Saturday, 23 March 2019

पहाटेची गोष्ट

# # #

पहाटेच्या गारव्यात खोलीच्या बाहेर येऊन पाहिलं तर पश्चिमेकडे चंद्र दिसत होता. त्यातून पौषाचा महिना. अजूनही गडद अंधार अवतीभोवती. पहाटेचा मागमूस न लागावा इतकं शांत वातावरण. अंगणात रात्री उशिरा यजमानांनी केलेली शेकोटी धुमसत होती. तिच्या कडेला चार पाच कुत्री निवांत पहुडली होती. नारळीच्या बागा वाऱ्यामुळे सळसळ आवाज करत होत्या. एकदा दोनदा विचार केलाच की बाहेर पडावं कि नको. बाकीचे सगळे शांत झोपी गेले होते. धीर करून स्वेटर वगैरे घातलं, आणि एकदाचा घराबाहेर पडलो.

एरवी रांगोळ्या पाहिल्या  कि त्या सुंदर आकार आणि रंगांच्या बांधणीमध्ये मन मोहून जातं, पण या इतक्या रात्रीच्या अंधारात रस्त्यांवर लावलेल्या दिव्यांच्या पिवळसर उजेडात त्या भलत्याच भयंकर वाटत होत्या. पांढऱ्या उभ्या आडव्या रेषा. 

काहीही असलं तरी वातावरण काही ठीक वाटत नव्हतं. म्हणून झपाझप रस्ता मागे सोडत दांड्यावर जाऊन पोचलो. समोर सुरुच्या झाडांमधून समुद्राची गाज ऐकू येत होती. आणि बाजूलाच काहीजण शेकोटी करत बसलेले होते. धडाडा जाळ पेटला होता. माणसं पाहून जरा हायसं वाटलं. श्रीवर्धन चा समुद्रकिनारा म्हणजे समोर विस्तीर्ण पसरलेला अरबी समुद्र आणि आजूबाजूला असलेल्या लहान मोठ्या टेकड्या. सुरुची झाडं मागे टाकून किनारा गाठला तेच समोर काळाकुट्ट समुद्र आणि त्यावर उठणाऱ्या मंद पांढुरक्या लाटा दिसल्या. पश्चिमेच्या आकाशात चंद्र तळपत होता. अंदाजे नवमी वगैरे असावी.
लांबून जरी काळोख असला तरी दगडांवरून वाळूत उतरल्यावर नजर निवळली आणि किनारा स्वच्छ दिसायला लागला. रस्त्यांवरच्या दिव्याचा उजेडात माझीच सावली लांबच लांब दिसत होती. किनाऱ्याला चिटपाखरूही दिसत नव्हतं. पश्चिमेकडे पसरलेला अथांग समुद्र, पूर्वेला सुरुची झाडी, आणि चंद्राचा मंद उजेड सोडला तर दाट काळोख. आता तर माझी सावलीही दिसेनाशी होते. का कुणास ठाऊक पण आता भीती जाऊन मन एका वेगळ्याच लयीत स्थिर होतं. मी मांडी घालून खाली बसतो. थंड वाळू माझ्या पायांना स्पर्श करते. डोळे बंद केले तर फक्त समुद्राचा आवाज आणि बाजूच्या झाडांची सळसळ. हळूहळू मग सगळं अवघडलेपण दूर होत जातं आणि जाणीवा प्रखर होतात. दूरवर कुठे चाललेल्या शेकोटीभोवती लोक गाताहेत. दुरून आवाज येतो. पाणी दगडांवर येऊन आदळत आहे. मध्येच समुद्रात खूप दूर एक गस्तीची बोट फेरी मारून जाते तिच्या इंजिनाचा आवाज. शांत असूनही सगळं काही गजबजलेलं. या पसाऱ्यात पण असलेली एक संथ लय; शांतीतही असलेलं चैतन्य. हळूहळू शरीराच्या जाणीवा धूसर होत जातात. मिटत नाहीत, पण धूसर होतात. आत बाहेर सगळं एक होऊन जातं. 
बऱ्याच वेळाने भानावर येऊन पाहिलं तर पूर्वेच्या आकाशात मंद प्रकाश चमकतो. हळूहळू मग जागं झालेलं जग समुद्राच्या ओढीने दांड्यावर जमा होऊ लागतं. कुणी शांत चालत चाललंय तरी कुणी धावतोय, काही बायका सावकाशपणे चप्पल हातात घेऊन अनवाणी पायांनी वाळूतून चालत जातात. ओलसर वाळूतून त्यांची पावले उमटतात. समुद्रावर नजर जाईल तिथवर पातळ धुकं. टेकड्यांच्या काठाला तर दाट धुक्याची चादरच. वाळूत उमटलेली लाटांची नक्षी सुंदर दिसते. सूर्य वर आला नाही तरी पूर्वेकडे आकाश लालसर व्हायला लागतं तसा मी किनाऱ्याकडे काही पायऱ्या केल्यात तिकडे जाऊन बसतो. अगदी थोड्या वेळापूर्वी धीरगंभीर असलेल्या वातावरणात भूपाळी घुमते. सारं हलकं हलकं होऊन जातं. 
परतीच्या वाटेवर एका संथ लयीत चालणाऱ्या गायी आणि त्यांना बिलगून चालणारी वासरं दिसतात. दाट झाडीतून जाणारा रस्ता थोडासा धुक्यातूनच जातो. मघाशीच्या भयानक दिसणाऱ्या रांगोळ्यांची जागा आता सडा आणि नवीन रांगोळ्यांनी घेतलेली दिसते. जाग्या झालेल्या वाटेवरून मग मी अंगणात पोचतो. पितळी बंबाच्या वर दिसणारा जाळ आणि जळत्या लाकडांचा मंद वास. "घे तोंड धुऊन मग मस्तपैकी चहा घे" 
हो म्हणून मी एकदा मागे वळून पाहतो. अचानक ती ओळ आठवून जाते, "पितात सारे गोड हिवाळा".

# # #

No comments:

Post a Comment

संधिप्रकाश

 # # # # # संध्यासमयीची स्तब्ध झाकोळ पसरत जाते तेव्हा अणकुचीदार होत जातात  अवैध भावनांचे कोपरे पूर्वेकडच्या अंधारात  बीभत्स संधिप्रकाश पश्चि...