# # # # #
दिवसभराच्या कामानंतर चेहेऱ्यावर पसरलेला मख्ख थकवा घेऊन मी नवीन
बुटाच्या आत दुखणाऱ्या पायाकडं साफ दुर्लक्ष करत डी. आर. डी. ओ. चौकात बसची वाट
पाहत असतो. कामाचा ताण घालवण्यासाठी कानात अखंड वाजणारे शंकर महादेवन, सोना महापात्रा,
श्रेया घोषाल...
नेहेमीप्रमाणे बसचा रश अवर. चुकूनमाकून थांब्याला बस लागलीच तर जणू
बालापूरला चौरस्त्याला जाणारी ती जगातली शेवटची बस असल्याप्रमाणे लोकांची गर्दी. शिवाय
एवढ्या दिव्यातून बसमध्ये जागा मिळालीच, आणि एखाद्या म्हातारबुवांनी वगैरे जागा
मागितलीच, तर “ ओके अंकल, कूरचोअंदी” (म्हणजे बसा; तेलुगु) म्हणण्याशिवाय पर्याय
नाही. म्हणून एखाद्या unfortunate दिवशी मग शेअर ऑटोनेच जायचं, असं माझं आणि
शाहीदचं ठरतं.
“अबे रोक उस ऑटोको...” – असं मला म्हणून “आपेंडी आपेंडी” (थांबवा;
तेलुगु) असं स्वतःच करत कपूर ती गच्च भरलेली केविलवाणी ऑटो थांबवायचा “ऑटोकाट”
प्रयत्न करतो. अशा दोन तीन भरगच्च ऑटो आणि मग सरतेशेवटी खास आमच्यासाठी आली असावी
अशी एखादी रिकामी शेअर ऑटो.
अभिषेक कपूर. खाण्याचे पदार्थ शोधणाऱ्याला जर नोबेल मिळत असतं तर
यंदाचं नोबेल त्याच्या “बन–बोंडा” या शोधासाठी त्याला नक्की मिळालं असतं.
बन–बोंडा
म्हणजे अभिषेक कपूर या माझ्या उत्तर भारतीय मित्राने जमवून आणलेलं मराठमोळ्या वडा–पावचं
तिलंगणातलं रूप. चौघात मिळून अर्धा डझन बनपाव घेतले आणि तितकेच बोंडे (बोंडे? – अनेकवचनासाठी
माफी) घेतले की मग संध्याकाळी भातासोबत कसली आंबट-चिंबट करी खायला मिळेल याची चिंता
करायची जास्त आवश्यकता नसते. आंबट चव म्हणजे तेलुगु लोकांचा जीव की प्राण. अगदी
चटण्यांपासून भाज्यांपर्यंत सगळं आंबट ढाण!
![]() |
www.blendwithspices.com |
त्यातल्या त्यात दिलासा म्हणजे चिकन बिर्याणी. सिकंदराबाद स्टेशन च्या
बाहेर अल्फा म्हणून एक फेमस बिर्याणी चं हॉटेल आहे. एकदा सिकंदराबाद ला गेलो
तेव्हा आणि परत निघताना अश्या दोन्ही वेळेस जायला मिळालं. चिकन बिर्याणी तर टेस्टी
होतीच होती पण व्हेज बिर्याणीही त्याचा तोडीस तोड!
# # # # #
वरंगल च्या चौरस्त्याला गेलं, कि तिथे कोपर्यावर एक अल्टीमेट फास्ट
फूड ची टपरी आहे. पहिल्यांदा जेव्हा शाहीद, अभिषेक, दीपक आणि मी मिळून तिकडे गेलो
तेव्हा बोंडा खाल्ला होता. आतापर्यंत माझी आणि बोन्ड्याची ओळख पुण्यात मिळणाऱ्या
“आलू बोन्ड्यापर्यंत” मर्यादित. पण इथला बोंडा हा तांदळाच्या आंबवलेल्या पिठापासून
तयार केलेला. भुकेच्या तावात तिसरी प्लेट संपवताना आम्ही चौघेही या डीशच्या
प्रेमात पडलो. शिवाय एवढं खाऊनही मी शेवटी निर्लज्जपणे मसाला डोसा मागवला. उत्तरेकडच्या
मसाला डोशाच्या तोंडात मारेल इतकी सुंदर टेस्ट. नुसता मसाला खाऊनच हायसं वाटलं.
खरं डोशात भरायच्या सुक्या बटाट्याच्या भाजीला “मसाला” का म्हणायचं हा प्रश्न
असला, तरी हा मसाला तयार करण्यात इकडचे लोक माहीर.
www.sree-srecipes.blogspot.com |
# # # # #