Sunday, 26 November 2017

पडद्यांमागे लपवलेलं ऊन

# # #

थंडीच्या दिवसांतली टळटळीत दुपार. अंगावर येणारी.

पडद्यांमागील लपवलेल्या खिडक्यांतून नकोसे वाटणारे कवडसे आत येतात. अंधाराला भोके पाडीत सगळ्या खोल्यांतून, जिन्यांतून, सगळा उजेड उजेड करून टाकणारे कवडसे. चिटपाखरू ही फिरकत नाही असल्या शांत वातावरणात ही उतरती दुपार सगळं असह्य करून टाकते. कमालीचं आखडलेल शरीर आणि त्यातून रविवार. खिडकीच्या सज्जाच्या आडोशाने बसलेली कबुतरं अव्याहतपणे घुमत राहतात. बाकी सगळं नेहेमीचं.

मी घरात शिरू पाहतो. बागेतल्या सगळ्या झाडांवर हे असं पांघरूण कोणी घातलं? हे असं झाडांखालून वाकून वाकून हळूहळू जायचं म्हणजे भयानक. अंगणातला समोरचा रस्ता दिसत नाही इतका दाट काळोख या पांघरुणाने केलेला. जपून जायला हवं. मी वर पहातो. मिट्ट काळोखातही झाडांच्या फांद्या आड लपलेले सुतारपक्षी माझ्याकडे डोळे वटारून एकटक पाहतात. न राहवून मी पुढे सरकतो.

सूर्य मावळताना दारातून एखाद दुसऱ्या कुत्र्याचं कर्कश्य भेसूर भुंकणं कानावर पडतं. भुंकण नेहेमीचं वाटत नाही. मी हातातली काही बिस्किटे त्याच्या दिशेने फेकतो.तर ते कुत्रं नुसतं हुंगून पुढे जातं. आज हे काय झालंय घराला काही कळत नाही. मी उदासवाणा होऊन झोक्यावर बसून राहतो. दिवसभर फुलून आता सुकत जाणाऱ्या मोगऱ्याचा वास यावेळी अपशकुनी वाटायला लागतो. कुठूनही कसलाही आवाज नाही. एखाद दुसरं वाहन सोडल्यास रस्ताही एकदम शांत.

गुंगीत माझे डोळे हलकेसे उघडतात. जाणीवा आणखी थोड्या सूक्ष्म होतात तसतसं ह्या अर्धवट झोपेच्या अवस्थेत शरीर हलकं वाटायला लागतं. हळूहळू डोक्यात विचारांच्या फांद्या फुटत जातात. मी खूप थांबवायचा प्रयत्न करतो. अजून जास्त गुंगीत जाण्याचा प्रयत्न करतो. काहीच फरक पडत नाही. हळूहळू भान येतच राहतं. मी कसल्यातरी विचारात होतो. मला कशाची काळजी वाटत होती? आता काहीच आठवत नाही. थकून शेवटी मी तो निरर्थक शोध सोडून देतो. रात्रभर ऐकलेल्या गाण्याच्या ओळी मात्र इनव्होलंटरिली डोक्यात रिपीट होत राहतात "जान उधेडूं, रूह दिसेना, दोष कटेना औषधीयां दे जा रे... बिन दर्शन कैसे तरीये... बैना बैना... तुम सुनो हमारी बैना..." अन मग त्यामागून गाण्याचं संगीत. अशक्य. त्यात वाजलेल्या एकूण एक बीटसह. नाही. प्लीज. त्रासून मी डोक्यावरचं पांघरूण अजून घट्ट करतो. तसं जागे होत जाण्याची जाणीव अजून प्रखर होत जाते.

पांघरूण झटकून मी उठून बसतो. रात्र आधीच झालीये. पडद्यांमागे लपवलेल्या खिडक्यांमधून रातकिड्यांचा आवाज येतो. सभोवताली सगळं अस्ताव्यस्त. टेबलवर सकाळी सांडलेली कॉफी, नाश्त्याचे उष्टे डबे, खुर्चीवर दोन दिवसांपासून पडलेले ट्रॅकस... असह्य वास नाकात शिरतो. सगळं तसंच मागं टाकून मी बेसिनचा नळ सोडून चेहऱ्यावर पाणी मारत राहतो. निरुपयोगी. अंगावर आलेला मक्ख जडपणा काही जाता जात नाही. त्या पाण्याच्या धारेत मात्र साचलेली दुपार हळूहळू विरघळून वाहून जाते...

# # #

1 comment:

संधिप्रकाश

 # # # # # संध्यासमयीची स्तब्ध झाकोळ पसरत जाते तेव्हा अणकुचीदार होत जातात  अवैध भावनांचे कोपरे पूर्वेकडच्या अंधारात  बीभत्स संधिप्रकाश पश्चि...