Saturday, 27 June 2015

गोवळकोंडा - दखनी शिलापर्वत

# # # # #

काळ येतो. जातो.

माणसे आणि त्यांच्या महत्वाकांक्षा बदलत जातात.

सगळं अनिश्चित – अनित्य असूनही घडलेल्या घटना – काही जगलेली आयुष्यं आपसूक जपली जातात.
तसा काळाचा शाप सर्वांसाठीच नित्य. कुणालाही न चुकणारा. शेकडो युद्धे हरून – जिंकून जगावर राज्य मिळवलं  तरी त्यालाही तो शाप लागू.

सिकंदराचे हात त्याच्या कॉफिन खाली लोंबकळत राहतात शेवटी. जगज्जेत्याचेही हात रिकामेच.

# # # # #

तिलांगणातले अजस्र शिळांचे डोंगर म्हणजे एक अद्भुत दृश्य.

नल्लरायि – म्हणजे शब्दशः काळा दगड. ग्रेनाईट. आणि मजा म्हणजे नल्ल – या शब्दाचा तमिळ अर्थ चांगला, मंगल. कदाचित मग काळा रंग आणि मंगल याचं दक्षिणेत काही वेगळं नातं असावं का?

दक्खनच्या पठाराची बुलंदी दाखवून देत या शिळा वर्षानुवर्ष इथेच पडून आहेत. झालं असं की, या शिळा म्हणजे माणसाला त्याच्या निवार्यासाठी भलत्याच आधाराच्या झाल्या. त्यांच्या गुहा – कपारींमधून वस्त्या होत गेल्या. यात अगदी दोनेक हजार वर्षं मागे जाता येईल. अजिंठा – वेरूळ च्या काळापर्यंत.

देवगिरीचे यादव जेव्हा दक्खन च्या पठारावर राज्यकर्ते होते तेव्हाची गोष्ट. सध्याचा तिलंगण चा भाग तेव्हा काकतीय साम्राज्यात येत असे. राणी रुद्रम्मा देवीचं साम्राज्य. ओरुगाल्लू ही त्यांची राजधानी. सध्या हे शहर वरंगल म्हणून ओळखलं जातं. काकतीय साम्राज्याच्या चारही दिशा अभेद्य असाव्यात ही राजा प्रताप रुद्राची इच्छा होती. त्यानुसार पश्चिमेकडचा एक डोंगर निश्चित करण्यात आला. त्यावर पूर्वी गवळी लोक मातीची घरे बांधून राहत असत. गोल्लाकोंडा हे त्या वस्तीचं नाव. तिथे चिरेबंदी भिंत बांधून त्या डोंगराचं एका किल्ल्यात रुपांतर केलं गेलं. गड वसता झाला. इसवी सनाचं सुमारे बारावं शतक. काकतीय साम्राज्याचा सुवर्णकाळ. नंतर लागलेली उतरती कळा अन मग शेवटी अस्त. आणि किल्ला बहामनी राजवटीकडे गेला. अगदी तेव्हापासून ह्या अतिप्रचंड शिळा हा बदलता काळ पहात आहेत.

PC - http://www.yadavhistory.com/state_wise_history/andhra_pradesh


# # # # #

     हिरे. दगडी कोळशाच बदलेलं रूप. इतिहासात असं कोणतंच रत्न नसेल की ज्यासाठी इतका भयानक रक्तपात झाला असेल. ब्लड डायमंड. हिर्याची चमचमती भूल म्हणजे जीवाशी खेळ. आंध्रभूमी ही अगदी पहिल्यापासून हिर्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. कोह – इ – नूर, (कोह = पर्वत , नूर - चमक) एक तुकडा सध्या ब्रिटीश क्वीन च्या शिरपेचात आहे, तोही इथलाच. कोल्लूर च्या खाणीतला. आणि बरेच जगप्रसिद्ध हिरे इथलेच.

# # # # #

     कुली कुतुबशाहीचं राज्य हैदराबाद वर होतं तेव्हा खरं गोवलकोंडा किल्ला विशेष करून बांधला गेला. इथली मस्जिद, दिवान – ए – आम, दिवान – ए – खास, अंबरखाना, कोठी हे सगळं त्या काळात बांधलं गेलं. कररचना, प्रशासन आलं. त्यानुसार सरदार नेमले गेले.

PC - www.indialine.com

PC - www.historicaltimeofindia.com

     त्यातलाच एक अक्कण्णा मादण्णा, ज्याने करवसुली करून ती गरीबांमध्ये वाटून टाकली असे म्हणतात, त्याला या कृत्याबद्दल कुतुबशाहीने चौदा वर्ष कैदेची सजा सुनावली होती. त्याची कोठडी ही तिथेच आहे. त्याने आतल्या भिंतींवर दगडाच्या सहाय्याने कोरून मूर्ती काढल्या आहेत. काळाच्या ओघात त्यावर शेंदूर फासून त्यांची पूजा करणं आलंच.
PC - www.thrillophilia.com

 दरबारात उभा राहून डोंगराखालच्या दृश्यावर नजर टाकली की, एकीकडे राणीवसा दिसतो. राण्यांचे महाल. उजाड झालेल्या, पडल्या झडल्या भिंतीतून आजही कुतुबशाही चं वैभव दिसून येतं. बांधकामा वरचा मुघल प्रभाव तर आहेच, पण ध्वनिशास्त्राचा त्याचा अभ्यास पाहून थक्क व्हायला होतं. न्यायनिवाडा जिथे व्हायचा तिथे आरोपीला बरोबर एका घुमटाकार छताखाली उभा केला जाई. आणि अगदी त्याचा अंगरखा जरी हलला, तरी त्याचा आवाज अगदी लाऊडस्पीकर मधून आल्यासारखा यायचा. म्हणजे तो अजूनही येतो. वाटाडे हा आवाज आपल्या सदरऱ्यावर हि काढून दाखवतात. ही सावधानता म्हणून उपयोगाला येण्यासारखी युक्ती. जर आरोपीने सजा ऐकून बचावासाठी तालावर वगैरे काढली, तरी त्याचा आवाज व्हावा म्हणून.

PC - www.mithunonthe.net

      ध्वनीचा अजून एक आविष्कार म्हणजे प्रवेश द्वाराच्या घुमटा खाली थांबून जर कोणी टाळी वाजवली तर ती अगदी डोंगरावर असणाऱ्या दिवान ए आम पर्यंत स्पष्ट ऐकू जाते. सगळी घुमटाच्या पैलूदार रचनेची करामत. आवाज त्यातल्या रकान्यांमध्ये घुमत राहून मोठा होत जातो. ( सायन्स वाल्यांसाठी = Constructive Interference happens when two coherent sound waves are superimposed) हे सगळं ज्ञान इतकं explicit नसलं  तरी implicitly त्यांनी जाणून घेऊन अशा रचना तयार केल्या होत्या हे निश्चित.
PC - www.tripadvisor.com


# # # # #


No comments:

Post a Comment

संधिप्रकाश

 # # # # # संध्यासमयीची स्तब्ध झाकोळ पसरत जाते तेव्हा अणकुचीदार होत जातात  अवैध भावनांचे कोपरे पूर्वेकडच्या अंधारात  बीभत्स संधिप्रकाश पश्चि...