Friday, 11 August 2017

बाई रिटायर होतात तेव्हा...

# # #

     शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का? असं वाटायचे दिवस हळूहळू मागे पडत गेले आणि भोलानाथाला विचारायचे प्रश्नही बदलले. भोलानाथ, ऑफिस मध्ये  मिळेल का रे अप्रेजल? बॉसच्या पोटात कळ येऊन दुखेल का रे ढोपर? इत्यादी.

     पण काही का असेना, आयुष्य कितीही बदललं, तरी शाळा नावाचा एक कोपरा मात्र मनात सतत कुठेतरी जिवंत राहिला. सगळेच वर्गमित्र आज भेटत नसले, तरी सगळ्या गमतीजमती आणि ती शाळेची फेज कुठेतरी मनात घर करून राहिलीच.

     आणि अचानक बातमी आली की आमच्या प्राथमिक च्या बाई रिटायर होतायेत. शेड्युल मुले कार्यक्रमाला जाता आलं नाही, तरी मी त्यांना पत्रं लिहून पाठवलं. पत्र वाचून त्यांना फार आनंद झाला.

     हे पत्र त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात सर्वांसमोर वाचलं गेलं.

# # #

पुष्कर प्रकाश कांबळे
अनुश्रेय, ६९, वामन नगर,
जुळे सोलापूर, सोलापूर – ४१३००४
मो. क्र. ८४ ६६ ०६४ ५९५

प्रिय बाई,
सर्वात आधी मी बाईंची दिलगिरी व्यक्त करतो की मला सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला हजर राहता आलेलं नाही. अंजुमने साधारण दहा दिवस आधी मला मेसेज केला, अरे आपल्या सुर्वे बाई रिटायर होतायेत की रे. मी म्हटलं, हो का? त्यांना माझ्याकडून आयुष्याच्या नवीन पर्वासाठी शुभेच्छा सांग. ती म्हणाली, शुभेच्छा कसल्या सांग? तुला यायचंय. येशील का? यायचं अगदी मनात होतं पण नेमकी माझी १४ ला एक रीविव मिटिंग आली आणि ऑफिसच्या धावपळीत मी काही येऊ शकलो नाही, पण तुमची आठवण मात्र दिवसभर सतत येत राहिली.

      जून चे दिवस आठवले. नवीन पुस्तके, वह्या, त्यात गृहपाठाच्या वेगळ्या, वर्गपाठाच्या वेगळ्या, त्यांना घातलेली तपकिरी कव्हरं, वर लावलेले स्टीकर, त्यावर चांगलं अक्षर काढायचं असं ठरवून धाकधुकीत लिहिलेलं स्वतःच नाव, भरलेलं पहिलं दप्तर, ते पाठीला लावून संध्याकाळी केलेली रंगीत तालीम, आणि केवढं जड आहे बाई! झेपेल का रे? अशी मम्मीची प्रेमळ काळजी, सकाळी उठून अंघोळ करून पाडलेला भांग, गणवेश आणि स्कूल बस/रिक्षा मधून वारूळवाडीला पोहोचून धावत पळत गाठलेली शाळेची प्रार्थनेची वेळ, घंटा, मधली सुट्टी... सगळं काही डोळ्यासमोरून तरळून गेलं.

      त्या सगळ्यात सर्वात जास्त आठवण आली ती तुमची. एक प्रेमळ शिक्षिका म्हणून तुम्ही आम्हा मुलांमध्ये फेमस होतात. बाकीच्या शिक्षिका खूप रागावतात असा समज होता. तुम्ही पाठ करून घेतलेले पाढे, गणितं, अधून मधून खाल्लेला मार, सगळं आठवलं. एकदा तुम्ही गृहपाठ दिला होतात. त्यात सुईतल्या “सु” ला ह्रस्व उकार की दीर्घ यावरून माझं आणि मम्मीच घरी कडाक्याचं भांडण झालं होतं. मी फळ्यावरून उतरवून घेताना चुकून दुसरा उकार घेतला होता आणि मम्मी मला पहिला उकार द्यायला लावत होती. नाही ग मम्मी, आमच्या बाईंनी दुसराच शिकवला आहे. तुझ्या काळात वेगळा देत असतील. हे माझं स्पष्ट मत होतं आणि मी त्यासाठी रडून भरपूर त्रागाही केला, आणि वैतागून त्या माउलीने बर बाबा, दे दुसरा उकार म्हटलं होतं. आणि अर्थात दुसऱ्या दिवशी वर्गात येऊन माझ्या वहीवर लाल फुली उमटली होती. तेव्हा मला कळलेलं, अच्छा, म्हणजे मम्मीलाही शाळेत शिकवलेलं येतं. तिचीही याकामात मदत घ्यायला हरकत नाही. सांगायचा मुद्दा हाच की तुमच्यावर आम्हा विद्यार्थ्यांचा पालकांपेक्षाही प्रगाढ विश्वास होता. आणि एक भीतीयुक्त आदरही.

