Monday 9 December 2013

मन मनास...

दिवाळीचे उजळलेले दिवस परत जाताना उन्हं कलती करून जातात.

     सकाळच्या नव्या हवेत साचलेलं मऊशार गडद धुकं. लोण्याप्रमाणं धुक्यात वितळत जाणारं ऊन. चालता चालता थबकून मी तळ्याच्या काठी उभा राहतो. झाडा झुडूपांशी सलगी करत विस्तीर्ण पसरलेलं तळं. तळ्याच्या त्या काठाला मला लांबवर रस्ता दिसतो. ह्या असल्या थंडीतही रस्ता जगण्याचा ओघ वाहून नेतोच आहे. मी सावकाश नजर खाली वळवतो. तळ्यात अस्थिर असं माझं प्रतिबिंब. पहाटवाऱ्यामुळे ते हलतंय की आतली अस्थिरता तळ्याच्याही नजरेतून सुटली नाही कोण जाणे?... तसल्या दाठूरत्या थंडीतही माझ्या चेहेऱ्यावर हसू उमटलं. प्रतिबिंब मला पाहून विचारतं, “कोण आहेस तू? तुला काय हवंय?”

     मी उलट त्यालाच विचारलं, “कुणाच्या सापेक्ष मी कोण आहे म्हणून सांगू?” ते नुसतंच हसलं. तेही बहुधा माझ्याच जातकुळीतलं असावं. कुणीसं लिहून ठेवलंय, तुम्हीही जगाचाच एक भाग आहात, निर्जीवांपेक्षा तुमच्यात फक्तं एकच गोष्ट वेगळी आहे, तुमच्यात जीव आहे. बाकी तुम्हीही अणुरेणूंचा एक पुंजकाच. त्यांच्यासारखे. म्हणूनच कदाचित त्यांनाही दुःखाची जाण असेलच की. म्हणूनच दुःखाने पोळलेल्या अशाच एखाद्या हतबल जीवाने अथांगाकडे कधीकाळी याचना केली असेल... “मा कश्चित दुःखमाप्नुयात...”

     सूर्य जसजसा आकाशात वर आला, तसतसं हळूहळू धुकं विरून गेलं, तळ्याचा सभोवार लख्ख झाला. खरंच, जग उजळायचं असेल, तर दूरवर एखाद्या सूर्याला जबाबदारीनं रात्रंदिवस जळावंच लागतं. त्याचं कोणाला महत्त्व नसेलही, पण एखादा दिवस तो उगवलाच नाही तर? भयंकर कल्पना. मी मागे फिरलो. झाडांखालच्या मळलेल्या पाऊलवाटांवर चालताना झाडांतून पाझरणारे नाजूक कवडसे. पाचोळ्यात माझी पावलं वाजली, तसं बाजूच्या झाडावरून फडफड करत शेकडो बगळे आकाशात उंचच उंच उडाले, सुंदर दृश्य पाहून मी समोर नजर वळवली तर समोरचं झाड निष्पर्ण. अगदी एकाही फांदीला एकही पान शिल्लक नाही. दुर्दैव. मी म्हणालो. पण ते म्हणालं, “माझ्या डोळ्यांत वसंताची स्वप्नं आहेत.”

     मागे फिरून एकदा या सगळ्या दृश्यावर नजर टाकली.

     “पितात सारे गोड हिवाळा...”

No comments:

Post a Comment

कोक-ओ-वां

# # # कोक-ओ-वां (Coq-au-vin) चा शब्दशः अर्थ होतो वाईन मध्ये शिजवलेला कोंबडा. फ्रेंच लोक त्यांच्या चीझ, वाईन, ब्रेड, चिकन, बीफ आणि पोर्क यांच...