# # #
"हा, दो मिनिट रुकीये भैया, मै ATM से पैसे लेके आता हू." मी हे म्हटलं आणि माझा ओला कॅब मधील को - प्यासेंजर ही तितक्यात म्हणाला, "चलो अच्छा है, मुझे भी पैसे निकालनेही थे." वास्तविक हा को - प्यासेंजर म्हणजे एरो डिपार्टमेंट चा बहुधा जनरल सेक्रेटरी असावा. त्याला मी आधीही कुठेतरी पाहिल्याचं आठवत होतं.
"ठीक है सरजी" ओला चालक म्हणाला आणि गाडी बाजूला घेतली.
पैसे वगैरे काढून आम्ही गाडीत येऊन बसलो. ओला चा ड्रायवर बराच वेळ आम्हा दोघांकडेही आळीपाळीने पाहत होता. दिसायला साधारण विशीतला. पण वागण्या बोलण्यात अगदी अदब. अधून मधून काही अवघडलेले इंग्रजी शब्द. त्याचं त्याच्या लाईफ चं फ्रस्ट्रेशन तो सांगत होता. अमुक इतक्या राईड करायच्या कि मग इंसेटीव मिळतो. ओलावाले हरामखोर आहेत वगैरे. मधून मधून विषय त्याच्या कौटुंबिक ताण तणावाकडे. को - प्यासेंजर सुदैवाने दाक्षिणात्य असल्याने भाषिक अज्ञान त्याच्या पथ्यावर पडले होते. तो निवांत कानात इयरफोन घालून गाणी वगैरे ऐकत खिडकीतून बाहेर पाहत होता.
मी ड्रायवर च्या शेजारी बसल्याने आणि त्यादिवशी पवईहून गोरेगाव ला जायच्या रस्त्यावर भयानक ट्राफिक असल्याने तो अगदी हक्काने मला सगळं सांगत होता. माझी गोरेगाव ला मिटिंग होती आणि एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीचे National Manager यांना मी माझ्या संशोधनासंदर्भात भेटणार होतो. वाटेवर फोन सुरु होते. आणखीही बरेच लोक त्या मिटिंग मध्ये मला प्रत्यक्ष भेटणार होते जे आजवर फक्त इमेल किंवा फोन वरून बोललेले आहेत.
माझी उडालेली एकंदरीत धांदल पाहता त्याने मग मी काय करतो वगैरे विचारले. मी काय करतो हे त्याला समजेल असं सोपं करून सांगितलं. आणि त्याला ते समजलं. मलाही त्याचा आनंद झाला. शेवटी बोलता सहज तो म्हणाला, "मेरेको आपको Thank you बोलनेका है." "क्यू?" मी विचारलं. "आप इतना काम कर रहे है, टेन्शन पाल रहे है, देश का फ्युचर एकदम सही बनेगा ऐसा हि काम करे तो. मै आपको काम के लिये बेस्ट लक बोलता है."
एवढ्यात माझं ठिकाण आलं, ट्राफिक च्या घोळामुळे मला पटकन पैसे देऊन उतरावं लागलं. "Thank you भैया" हे इतकंच त्या संक्षिप्त वेळेत मी बोलू शकलो. पण मनातल्या मनात मी त्याला किती काही बोलून गेलो. "देश का फ्युचर हम सभी को मिलकर बनाना है. हि सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे. आणि त्याला मी हेही सांगायला हवं होतं, कि देशासाठी तू देखील तितकाच मूल्यवान आहेस जितका मी. एकमेकांच्या सहकार्याने हे सगळं आलबेल सुरु आहे. अर्थात हे सगळं वेळ टाळून गेल्यावर.
मी फोन च्या स्क्रीन वर पाहिलं, ड्रायव्हर साठी चं रेटिंग द्यायचं होतं. आपसूक मी पाच चांदण्या निवडल्या आणि स्क्रीन ऑफ करून खिशात टाकला.
# # #
No comments:
Post a Comment