      भीतीचं थोडक्यात सांगायचं म्हणजे एक प्रसंग आठवतो. अजूनही मला ते आठवून कधी कधी मी किती वाईट आहे अशी भावना येते. वर्गात आठवड्यातून एका दिवशी, बहुतेक शनिवारी, अवांतर वाचनाचा तास असे. त्यावेळी गोष्टींची छोटी छोटी पुस्तके मिळत. ती वाचून सोमवारी परत करायची असत. तेव्हा “धाडसी राजपुत्र आणि समुद्रकन्या” हे एक पुस्तक मला मिळालं. मी घरी नेऊन मोठ्या आनंदाने ते वाचून काढलं, त्यात समरकंद देशाच्या एका राजपुत्राला एका समुद्रकन्येशी लग्न करायचं असतं, पण त्याला भूल देऊन दुष्ट लावी राणी पोपट बनवून टाकते आणि पिंजऱ्यात डांबते, शेवटी त्याच नगरातला एक जादुगार राजपुत्राची मदत करतो आणि त्याला समुद्रकन्येशी भेटवतो, आणि त्यांचं लग्न होतं अशी ती मोठी सुरस गोष्ट होती. पण झालं असं, की ते पुस्तक रविवारच्या आवरा-आवरीत कुठे गेलं मलाही कळलं नाही. थेट सोमवारी शाळेला निघायचं तेव्हा आठवलं. पोटात धस्स झालं. बापरे! पुस्तक काही केल्या सापडेना. माझा धीर सुटत चालला. मम्मी म्हणाली जा मी शोधून ठेवते. मी घाबरत घाबरत शाळेत पोहोचलो. त्यादिवशी काही बाईनी विचारलं नाही, आणि पुस्तकही घरी सापडलं नाही. बहुतेक पुढच्या शनिवारी बाईनी विचारलं, तेव्हा मी सांगितलं पुस्तक नाहीये. बाईनी काही फार रागावल नाही. शेवटी बऱ्याच वर्षांनी ते पुस्तक घर शिफ्टिंग करताना आजीला आणि मला एका सुटकेस मध्ये सापडलं. ते पाहून माझ्या चेहऱ्यावर हसू का उमटलं ते आजीला काही कळलं नाही.

      मित्र – मैत्रिणींसोबत मधल्या सुटीत डबा खाणे हाही एक विरंगुळ्याचा विषय. अमित, मयूर, अविनाश, मुज्जमील, अंजुम, काजल, वृषाली, शुभांगी अजूनही नावं आठवली तरी ते छोटे छोटे चिमुरडे चेहरेच समोर येतात. रोज मधल्या सुट्टीत शिवणापाणीच्या खेळाचं तर आम्ही पेटंटच घेतलं होतं. याशिवायही लपाछापी इ अनेक खेळ मधल्या सुट्टीत आम्ही खेळत असू.

      कारगिल चं युद्ध तेव्हा सुरु होतं. त्यावेळी निधी गोळा करायला शाळेने प्रभातफेरी काढली होती. अन नेमका प्रभात फेरीच्या दिवशी पाउस आला होता. निधी गोळा करत इकडे तिकडे पळताना मजा आली होती.

      शाळेव्यतिरिक्तही तुमचं सर्वांशी मिळून मिसळून वागणं. तुम्ही एकदा एका रविवारी माझ्या घरी आला होतात. दातांची डॉक्टर असलेल्या माझ्या सुगरण आईला आंब्याचं लोणचं कसं करायचं ते येत नसे. आणि मला आंब्याचं लोणचं प्रचंड आवडायचं. ते शिकण्यासाठी खास तिने तुम्हाला आमंत्रण दिलं होतं. फोडलेले आंब्याचे तुकडे खात मी बसलो होतो. तुम्हाला पाहून मी आतल्या घरात धूम ठोकली. नंतर बऱ्याच वेळाने लोणचं झालं हे मला त्या खमंग वासावरून कळलं. मी बाहेर आलो. तुम्ही मम्मीला सांगत होतात, हम्म. झालं. आता हा तळलेला मसाला थंड झाला, की मग कैरीच्या फोडींवर घालायचा. आणि थोडं तेल गरम करून, थंड करून मग वरून ओतायचं आणि कापडाने बरणीचं तोंड बांधून घ्यायचं. मम्मी तुम्हाला सोडवायला गेली तोपर्यंत मी चाखुन पाहिलं. त्या लोणच्याचा वास आणि चव कुणी आजही दिली तर मी ओळखून दाखवेन की बाईंनी बनवलंय.

