Friday, 8 March 2013

भूतकाळातला प्रवास


कोण म्हणतं कि time travel ही एक fantasy आहे?

     Time travel म्हणजे हॉलिवूडी fantasy पटात  दाखवल्या जाणाऱ्या मोठमोठाल्या मशिनिंमधून एकदम फाटकन time travel करणं, एवढंच नाही. कधी घरातली एखादी खोली आवरायला घ्या. एरवी अडगळ वाटणाऱ्या कित्येक गोष्टी घड्याळाचे काटे मागे फिरवत नेतात. पहिली पानं उलटून पाहत “कोरीच तर आहे” करून वापरायला काढलेल्या जुन्या डायरीची मागची पानं abstract art कधी झालेली असतात काही कळत नाही. कधीकाळच्या कुणाच्या व्यक्त-अव्यक्त भावनांनी त्यांची शेवटची पानं गच्च.

     “झालं. आता ही एवढी रद्दी बांधली की झालंच” असं म्हणत जुन्या वह्यांचे गठ्ठे उचलताना एखादी rather जुनाट म्हणजे अगदी जीर्ण झालेली वही हातात येते. “बघू तरी काय आहे ते” .. पानांमागून पानं उलटताना पुन्हा kaleidoscope चा आविष्कार. पहिल्या पानावर बारीक बारीक अक्षरांत पद्मा गोळ्यांची कविता कुणा रसिक मनानं तिथं लिहून काढलेली असते,

“इतकी बेपर्वाई आकाशालाच शोभणारी...
तुही स्वतःला आकाश समजू लागलास का
मी म्हटले म्हणून?
कितीही म्हटले परस्परांना अलौकिक असामान्य...
तरी मूळ मातीतच
हे तुला कळत नाही असे का मी म्हणते?
एक विचारू?
कलंदराला हवीच का असली बेपर्वाई?
आकाशाची पोकळ पोकळ निळाई?
चिडले नाही रे..
चंद्र-सूर्य पाहते न मी तुझ्याच डोळ्यांत?
चंद्र-सूर्याला का दिसावीत आसवं कोणाच्या डोळ्यातली?
मातीचे मुके कढ मातीच जाणे...
... पण तू आकाशच राहा
नाहीतर मी डोळे उचलून पहायचे तरी कोणाकडे?”

     कविता वाचत वाचत मनानं कवितेत हरवून जावं तर अगदी पुढच्याच दोन पानांवर “कैरीचा तक्कू” कसा बनवायचा याची कृती लिहिलेली. अन त्यापाठोपाठ रसलिंबू, पोह्याचे पापड... यांच्या कृती. त्याच्याच पुढच्या पानावर आठवून आठवून लिहिलेला महिन्याचा हिशेब. “७ तारीख – दूध अर्धा लिटर जास्त” अशा सांकेतिक वाटणाऱ्या मेमोजनी वही अजूनच interesting झालेली. अन अश्या साताठ वह्या अडगळीत. प्रत्येक वही आधीपेक्षा जास्त nostalgic... घर आवरायचं म्हणजे खरं निवांत एखादा दिवसच काढायला हवा.

     कुठल्यातरी कोपऱ्यात सापडणारा पत्त्यांचा क्याट. अन सापडला म्हणून खेळलेला एखादा रमीचा डाव.

     सगळ्यात महत्वाचं आणि मला आवडणारं काम म्हणजे एक्सपायरी डेट झालेली औषधं फेकून देणं. कधी कुणी न बघता घेतली तर पंचाईत नको म्हणून जुनी औषधं धडाधड फेकून देता येतात. पण अडगळीत नवनवीन सापडणाऱ्या वस्तूंनी ताज्या होत जाणाऱ्या आठवणी. या असल्या आठवणी थोड्याच एक्सपायरी डेटसोबत येतात? फेकून द्यायचं म्हटलं तरी न फेकता येणाऱ्या आठवणींची अडगळ. आयुष्यात कधीही न साफ होणारी. सगळे जुने दिवस जसेच्या तसे डोळ्यांसमोर उभे करणाऱ्या आठवणी.

     घर आवरताना आठवणींच्या कोळीष्टकामध्ये आपसूकच गुंतून जायला होतं. एका झाडूच्या फटक्यासरशी ती कुठली उडून जायला?

No comments:

Post a Comment

संधिप्रकाश

 # # # # # संध्यासमयीची स्तब्ध झाकोळ पसरत जाते तेव्हा अणकुचीदार होत जातात  अवैध भावनांचे कोपरे पूर्वेकडच्या अंधारात  बीभत्स संधिप्रकाश पश्चि...