Friday, 5 August 2022

मी(तू?)


अधाशासारख्या कोसळणाऱ्या पावसात सप्तमीचा चंद्र झाकोळला तेव्हा तू कुठे होतास? एरवी कितीही दाबून ठेवलं तरी आतून उसळ्या घेणारं तुझं प्रतिबिंबित अस्तित्व असं नकळत नजरेआड होईल अशी आरुता नव्हती. एक. दोन. तीन. चार. पाच. सहा. सात. आठ. नऊ. दहा. पुन्हा एक... झाझेन मध्ये श्वासांच्या गणनेची मंडलं वाढत जातात तसा वाढत जाणारा तू एकाएकी नाहीसा झालास. आता आकाशात विजांसोबत लखलखणाऱ्या ढगांची कनात उभी राहिली आहे. असंच कुणाच्या एका खांद्यावर डोकं ठेवून दुसऱ्या खांद्यावर दोन्ही हातांच्या बोटांची गुंफण करावी तसं माझं या पावसाळी रात्रीमध्ये खोल कुठेतरी गमन होत आहे. आता ही रात्र आणि मी दोघेच आहोत. बाकी इथे कुणीही नाही. आधाराचे सगळेच बंध सावकाश सावकाश सुटतील तशा ओळखीच्या खुणा पुसट होत जातील आणि शेवटी ही रात्रच तेवढी उरेल. तेव्हा मी मी असेन का? तू तू असशील का? तू, मी, आणि ह्या सगळ्या काळोख्या सभोवाराचे अस्तिभाव नेणिवेच्याही पैलतीरावर गेले असतील किंवा नाही कोण जाणे? ह्या नदीचं विस्तीर्ण पात्र चोहोबाजूंनी वेढून टाकत आहे. असा नावाडी नाही जो आपल्याला आता तिथे घेऊन जाईल. काय झालं? आत काही तुटलं का? बघ, त्या मिनारांच्या पलीकडून अस्फुट शब्द ऐकू येत आहेत. अर्थ लागला नाही तरी तो पुरातन आर्त आवाज संवेदनेच्या खुणा जाग्या करत जातो. नीट ऐक. त्या आवाजाइतकीच ही संवेदनासुद्धा प्राचीन आहे. हजारो वर्षे साचलेल्या मनाच्या अडगळीत ह्या संवेदना अश्मीभूत होऊन राहिल्या आहेत. प्राचीन? काळाच्या संज्ञा इथे लागू होतात? कितीएक जीव उत्तर शोधत आहेत. तुला वाटतं तू तू आहेस. पण तू आहेस असं वाटणंसुद्धा तुला एकट्यालाच वाटत नाही. हे तुझं असणं अगदी पुरातन, सर्वसाधारण आणि चार - चौघांसारखंच कंटाळवाणं आहे. हीच प्राचीन संवेदना स्वतःतूनच स्वतःचा शोध घेत घेत इथे पोहोचली आहे. कितीही तरबेज झाली तरीही कितीतरी शतकांपासून हा शोध चालू आहे. कशाचा? स्वतःचा. कोण स्वतः - हा हा हा. मुक्ती. मोक्ष. निर्वाण. निब्बान. साटोरी. एन्लाईटनमेंट. इमॅन्सिपेशन. फना. वगैरे.

श्रावणातल्या दमट - कोंदट ॲसिडिटीवाल्या रात्री आणखी दाटी नको म्हणून तुला कितीही निरस्त केलं आणि तोंड वेगळ्या दिशेला फिरवलं असलं तरी तुझी झाकोळ सावकाश सावकाश माझ्या चेहऱ्यावर, शरीरावर, खिडकीतल्या पडद्यावर, लॅम्प शेडवर अगदी माझ्या अस्तित्वावर सुद्धा पसरत जाते. नको म्हटलं तरीसुद्धा. शुभ्र पायघोळ झग्याच्या वलयात चक्राकार फिरणाऱ्या सूफी दर्विशाप्रमाणे तल्लीन होणं आलं मग. प्रत्येक गिरकीमागे कालचक्र फिरत राहतं. एका गिरकीतला मी दुसऱ्यात तोच असतो? की प्रत्येक गिरकीत माझ्यातला मी, तू बदलत जातो? विश्वातलं सर्व काही असंच स्वतःच्या आसाभोवती फिरतं, नाही का? अगदी तू, पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे आणि मी सुद्धा. म्हणूनच फिरून फिरून मी स्वतःकडेच परत येतो. खुदसे ना बच पायेगा तू - कोई भी ले रस्ता अपनेही घर आयेगा तू. आयडेंटीटी क्रायसिस. कर्मा. पाप. अटोनमेंट. वगैरे. कितीही भटकलो तरी पुन्हा आपल्याच घरी मला यायचं आहे. तिथून कुठे पळू? तूच साथीला असशील. जिथे जाईल तिथे प्रतिबिंब म्हणून तू आहेसच की. जमीन पर भटकता रहा हूं सदियो तक, तुम्ही से जन्मू तो शायद मुझे पनाह मिले. सावरायला हवं. कंगोरे बोथट होत जातात आणि शेवटी भावविश्व संथपणे प्रवाहित होतं तेव्हा रात्र सुद्धा मग हळूहळू विरघळत जाते. आणि उरतं काय? तू. 


No comments:

Post a Comment

मी(तू?)

अधाशासारख्या कोसळणाऱ्या पावसात सप्तमीचा चंद्र झाकोळला तेव्हा तू कुठे होतास? एरवी कितीही दाबून ठेवलं तरी आतून उसळ्या घेणारं तुझं प्रतिबिंबित ...