      तुमची आणखी एक खूप जवळची आठवण म्हणजे जेव्हा मम्मी मंचरला ऍडमिट होती, तेव्हा सहामाहीचे पेपरही झाले नव्हते, मी परीक्षेलाही बसू शकत नव्हतो कारण त्या सगळ्या अस्थिर काळात माझा अभ्यासही झालेला नव्हता. मी फक्त घाबरलेली आणि धावपळ करणारी माणसे माझ्या अवती भोवती पाहत होतो. भोवताली जे काही सुरु आहे, ते फक्त पाहत राहणं माझ्या हातात होतं. फारसं काही कळत नव्हतंच पण जे काही चालू आहे ते तितकसं चांगलं नाही हे कळत होतं. आजी आणि मी हॉस्पिटल मध्ये बसलो होतो. माझा नुकताच जन्मलेला भाऊ एका छोट्याश्या काचेच्या पेटीत झोपला होता. त्याच्या श्वासागणिक वरखाली होणाऱ्या इवल्याश्या छातीकडे मी पाहत होतो. त्याच्या नवजात अंगावरचे पांढरे पापुद्रेही अजून तसेच होते. वरती बल्ब जळत होता. कुणीतरी माझ्या हातात सहामाहीच्या सराव प्रश्नपत्रिका आणून ठेवल्या. घे पुष्कर. तुला वेळ मिळणार नाही. अधून-मधून वाचत जा, आणि याची तयारी कर. तुझा अभ्यास बुडू नये म्हणून सुर्वे बाईनी नारायणगावहून पाठवलेत. मी त्या तंग वातावरणात कसेतरी एक दोन प्रश्न वाचले आणि घडी घालून आजीला दिले. त्यात जंगलात एकटाच राहणाऱ्या, झाडांवरून उड्या  मारणाऱ्या एका स्वच्छंदी आणि आनंदी मुलाच्या धड्यावरचे प्रश्न होते. चणिया त्याचं नाव. मलाही त्यावेळी चणियासारखं कुठेतरी लांब जंगलात निघून जावं आणि स्वच्छंदी राहावं असं वाटलं होतं. त्यानंतर ते पेपर वाचण्याची वेळ नंतर कधी आलीच नाही. जे काही होईल ते होवो पण माझा अभ्यास बुडू न देण्याची तुमची तळमळ माझ्यापर्यंत पोहोचली. एक शिक्षिका म्हणून जे काही करता येत होतं ते तुम्ही केलंत. आपल्या कामाशी कशी निष्ठा ठेवावी धडा तुम्ही मला आपल्या वर्तनातून घालून दिलात. तेव्हा अर्थातच हे सगळं कळालही नाही पण जसं जसं आठवत गेलं, तसतसं, मला माझ्यासोबत घडलेल्या घटनांचे अर्थ कळत गेले.

      आणि आज म्हणूनच तुमची सेवानिवृत्ती ही माझ्यासारख्या तुमच्या हातून घडलेल्या हजारो विद्यार्थ्यांसाठी विशेष आहे. शिक्षक मुलांना घडवतो, त्यांच्या अंतरंगात प्रवेश करतो, नीतीमूल्यांचे धडे देतो, माणसांपासून चांगला माणूस कसं बनायचं हेही शिकवतो. हे सगळ्यांना माहीत आहेच. त्यात नवं असं काहीच नाही. पण माझ्यासारख्या कित्येक विद्यार्थ्यांच्या हृदयात तुमच्याशी निगडीत अश्या व्यक्त – अव्यक्त अनेक आठवणी आहेत. मी फक्त आज त्या व्यक्त केल्या. अश्या आठवणींचा आणि संस्कारांचा अमूल्य ठेवा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हृदयातून कायम जपलेला असतो. म्हणूनच हे पत्र लिहिताना कुणीतरी विचारलं, कुणाला लिहितोयस रे? मी म्हटलं, अरे आमच्या प्राथमिकच्या बाई. हे म्हणताना जे काही वाटलं, तो आपुलकीचा अनुभव नेमका शब्दात पकडण कठीण. सेवेमधून शिक्षक निवृत्त होतात पण अजूनतरी कुणालाही ह्या स्मृतींच्या आणि आपुलकीच्या बंधातून निवृत्त होता आलेलं नाही आणि होता येणारही नाही. एक कर्मनिष्ठ आणि प्रेमळ शिक्षिका म्हणून तुमचं माझ्या हृदयात नेहमी उंच स्थान राहील.

तुमच्या आयुष्यात येणाऱ्या ह्या नवीन पर्वास माझ्याकडून अनेक शुभेच्छा. तुमचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू द्यात.

आपला विद्यार्थी
पुष्कर प्रकाश कांबळे


# # #

No comments:

Post a Comment

संधिप्रकाश

 # # # # # संध्यासमयीची स्तब्ध झाकोळ पसरत जाते तेव्हा अणकुचीदार होत जातात  अवैध भावनांचे कोपरे पूर्वेकडच्या अंधारात  बीभत्स संधिप्रकाश पश्चि...