न मला नेहेमी पडायचा. तर यावर मी जितकं वाचलं, आणि जितकं चिंतन केलं त्यात असं लक्षात आलं की, जितक्या आपल्या स्वतःबद्दलच्या कल्पना, किंवा मी पणाची भावना स्ट्रॉंग असते; मी म्हणजे अमुक, मी म्हणजे तमुक, मला हेच आवडतं, मला हेच करायचं आहे, माझे गोल्स (मटेरियलिस्टिक) हे - हे आहेत वगैरे, तितके आपण या मी पणाच्या भावनेच्या आहारी जातो. आणि त्यासोबत आपली सगळी सुखे दुःखे जोडून बसतो. उदा, कोणी काही बोललं, कि बापरेतो/ती मला असं कसं बोलू शकतो/शकते? ही भावना अर्धवट ज्ञानातून आलेली असते असं झेन मानते. स्वतःबद्दलच्या अर्धवट ज्ञानातून. कारण लहानपणापासून आपण हा "मी" चा सेन्स बाळगत आलेलो असतो. वास्तविक पाहता या सेन्स वर  आपला कसलाही कंट्रोल नाही. आपण झोपतो तेव्हा हा "मी" चा सेन्स वीक होऊन जातो. जेव्हा आपण कोणती गोष्ट तल्लीन होऊन करतो, तेव्हा हा "मी" चा सेन्स गायब होतो. मुळात हा मी चा सेन्स पूर्णतः नैसर्गिक आहे, ती निसर्गाची प्रॉपर्टी आहे. तो माझा नाही. त्याला मी माझा म्हटलं नाही तरी तो राहणारच आहे. त्याला मी स्वतःसोबत आयडेंटिफाय केलं नाही तरी तो राहणारच आहे. एवढंच काय, हे शरीर, हे मन, सर्व काही नैसर्गिक, निसर्गाच्या मालकीचं, युनिव्हर्स च्या मालकीचं आहे, हे आपोआप निपजलेलं आणि वाढलेलं आहे. त्यात "माझा" असा काही विशेष रोल नाहीच. हा जो काही कॉन्शसनेस आहे तो युनिव्हर्स च्या मालकीचा आहे, माझा त्यातही विशेष रोल नाही. मी "मी" नाहीच, तर "निसर्ग" आहे. म्हणजे कोणी मला काही बोललं, तर ते ह्या समथिंग कॉल्ड निसर्गदत्त शरीर-मन-कॉन्शसनेस ला बोललं आहे, त्यात वाईट भावना आल्या तरी त्याही निसर्गदत्त आहेत, निसर्गाच्या मालकीच्या आहेत.त्यामुळे मला त्यात दुखी होण्याचा काहीच प्रश्न नाही. त्यामुळे ह्या "मी" च्या सेन्स पासून मुक्त भावना बाळगणे आणि ती पुरती उमगणे हेच दुःखमुक्तीचे झेन आहे. 

 

म्हणून "ऑल आयडेंटिटीज आर इंपर्मनन्ट" हे तत्वज्ञान फार महत्वाचं आहे. अगदी आपलं नावही काही खरंखुरं आपलं आहे का? तर तेही कुणा भलत्यानेच ठेवलेलं आहे. म्हणजे नावही आपल्या मालकीचं नाही, तर बाकी काय घ्या? आपलं घर, कुटुंब, नाव, आडनाव, धंदा, नोकरी, कपडे, खाद्य सगळे परिस्थितीजन्य आहेत. जर नीट पाहिलं तर तिथे यातलं काहीही अबसोल्यूटली आपलं नाही. आपल्या जागी कोणीही असू शकत होतं. 

 

त्यामुळे मी अमुक अमुक डॉक्टर आहे, वकील आहे, इंजिनियर आहे किंवा प्रोफेसर आहे, ह्या सगळ्या इम्पर्मनन्ट आयडेंटिटिज आहेत. आयुष्यात एकदा ना एकदा ह्या पावसाच्या पाण्यात कागदी होडी सोडावी तश्या सोडाव्या लागणार आहेत. हे भान सगळ्यांनी ठेवून जगणं महत्वाचं, म्हणजे जेव्हा सगळं सुटतं तेव्हा काहीच मागे उरत नाही. अगदी दुःखही. 

 

# # # # #

 


1 comment:

संध्याकाळ

 # # # # # सं ध्याकाळ डोळ्यांवाटे मनात उतरत जाते तसतसं  हळूहळू काहीतरी हातातून निसटत जाण्याचं भान येऊ लागतं. वारा पडतो. उजेड हळूहळू क्षीण हो...