Sunday 23 June 2024

संध्याकाळ

 # # # # #

संध्याकाळ डोळ्यांवाटे मनात उतरत जाते तसतसं  हळूहळू काहीतरी हातातून निसटत जाण्याचं भान येऊ लागतं. वारा पडतो. उजेड हळूहळू क्षीण होत जातो. झाडं शांत होतात. उजळून निघालेली पश्चिम दिशा काळजात एक कोपरा करून बसून राहते, जणू म्हातारी माणसं काठीवर मूठ घट्ट आवळून बसून राहतात तसं. दिवस गेला, तरी संध्याकाळ हातातून जाऊ द्यायची नाही म्हणून मी चपला पायात सरकवून घराबाहेर पडतो. एरवी थोड्याफार गजबजलेल्या बेलफोर्टवर रविवारची सुस्ती पसरलेली असते. रिकामे रस्ते, बंद दुकाने, ओस मैदाने रविवारच्या खुणा बाळगत असतात. आसुसलेल्या कान - डोळ्यांनी मी निसटती संध्याकाळ पकडून ठेवण्याचा फोल प्रयत्न करतो. माझ्या नेहेमीच्या ठरलेल्या एका ठिकाणी फिरत फिरत जाऊन जेव्हा मला मी भेटतो, तिथे थांबतो. रेल्वेचा पूल, आजूबाजूला पसरलेली फुलझाडे आणि शांत, निर्जन रस्ता. ही माझी नेहेमी स्वतःला भेटण्याची जागा. आतला - बाहेरचा कल्लोळ पश्चिम दिशेसारखा शांत होत जातो तेव्हा मला क्षितिजावर बॅलॉन द अल्झासचा निळसर हिरवा डोंगर आणि त्यावर दूरवर पसरलेली झाडाची रांग दिसू लागते. अल्झास आणि जुरा पर्वतांच्या कुशीत वसलेलं बेलफोर्ट अगदी छोटं वाटू लागतं. इतका वेळ हे सगळं दिसत असूनही मी "पाहत" नव्हतो हे कळून चुकतं. दिवसभराचं एकामागून दुसऱ्या महत्वाच्या वाटणाऱ्या बिनकामाच्या गोष्टी करत राहाण्याच्या चाळ्यात बाहेर काय चालू आहे ते कसं दिसावं ? दूरवरचे निळसर - हिरवे डोंगर आणि त्यावर दिसणारी मोठाली झाडं उन्हात चमकत असतात. आता त्या झाडावर कोणी बसलं असेल तर ते सुद्धा तिथून मला पाहू शकेल का? उगाचच विचार येऊन जातो.

घर-दार, जिव्हाळ्याची माणसं, सवयीचं झालेलं जगणं सोडून जेव्हा बेलफोर्टला आलो, त्याला आता वर्ष लोटून गेलं. कोणाची ओळखपाळख नाही, तशी बोलायला उत्सुक असणारी माणसं नाहीत, भाषा येत नाही, अशा परिस्थितीत फार लवकर मला इथल्या सगळ्याचाच उबग आला. रोज ऑफिसहून आल्यावर रिकाम्या घरात पाऊल टाकताना एकटेपण अंगावर यायचं. इतक्या सुंदर, स्वच्छ, सुखसोयीनीं सुसज्ज वातावरणात राहून सुद्धा कोंडल्यासारखं व्हायचं. पण त्याची सुद्धा हळूहळू सवय होत गेली. 

आणि आज बेलफोर्ट सोडताना मन अगदी निरुत्साह आहे, हे सगळं स्वतःसोबत राहणं इतक्या कमी वेळात नसानसांत भिनलं. प्रत्येक गोष्ट आयुष्यात काही ना काही शिकवून जाते. बेलफोर्ट ने मला स्वतःसोबत राहायला शिकवलं. सर्व गोष्टींच्या आधी स्वतःला, स्वतःच्या भाव-भावनांचा विचार समोर ठेवायला शिकवलं. आनंदी राहण्यासाठी नेहेमी माणसे भोवताली असावीत, असं नसतं, एकट्याला सुद्धा आनंदी राहता येऊ शकतं हे शिकवलं. रोजच्या आयुष्यात एखादा दिवस चांगला असतो, तसा तो कधी वाईटही असतो आणि त्याने रोजच्या आयुष्यात कसलाच फरक पडता कामा नये, हे शिकवलं. बेलफोर्ट एक खूप कडक शिस्तीचा शिक्षक म्हणून माझ्या आयुष्यात आलं आणि बऱ्याच अंगांनी मला समृद्ध करून गेलं. कदाचित माझ्यासारखे असे अनेक पुष्कर कधीकाळी त्यांचा कम्फर्ट झोन सोडून बाहेर पडले असतील आणि बरंच काही आयुष्याकडून शिकले असतील, पण माझा अनुभव सर्वस्वी माझा आहे. मी बेलफोर्ट मध्ये राहिलो नाही, तर बेलफोर्ट माझ्यात राहिलं. इथली वळणावळणांनी वाहणारी सावरूस नदी, इथली झाडी झुडुपं, प्लास कॉर्बीस, कॅथेड्रल, रेल्वे स्टेशन, प्लास रेपुब्लिक, बेलफोर्ट चा किल्ला, सेव्हनन्स मधलं माझं ऑफिस, आजूबाजूची शेतीवाडी सगळं सगळं माझ्या आत नेहेमी जिवंत राहील. सोलापूर पासून सुरु झालेला माझा प्रवास आणि त्यांनतर भेटलेली पुणे, वारंगल, हैदराबाद, मुंबई, बेलफोर्ट ही सगळी शहरं माझ्यात वसतात. कधी निवांत वेळी आठवणी निघाल्या, की ह्या शहरांच्या गल्ली-गल्लीत मला आपलेपणाच्या खुणा भेटतात, आपली वाटावी अशी माणसे ह्या प्रत्येक शहरात भेटतात. माणसे सगळीकडे सारखीच. जगभरात त्यांची सुख-दुःखे, बोलण्याचे विषय, हेवेदावे, प्रेम, आपुलकी, आशा-आकांक्षा सगळं इथून तिथून सारखं. 

असं वाटतं की पुढेसुद्धा आयुष्यात कधी एकटं वाटेल, तेव्हा मन वाहत वाहत सावरूसच्या किनाऱ्याशी येईल आणि सगळं एकटेपण तिच्या उथळ, स्वच्छंदी प्रवाहासोबत वाहून जाईल. सावरूस ह्या फ्रेंच शब्दाचा अर्थ आहे चविष्ट. ह्या नदीचं पाणी चविष्ट असेल म्हणून कदाचित हे नाव पडलं असावं. असो, हजारो वर्षांपासून सावरूस वाहते आहे, कित्यके स्थित्यंतरं, पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या कित्येक नाट्यमय घटना या प्रदेशात तिने प्रत्यक्ष पहिल्या असतील, पण तिच्या उन्हाळी फुलांनी बहरलेल्या काठावर कित्येक रविवार घालवणाऱ्या दूरदेशातून आलेल्या माझ्यासारख्या मुलाची तिला नक्की आठवण राहील याची मला खात्री आहे.


(बेलफोर्ट)


# # # # #

संध्याकाळ

 # # # # # सं ध्याकाळ डोळ्यांवाटे मनात उतरत जाते तसतसं  हळूहळू काहीतरी हातातून निसटत जाण्याचं भान येऊ लागतं. वारा पडतो. उजेड हळूहळू क्षीण हो...